Tuesday, December 1, 2009
शिवरायांचे पुण्यस्मरण (पोवाडा) - शाहीर पां.द.खाडिलकर
महाराष्ट्राला समर्थ केलें धन्य धन्य शिवबा झाले ॥जी॥
पन्नासवर्षे जीवन जगले कार्य परी अद्भुत केलें ।
चैत्र शुद्ध पौर्णिमेस त्यांचें जीवन संपुनियां गेलें ॥जी॥
चंदनी रचुनी चितेला । राजदेह वरति ठेविला ।
अग्निला देह तो दिला । अन् ज्वाला धडधडा भिडल्या पहा गगनाला ॥जी॥
चाल
वाघ्या कुतरा तो राजाचा वेगानें धावुनि आला ।
झडप टाकुनी अग्नीवरती तो हि पहा जळुनी गेला ॥जी॥
राजाचा अंत जाहला । पण कीर्तिची मिठी कायमची पडली देहाला ॥
शौर्य ही सोडेना त्याला । जनसेवा सोडेना त्याला ।
चैत्राच्या शुद्ध पुनवेला । भर दुपारच्या वेळेला ।
सूर्यानं राजाचा आत्मा ओढुनी नेला ॥जी॥
पार्थिव देह हरपला । पण कीर्तिनं अमर तो केला ।
रायगड रडूं लागला । झाडं झुडपं कोमेजुन गेलीं आकांत झाला ॥जी॥खूबलढा बुरुज तो तेव्हां रडूं लागला ॥जी॥
हिरकणी बुरुज गहिवरला । टकमक बुरुज पोरका झाला ।
धर्माचा आधार गेला ॥
चाल
शिवछत्रपती निघुनी गेले तीनशें वर्षं झालीं त्याला ।
काळ झराझर निघुनी गेला यशोगंध परि दरवळला ॥जी॥महाराष्ट्राचा कानाकोपरा शिवकार्यानें व्यापियला ।
असा राजा कधिं नाहीं झाला पुढें कधी नच होणारा ॥जी॥
युक्तिबुद्धिनें पराक्रमानें परकी सत्ता लोळविली ।
अज्ञ मावळे फुंकर मारुन सेना त्यांचि खडी केली ॥जी॥
पांच शाह्यांना पुरुनी उरले फितुरहि नाहींसे केले ।
राजाच्या त्या पराक्रमाने सर्व मावळे भारविले ॥जी॥
पन्नास वर्षे कणाकणानें अर्पण केलीं देशाला ।
मातींतुन स्वातंत्र्य निर्मिलें असा पराक्रम हा केला ॥जी॥
प्रचंड शत्रू चालून आले तरी वीर नच डगमगला ।
त्या वैर्यां ना दूर पळविले तोड नसे या कार्याला ॥जी॥
संकटें आणि मृत्यूशी सामना केला ॥ कधिं उसंत नाहीं त्याला ।
मावळ्यांचे सैन्य बनविलें लढा देण्याला ॥जी॥
जिवाभावाचा मित्र जमविला । स्वातंत्र्याचा छंद घेतला ।
आणि महाराष्ट्र स्वतंत्र केला ॥
चाल
असा छत्रपति कधिं ना झाला पुढें कधीं नच होणारा ।
शिवरायांचें नांव सदोदित देवो स्फूर्ती आम्हाला ॥जी॥
खडकांतुन स्वातंत्र्य फुलविलें स्वाभिमान जागा केला ।
वंदन करितो शिवप्रभूला पांडुरंग हा या वेळा ॥जी॥
कल्याणचा खजिना लूट (पोवाडा) - शाहीर पां.द.खाडिलकर
जिवाभावाचे मित्र जमविले केली तयारी युद्धाची ॥
कंक येसाजी बाजी फसलकर जिवाजी शूर हि माणकोजी ।
इंगळ्या सुभानजी वीर हिरोजी पिलाजी नेता तानाजी ॥
कैक असे हे मित्र जमविले झाली तयारी लढण्याची ॥जी॥
