Saturday, May 14, 2011

प्रतापगडाची झुंज (पोवाडा) – शाहीर विष्णुपंत कर्डक

प्रतापगडाची झुंज

चौक १

धन्य--धन्य शिवाजी भोसला । वीर गाजला ।

राजा शोभला । राष्ट्राला पूर्ण देऊन आधार ।

यवन सत्तेस झुगारुन पार । राज्य मराठयांचे केला विस्तार ॥

विजापुरी भरला दरबार । शिवाजी बंडखोर ।

झाला शिरजोर । वेडी बेगम म्हणे हो सरदार ।

सांगा शिवाजीला कोण धरणार । तयाला बढती थोर मिळणार ॥

पैजेचा मांडिला विडा । करीना कोणी धडा ।

झाला मग खडा । क्रोधान अफझूलखान ।

मराठा शिवाजी सैतान । कायमचा टाकतो मी गाडून ।

पैजेचा विडा उचलून । दरबारी बोलला गर्जून ।

शिवाजीचं मुंडक कापून । विजापूरी येतो घेऊन ।

असं म्हणून शिवाजीवर खान चालला ॥

खेडीच्या-खेडी उध्वस्त करु लागला ।

एक लाख फौज संगतीला । जाळपोळ करीत चालला ।

कापितो गाय रस्त्याला । देवांच्या फोडतो मूर्तीला ॥

जमीनदोस्त करा देवळाला । जुलमाने छळी हिंदुला ।

तुळजापुरी येताच चालून । जात्यात घालून ।

टाकली भरडून भवानी देवीला ॥ पंढरपुरी येताच खान ।

शिरला राऊळात । चक्रीत झाला पाहून नाही देव देवळात ॥

भिऊन पळाला म्हणे मला हा शिवाजीचा देव ॥

शिवाजीची काय कथा, आता मी घेतो त्याचा जीव ॥

क्रोधानं फोडून मग देऊळ । निघून चालला ॥

तळ देऊन येऊन राहिला । वाई गावाला ॥

शिवाजीला निरोप धाडला । तू यावं शरण खानाला ।

ऐकशील जरी या वेळा । तरी देतो जीवदानाला ।

ना तरी मराठा मुलखाला । तुज सहित मिळवीन मातीला ।

असं सांगून शिवाजीकडे । कृष्णाजी भास्कर वकील धाडला ॥

शिवाजीला आधीच देवांचा अर्ज होता गेला ॥

दुर्दशा करुन खानानं छळलं आम्हाला ॥

शिवाजीनं समय पाहून । केलं मान्य खान बोलणं ।

मग तह ठरला मिळून । सडया स्वारीनिशी येऊन ।

एक वीर संगती घेऊन । भेटावं बहु आनंदानं ।

असा बेत नक्की ठरवून । करार करुन । वकील परतला ॥

शिवाजीनें केली तय्यारी पहा त्या वेळा ।

गुढया-तोरणे उभारुन प्रतापगड सजवीला ॥

थोर शोभा केली मंडपाला । पाचूचे मणी खांबाला ।

हिरे माणके मध्य भागाला । गाद्या-गिरद्या तक्कया लोडाला ।

मयूर सिंहासन बसण्याला । इंद्रपुरी जणु वसविली प्रतापगडाला ॥

आघाडीस ठेवला नेताजी । पिछाडीस बाजी । मध्ये तानाजी ।

मराठा फौज बंदोबस्तास । शिवाजी भेट देईल खानास ।

वृत्तांत ऐका पुढील चौकास ॥

चौक २

आहा आहा शिवाजी भोसला । शरण आपणाला ।

कळता यवनाला । हर्षला अफझूलखान ।

बोलू लागला तो गर्वानं । शिवाजीला ठोशात मारिन ॥

शिवाजी डोंगरी उंदिर । लुटारु चोर ।

करुनिया ठार । दावतो यवनांच्या दंडा ।

कापूनिया मराठयांचा तांडा । रोवितो मुस्लीमचा झेंडा ॥

अशा आनंदाच्या लहरीत । प्रताप गडी येत ।

बसता मंडपात । शिवाजी म्हणे मस्त गबर झाला ।

संपत्ती एवढी कुठून त्याला । हिर्‍या मोत्यानं मंडप सजला ।

गुडगुडी तोंडी धरुन सिदीला (बंडाला) सांगे डौलानं ॥

शिवाजीला ठार मारुन । संपत्ती नेतो लुटून ॥

मंडपात खान बैसला , कळले शिवबाला ॥

भवानीचे घेऊन दर्शन । नमून मातेला ।

जाणून काळ वेळेला । अंगभर चिलखत ल्याला ॥

भरजरी पोषाख केला । जिरे टोप शिरी चढविला ।

वाघनखे भरुनी पंजाला ॥ खानाच्या भेटीला ।

सर्जा मंडपामधें आला । आहा आहा शिवाजी पाहून ।

दुष्मनी दिली सोडून । तू दोस्त आजपासून ॥

पतंगाने झडप घालावी जशी ज्योतीला ।

सर्पाने विळखा मारावा जसा मुंगुसाला ॥

तसा खान झडपी तया समयास ।

बगलेत धरुन मानगूट, सुरा खुपसला ॥

शिवाजी शूर भोसला । तोही पुरेपुर कसलेला ।

नव्हता कच्च्या गुरुचा चेला । जिजा आईच दूध प्यायलेला ॥

तो कसचा भितोय खानाला । खानाचे कपट ओळखून ॥

मारा चुकवून । बगल तोडून झाला बाजूला ॥

मग सिंह झडपी जसा मस्त हत्तीला ।

वाघाने धरुन फाडावे जस बकर्‍याला ।

तसा शिवाजीने खानाला । वाघनखे खुपसून पोटाला ।

खानाचा फोडला कोथळा । तो खान आडवा पडला कोसळून ।

बचाव बचाव म्हणून ॥ अल्लाअल्ला म्हणून । प्राण सोडला ॥

सय्यद बंडाने जोराचा वार शिवबावर केला ॥

जिरेटोप तुटून धरणीस खेळू लागला ॥

पाहून राजावर घाला । जिवा महाला होताच बाजूला ।

तात्काळ तुटून पडला । सय्यद बंडाला धाडला खानाच्या भेटीला ॥

जयजयकार डंका गाजला । मराठयांनी हल्ला चढविला ।

रक्ताने प्रतापगड न्हाला । खानाची फौज मारुन ।

केली धूळघाण । यवन हैराण । तया समयाला ॥

खानाचे लाव लष्कर । हत्ती, घोडे स्वार । पायदळ सारं ।

लढुनिया फस्त केले यवनास । विजयाने माळ घातली शिवबास ।

शाहीर कर्डक सांगे कवनात ॥

Friday, October 1, 2010

अफझुलखानाचा वध (पोवाडा) – क्रांतिशाहीर ग.द.दीक्षित, चिंचणीकर (सांगली)

सर्ग १ : चाल १

त्या दैत्य हिरण्य कश्यपूला, नारसिंहानं भला, जसा फाडिला,

शिवाजिनं तसा अफझुलखानास, फाडला प्रतापगडीं आणा ध्यानास ।

भवानी आई साह्य शिवबास ॥ध्रु०॥

चाल ५

स्वातंत्र्य हिंदमातेचे केले ज्यानी नष्ट,

असे रावण कुंभकर्ण दैत्य फार बलिष्ठ आले पुन्हा जन्माला ऐका खरी ती गोष्ट,

रावण औरंगजेब खरा, कुंभकर्ण पुरा, अफझुलखान स्पष्ट ॥

चाल १

त्या विष्णूरुपी शहाजीला, कपटानं बोला, पकडुनी नेला,

विजापुरच्या आदिलशहानं, ठार मारण्याचा विचार करुन,

भिंतीत चिरडण्याची आज्ञा दिली जाण ॥

चाल २

परी सर्जा शिवाजी पुत्रानं, शाहास शह देऊन ॥

सोडविला पिता युक्तीनं, हे प्रसिद्ध जगतीं जाण ॥

दिल्लीपती शहाजहान । याच्याच थोर साह्यानं ॥

चाल ३

इकडे ऐका प्रकार काय झाला सांगतो तुम्हाला ॥

महाराष्ट्रांत शिवाजिनं घातला धुमाकुळ साचा ॥

नुकताच दरबारीं प्रताप आपल्या दिमाखाचा ॥

दाविला शहाला बोकड म्हणून दाढीचा ॥

तोरणा घेऊन घातला पाया स्वराज्याचा ॥

असं पाहून भडकला क्रोध कादिलशहाचा ॥

म्हणे कौन करील हा ठार चुव्वा डोंगरचा ॥

चाल लगट

त्यावेळीं भवानी मातेनं, तुळजापुरच्या अंबाबाईनं, लक्ष्मीला हांक मारुन,

शिवाजीला साह्य करण्याची आज्ञा दिली छान ॥

लक्ष्मीचं साह्य शिवबाला, कसं झालं ऐका त्या वेळा,

त्या तोरणा किल्ल्यावर भला, द्रव्याचा साठा गवसला शिवराजाला ॥

दिली धडक त्यानं बेधडक, तेव्हा सुरतेला अन्‌ कल्याणचा खजिना आणिला,

खर्चून द्रव्य प्रतापगड किल्ला बांधला ॥

मग मोठया भक्ति भावानं, भवानीला केलं स्थापन, अशी घोर वार्ता ऐकून,

भडकलं शहाचं मन, दरबार त्यानं भरवून, केला प्रश्न आदिलशहानं,

ठार करिल पहाडका चुव्वा ऐसा वीर कौन ॥

चाल १

ऐकून असे हे बोल, झाला बेताल, खान अफझूल,

ठार म्हणे करीन शिव्या सैतान,

शिवाजी किस चिडिया का नाम, वीर मैं बडा हूं अफझुलखान ॥

सर्ग २ : चाल १

ही वार्ता कळतां शिवबाला, तैयार हो झाला,

विचार करण्याला, भरविला राजगडीं दरबार,

जमविले सर्व वीर सरदार, जिजामाई त्यांत मुख्य आधार ॥

मोरोपंत पिंगळे नेताजी, जेधे कान्होजी, तसाच तानाजी,

जिवा महाला तो खरा कल्याण, तोंच स्वामी समर्थ शिष्य कल्याण,

गर्जना करती शुभ कल्याण ॥

चाल २

संदेश रामदासांचा, कथियला त्यानी दरबारीं ॥

हे अरिष्ट खानाचे, नच जाण फक्त तुजवरी ॥

हे अरिष्ट धर्मावरती, येतसे देवळांवरी ॥

चाल ३

ऐकून असा संदेश---

बंदोबस्त केला देवळांचा शिवाजीनं खास ॥

तुळजापुरची भवानी ठेवली गुप्त जाग्यास ॥

पंढरपुरचा विठोबा चंद्रभागेच्या पात्रांत ॥

ठेवून दर्शनी मूर्ति स्थापल्या स्थानास ॥

आणि आपण केला मुक्काम प्रतापगडास ॥

चाल लगट

खान आला तुळजापुरला, फोडलं भवानी देवीला,

जात्यात भरडुनी पीठ केलं समयाला ॥

चाल १

अगणीत फौज संगतीला, घेऊनीया आला, पंढरपुराला,

विठोबा फोडला चढला गर्वास, बोलला किती मूर्ख

हिंदू हे खास, मानीती देव पहा दगडास ॥

चाल लगट

अफझुलखान बोलला आपणाला, किती मूर्ख हिंदू हे बोला,

म्हणत्यात देव दगडाला, आतां कुठं रं तुमचा देव गेला,

त्यो गेला हुता कुठें ऐका सांगतो तुम्हाला ॥

शिवाजीच्या अंगी भवानींन संचार केला ।

देवीनं दृष्टांत दिला शिवबाला । दे बोकड बळी हा मला-

भिऊं नको उभी मी पाठीला सदा साह्याला ॥

(देवीनं दृष्टांत दिल्यावर शिवाजी राजानी अफझुलखानाशी सामना देण्याची तयारी कशी केली)

चाल भेदीक

पश्चिमेस किल्ल्याच्या ठेविले वीर मोरोपंत पिंगळ्याला ।

वीर कृष्णाजी पवार सुपेकर देऊन त्याच्या साह्याला ॥

पायदळ सारे कोंकण प्रांती घोडदळ देऊन नेताजीला ।

सज्ज ठेविले त्याला सैन्यासह करण्या वाईवर हल्ला ॥

कान्होजी जेधे वीर राहिला कोयनेच्या त्या तीराला ।

स्वतः संगं तानाजी आणी घेतला जिवाजी महाला ॥

चाल १

कृष्णाजी नामें ब्राह्मण, खासा प्रधान, खानाचा जाण,

वळविला शिवाजीनं त्या समयास, सांगे तो जाऊन अफझुलखानास,

शिवाजी भ्यालाय, धनी आपणास ॥

चाल कटाव १

(याप्रमाणे व्यवस्था केल्यानंतर)

प्रतापगडच्या मार्‍या खाली, जागा भेटीची त्यांनी ठरविली,

ठराव झाला अफझुलखानानी, सेना सारी दूर ठेवूनी,

फक्त हुजरे दोन यावं घेऊनी, भ्यालाय शिवाजी मेल्यावाणी,

अशा तर्‍हेचा फांसा टाकूनी, मासा गळाला ओढला

शिवबानी, रस्ते करण्याच्या निमित्तानी, दहावीस हजार मावळे त्या रानीं,

ठेवले कामावर मजूर म्हनोनी, भले दांडगे खंदक खणुनी,

वेळ भेटीचा मोजतो क्षण सत्याचा ॥

चाल दांगटी

मग विचार केला शिवबानं, यावा पाहून, अफझुलखान,

आधींच पाहिलेला असावा चांगला, म्हणून वेश पालटून त्या वेळा,

बहिर्जी नाईक संग घेतला, कधीं तो होई तमाशेवाला,

कधीं कधीं शाहीर गोंधळी बनला, कवा कवा मोळीविक्याही झाला,

कधीं जाई घेऊन भाजीपाला । असा रोज रोज क्रम चालला,

परी नाही खान त्या दिसला, गा ऐका तुम्ही दादा--

चाल १

एके दिवश आंबे घेऊन, डोक्यावर जाण, चालला जलदीनं,

आंब घ्या आंबं आवाज दिधला, वेष कसा घेतला ऐका बावळा,

शिवाजी शोभे खरा मावळा ॥

सर्ग ३ : चाल १

कंठी काळा दोरा पायामधें जाडजूड वहाणा,

घेतला शेतकरी बाणा । काळी कांबळी खांद्यावरती कपाळी ते गंध,

डोई मुंडास पगडबंद । कमरे भवतीं जाड करदोडा घालून लंगोटी ।

डोईवर आंब्याची पाटी । गेला विकाया श्रीशिवराया धर्माच्यासाठी ।

खरोखर राष्ट्र कार्यासाठी ।

चाल ३

आंब्याच्या मिषानं खानाला ठेवला पाहून ।

कृष्णाजी वकील खानाचा फितूर करुन ।

चकविला शिवाजीनं सरदार अफझुलखान ॥

चाल

मग फक्त दोन वीरांना खानानं यावं घेऊन ठरलं त्या क्षणा ॥

चाल १

आशिर्वाद आईचा घेऊन, पोषाख घालून, तयार झाला जाण,

शिवाजी जाण्या गडाखाली, घेऊन दोन वीर वीर्यशाली,

जय विजय जणूं तशा कालीं ॥

(छत्रपती शिवाजी महाराजानी त्यावेळी पोषाख कसा केला होता )

चाल भेदीक

अंगामाजी चिलखत सार्‍या वज्र जाळीदार,

रुभरी बंडी त्यावर, बंडी त्यावर हो, तंग आंगरखा घोळदार ॥

डोईवरती पोलादाचे जाड शिरस्त्राण,

त्यावरी साफा चढवून साफा चढवून हो,

जरीचा चढाव पायीं जाण ॥

मुसेजरी ती तुमान तंगदार जरी कलाबूत,

रेशमी गोंडे झळकत, गोंडे झळकत हो,

मधोमध शोभा खुलवीत ॥

गुप्त हत्यारे वाघ नखे ती डाव्या हातांत,

बिचवा उजव्या अस्तनीत, उजव्या अस्तनीत हो, भवानी डाव्या कमरेवरत ॥

चाल १

अंबेच घ्याया दर्शन, गेला जलदीनं, हात जोडून,

प्रार्थना करी भवानीला । प्रसाद दे माते तुझ्या बाळा,

भीत मी नाही कळीकाळा ॥

चाल लगट

भवानीच करुन दर्शन, आशिर्वाद तिचा घेऊन,

तानाजी जिवाजी जाण चालले संगती जाण,

शिवराया निघाला जलदीनं, सुरु झाला डंका नौबत धडाड धाड धूम ॥

"डंका"

दुडुम दुडुम नौबत, वाजली, दुडुम दुडुम नौबत ॥ध्रु०॥

चालला छत्रपती राणा, शिवभूप गडाखाली जाणा,

रणभेरी वाजे दणाणा दुडुम ॥१॥

स्वातंत्र्या देती प्राणा, ते पुरुष खरे जगीं जाणा,

रक्षितात क्षत्रिय बाणा, दुडुम ॥२॥

स्वातंत्र्य देवी जय बोला, जय माय भवानी बोला,

जय शंकर श्री शिवभोला दुडुम ॥३॥

चाल १

उतरली स्वारी गजगती, गंभीर वृत्ती, समर्थ उक्ती,

भालदार, चोपदार, करती जयजयकार, छत्रपती श्री शिवाजी महाराज,

आ रहे हैं---आस्ते कदम निग्गा रख्खो महाराज ॥

॥ छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय ॥

सर्ग-४ : चाल कटाव २

घेऊन संग सय्यद बंडा, दावण्या शिवाजीला दंडा,

बांधी हाता मधें गंडा, अफझुलखान, जिवा महाला शिवाजीही,

येऊ लागले लवलाही, जीवशीव जोडी पाही गहिंवरुन ॥

खूष झाला अफझुलखान बोलतसे गर्वानं, वकीलासी तेव्हां जाण,

गेला भिऊन पहाडका चुव्वा भला, शिवाजी हा काफर झाला,

धाडतो आता स्वर्गाला मुंडी दाबून ॥

कडकडून मिठी मारी, मुंडक त्याचं दाबून धरी,

मनी म्हणे ढेकणापरी, टाकीतो चिरडून ।

उपसुनिया कट्टयार, बरगडीत त्याच्या वार,

खुपसण्याचा यत्‍न करे, चपळाईनं ॥

चाल १

कपटासी करितसे कपट, शिवराया

सर्जा तो धीट, सोडवुनी मुंडी आटोकाट ॥

चाल कटाव २

करुनिया चपळाई बिचवा काढून लवलाही,

पोटामधे त्याच्या पाही, खुपसून आंतडयाचा त्याच्या गोळा,

पोटातुन बाहेर काढला, खान म्हणे अल्ला अल्ला, ये धाऊन ।

पण त्यानं जलदी करुन, आपली तलवार ऊपसून,

वार केला शिवाजीवर, त्यानं जोरानं ।

चुकविला शिवबानं वार केला उलट प्रहार,

भवानी तलवार परजून ॥

चाल ३

वार आता करणार, तोच गेला शूर वीर,

जीवा महाला नरवीर, तेव्हां धावून वरच्यावर त्याचा हात,

फक्त एकाच धावात कलम केला हातोहात, मोठया शौर्यानं ॥

चाल ४

होता जिवा म्हणुनिया शिवा,

वांचला इतिहास पहावा, राष्ट्राचा जगविला ठेवा ॥

चाल कटाव २

अफझुलखान झाला ठार, सय्यद बंडा केला गार,

शिवराया जिजाईचे, पाय धरुन ।

म्हणे तुझे पुण्य जबर, खान मोठा मातब्बर,

आलो करुनिया ठार, तुझ्या कृपेनं ॥

चाल १

तो धन्य धन्य शिवराय, धन्य जिजामाय,

भवानी साह्य, धन्य ती वंद्य भवानी तलवार,

धन्य हा भारत धर्म साधार, धन्य शाहीर धन्य होणार ॥

दीक्षित क्रांतिशाहीर, चिंचणीकर, बंधू मम प्यार,

छोटा दीक्षित मी गातो कवनास, दोघेही एकाच गुरुचे दास,

न्यायरत्‍न विनोद पूज्य आम्हास ॥

कल्याणी कल्याणची (पोवाडा) – शाहीर रा.वं.जोशी

चाल

(मर्दानी झाशीची राणी, झाशीची राणी

तिन पालथं घालुन शान, पाजल इंग्रजा पाणी ॥ पोवाडयाची )

कल्याणचा खजीना लुटुनी, आणला आबाजींनी,

शूर सेनानी (शूर सेनानी)

अर्पिली भेट राजाला मोठया प्रेमानी ।

लावण्य अती, सुंदरी रुपाची खाणी ॥ (जी जी जी)

सुभेदार सून यावनी, पाहिली शिवबानी, निघाली वाणी (निघाली वाणी)

ही अशीच असती दिव्यरुप मम जननी ।

मी असाच सुंदर दिसतो ना शोभुनी ।

आबाजी सोनदेव यांनी, बोल ऐकूनी, मोठया शरमेनी,

खालच्या मानी (खालच्या मानी)

बोलले शिवाजी बोधरुप शब्दांनी । मानावी परस्त्री माता आणि भगिनी ॥

चाल

टकमका पाही दरबार ऐकूनी वचना ।

शिवराय सांगती आवर्जुनि सर्वांना ॥

राहू या अभय राज्यात गोरगरीबांना ।

गोब्राह्मण, अबला रक्षण आपुला बाणा ॥

हटविण्या लढाई जुलमी परकीयांना ।

गृही शिरुन झाले वैरी त्या शत्रूंना ॥

नांदवू सुखाने गरीब मुस्लीमांना ।

कळीकाळ परंतु जुलमी सरदारांना ॥

द्यावया तडाखा मोगल साम्राज्यांना ।

लुटतात प्रजेला दीन दहाडे त्यांना ॥धर्माचे नावावरती छळणार्‍यांना ।

स्वर्गात पाठवू माथेफिरु सैताना ॥

जाहला दंग दरबार ऐकुनी वचना ।

हा राजा नाही देव वाटे सर्वांना ॥

कल्याणचा अहमद मुला, म्हणे अल्ला अल्ला, ये कैसा झाला ।

तोंडातुनी काढी बोटाला, शेरान सोडल बकरीला आदमी झाला

असा प्रकार नव्हता पाहिला, अचंमित झाला, धीर वाटला सूनबाईला,

तिने सुटकेचा श्वास टाकीला--जी जी जी

अदबीन बुरखा ओढला-थरका थांबला ।

आनंद मनी झाला । नमन राजाला--प्रत्यक्ष जणू भेटला कृष्ण द्रौपदीला ॥

कल्याणी सुन खरोखर, होती सुंदर, रुप मनोहर,

मदनिका चमके जणू बिजली । राजाला भूक नाही पडली ।

मोहिनी दूर झणी सारली ॥जी जी जी॥

संयमी शिव भूपानं, मोठया प्रेमानं, केला सन्मान,

स्त्री जातीचा राखला मान, बाणा मराठयांचा पूर्ण अभिमान

उच्च आदर्श घातले छान ॥जी जी जी॥

आबाजीला सुटल फर्मान, देऊनी मान, वस्त्र भूषण, खणनारळान

ओटी भरुन करा बोळवण ॥जी जी जी॥

नीतीमान श्रेष्ठ झाला राजा, शिवाजी सजा, करावी पूजा,

दिव्य आदर्श ज्याने मांडले, मराठा ब्रीद गौरविले,

सार्‍या जगतात नाव गाजले ॥जी जी जी॥

चाल

सुभेदार मग गहिवरले तो पाहुनी सन्मान

बंदीतुनही त्याला सोडला होता राजानं

कुर्निसात मग करुन बोलला ठेवा राजे ध्यान

जन्मभर मी नाही विसरणार तुमचे अहेसान

शिवरायांनी मान डोलवुनी सांगितले शब्द

यवन तुम्ही जरी असला आमुच्या ठायी नसे भेद

परधर्माचा द्वेष नसे पण, स्वधर्माची जिद्द

जुलमीयांचे पारिपत्य करण्यासि असे सिद्ध

अत्याचार अन् अन्यायाने आम्ही होतो क्षुब्ध

महाराष्ट्राचे स्वराज्य निर्मावया कटीबद्ध

जागला मराठा आज, मराठा आज (मराठा आज) चढला नवा साज,

विजयाचे चढवू आता मस्तकी ताज

त्वेषाने बोलले छत्रपती शिवराज

कल्याणचे सुभेदाराला, निरोप एक दिला, संदेश दिला (संदेश दिला)

मेलेल्या आईचे दूध शिवाजी न प्याला ।

मावळा मराठा आज उभा राहिला--जी जी

चाल

सांगा जा बादशहाला हा निरोप आमुचा खास

हे लचके तोडायाची सोडावी आता आस

जाहली देवळे नष्ट होतात देवता भ्रष्ट

धेनू ब्राह्मण ओरडती धर्मावरती संकट

न्याय नीती उरली नाही, सारेच भोगती कष्ट

जा, सरली तुमची सद्‌दी, द्या सांगुन आता स्पष्ट

ईंटका जवाब पथ्थरसे देण्यास जाहले सिद्ध

चालणार नाही आता अन्याय,जाहली हद्द

आमुचेच वैभव लुटुनी आमुच्याच दाती तृण

मेंढरे बनवूनी आम्हा हाकण्या निघाले कोण ?

गांजलो दडपशाहीने सारेच जाहले दीन

दारिद्रय दुःख कष्टांनी आपलाच पुरता शीण

माघार न आता घेणे हे चक्र थांबल्यावीण

दिल्लीहूनी आला कोणी सरदार जरी चालून

हा लढा न थांबण्याचा स्वातंत्र्य घेतल्यावीण

ही घौडदौड ही स्वारी त्याचीच ओळखा खूण

सुभेदार जाहला स्तब्ध, होऊन हतबुद्ध, बने निःशब्द,

डोलुनी मान-खाली वाकला, कुर्निसात करुनी राजाला,

पाहुनी वरती आभाळाला हात वर करुन काही बोलला,

खालच्या मानी घरी परतला जी-जी-जी ॥

संपला भव्य दरबार, घुमला सभोवार, जय जयकार,

राजे मग झाले घोडयावर स्वार, डोई मंदील पायी सुरवार,

शोभे हातात भवानी तरवार ॥जी-जी-जी॥

महाराष्ट्र आशेचा दीप, शोभला खूप,

श्री शिवभूप भोसले कुलभूषण की जय,

श्री शिवछत्रपती की जय, जय जय महाराष्ट्र की जय हो ॥जी-जी-जी॥

रायगडची हिरकणी (पोवाडा) – शाहीर खेतर सखाराम चव्हाण

रायगडची सांगतो थोरी--ऐका तुम्ही सारी गोष्ट एक घडली त्या रायगडला----

ऐकताना नवल वाटे मजला--सुरवात करतो पोवाडयाला -जी-जी---()

छत्रपती होते गडवरी--पुनव कोजागिरी--समारंभ घनदाट भरला

आनंदाने गड सारा फुलला---किती वर्णावे प्रसंगाला --जी---जी ()

एक खेडे होते शेजारी--गड पायतारी---गौळी लोक रहात होती गावाला---

नित जाती दूध विकण्याला--नेहमीचा परीपाठ त्यान्ला-जी-जी---()

गौळी लोक गेले गडावरी--दूध डोईवरी --हाळी ते देती गिरायकाला --

झटदिशी दूध विकण्याला---विकून ते येती परत घरला जी--जी ()

चाल दुसरी

त्याच गावी होती गौळण -- नाव तिचे हिरा हे जी जी

बेगीबेगी निघाली गडावरी -- काढुनीया धारा हे जी-जी

दुसरी गौळण बोलती तीला--झाल का हिरा हे जी-जी

हिरा म्हणते तुम्ही जा पुढे-येती मी उशीरा हे जी-जी

पाळण्यात बाळ घालूनी --लावीते निजरा हे जी-जी-

चाल तिसरी-हिरा बाळाला झोपविते

हिरा बोले निजनिज बाळा-तुला लागू दे आज डोळा

गडावरी गौळ्याचा मेळा--दूध विकाय झाले गोळा

कोजागिरी पुनवेचा सोहळा-मला जावू दे लडीवाळा

चाल पहिली

हिरा गौळण निघाली गडावरी--चरवी डोईवरी

जाता जाता सांगे म्हातारीला --झोक्यामधे बाळ झोपवीला

उठला तर घेवून बसा त्याला-दिस मावळायला येते घरला जी ()

चाल तिसरी

हिराबाई गेली गडावरी--दूध घेणारी पांगली लोक सारी

दूध घ्या हो म्हणती कुणी तरी-आशी हाळी देती गडावरी

दिस मावळून गेला बगा तरी-हिरा दूध विकण्याची गडबड करी

निघाया घरला जी-जी ()

चौकीदार दरवाज्यावरी-दिस मावळाय दार बंद करी

हीरा आली दरवाजावरी-पहाती हालवून दारे सारी

चौकीदार होते शेजारी-हिरा बोले त्याना सत्वरी

मला जायाच हाय बगा घरी-बाळ माझा तान्हा हाय घरी

कुनी न्हाय घियाला जी-जी ()

चौकीदार तिची समजूत करी-महाराजांचा हुकूम आमच्यावरी

आम्ही हूकमाचे ताबेदारी-आशी गोष्ट गेली त्यांच्या कानावरी

न्हेत्याल टकमक टोका वरी-मुकू प्रानाला जीर हे जी-जी ()

हिराबाई विनंत्या करी--पण ऐकेना पहारेकरी

हिरा मनात कष्टी भारी--बाळ दिसे तीच्या समोरी

हिरा गडावर घिरटया मारी--फिरुनी वाटेचा शोध ती करी

आवरी मनाला जी-जी ()

चारी बाजूला मारुन फेरी-भरली उबळ मायेची उरी

गाय वासराला चुकली पाखरी--पक्षा सारखी मारावी भरारी

पडती डोळ्यातून आसवाच्या सरी-दुध न्हाय तिजला-जी-जी (१०)

ठाम विचार केला अंतरी--हिराबाई गेली बगा कडयावरी

म्हणे देवा तू धाव लौकरी - आले संकट माझ्यावरी

माझे रक्षण तूच आता करी-विनवी देवाला जीर हे जी-जी (११)

कडयावरुन खाली ती उतरी-उतरताना पाय तिचा घसरी

तरी धिरान तोल सावरी-झाडाझुडुपांचा ती आसरा करी

गेली तळाला जीर हे जी-जी (१२)

चाल ली

हिराबाई गेली तेव्हा घरी--बाळ मांडीवरी

शेजारीण घेवून बसली बाळाला-हिराने उचलुन घेतला त्याला

पोटाशी धरुन कुरवाळीला --आईला पाहून बाळ हासला जी-जी (१३)

हीच गोष्ट कळाली गडावरी--लोक नवल करी---

छत्रपती शिवाजी महाराजांन्ला-हकीगत सांगी लोक त्यान्ला

हिराने गड सर केला जीर हे जी-जी (१४)

छत्रपती हिरा सामोरी--उभी दरबारी

महाराजानी बक्षीस दिले तिजला-त्याच कडयावरी बुरुज बांधला

हिराचे नाव दिले बुरजाला-हिरकणीचा बुरुज म्हणती त्याला

हिराचा पोवाडा संपवीला जीर हे जी-जी (१५)

खेतर शाहीर कविता करी-करुनी शाहिरी---

श्रद्धांजली वाहतो हिराबाईला-सीमा नाही तीच्या धाडसाला

मानाचा मुजरा छत्रपतीला-नमस्कार करतो मंडळीला जी (१६)