चाल
तोरणा गड जिंकून आरंभ केला ॥
स्वराज्याचे तोरण बांधलं तोरणा किल्ल्याला ॥
असा व्याप वाढतच गेला । पण पैसा कुठून आणायचा कार्याला ।
तेव्हां शत्रूची लूट करण्याचा बेत तो केला ॥
कल्याणचा खजिना चालला होता विजापूरला ।
तो खजिना आला बोरघाटाला । मावळ्यांनीं लुटून फस्त केला ।
सारा पैसा नेला पुण्याला । अन् इकडे कल्याणवर जोराचा हल्ला चढविला ।
आबाजी सोनदेवानं जोराचा हल्ला केला ।
अन् कल्याणचा सुभा मराठयांनीं आणला हाताला ॥
कैद केलं सुभेदाराला । कैद केलं त्याच्या सुनेला ।
सारी वार्ता कळली शिवाजीला । तंवा राजा कल्याणला गेला ।
अन् मोठा दरबार त्यानं भरविला । बक्षिस, वस्त्रं नजराणे दिले कितिकाला ।
आबाजी सोनदेव बोलला शिवाजी राजाला ॥
"महाराज, लूट ही आणली आपल्या चरणाला ।
पण त्या लुटींत अशी एक वस्तू सांपडली आहे कीं
तशी कुणी कधिं नसेल पाहिली या काळा" ।
असं म्हणून बोलती चालती नार आणली सदरेला ॥१॥
लावणी
पाहुनी रुप तिचं सुंदर । लाजला हृदयीं रतीचा वर ।
इंदिरा आली भूवर । मनोहर नार ॥ खरी ॥ जी ॥
वेचुनी तिळ तिळ जगिं सुंदर । घडविलं रुप तिचं मनोहर ।
जणुं मदनानं खंजीर । केला तय्यार ॥ खरा ॥ जी ॥
पोवाडा चाल
रुप पाहुनी चकित झाला दैवि गुणांचा तो पुतळा ।
सात्त्विकतेचे भाव उमटले बोलू लागला तरुणीला ॥जी॥
"आईसारख्या तुम्ही मजला बाई सांगतों तुम्हांला ।
भिऊं नका तुम्ही जावें येथून त्रास न कसला जीवाला" ॥
चाल
शिपायांच्याकडं मग वळून शिवबा बोलला ॥
"ऐकावे बोल मोलाचे आतां या वेळां ॥
कटाव
स्त्री दुसर्यामची आपली माता । विचार हा आणावा चित्ता ।
कराल कोणी विटंबनेला । तर कडेलोटाची शिक्षा त्याला ।
हात तोडुनी, डोळे काढुनी, गर्दन उडवू, निश्चय झाला ॥
चाल
कोण स्त्री जर हातीं लागली करा तिचा तुम्ही सत्कार ।
सन्मानाने तिला वागवा तरीच तुम्ही झुंजार ॥
आज्ञा माझी कडक अशी ही कळवा सगळ्या लोकांला ।
या आज्ञेच्या मर्यादेंतुन राजा ही नाहीं सुटला" ॥
असं म्हणून मानानं पाठविलं मग तिला ॥२॥
मौलाना, सुनेसह गेला विजापूरला ।
अन् अहमद दरबारांत गेला आणि लागला सांगायला लोकांला ।
शिवाजीनं पुंडावा केला । त्याला धरुन आणिल असा कोण आहे बोला ? ।
शिवाजीला धरणं हें कार्य बिकट वाटतं मला ॥
चाल
घालूनिया घेर धरलं या सुभेदारा । तुमच्या ।
बोरघाटीं तो खजिना झुंजुनिया दूर नेला ।
मारुनिया ठार सारा दूर पळविला । खजिना ।
सून माझी फार प्यारी । दूर गेले घेऊनिया ।
शिवा लेकिन बहोत अच्छा । सोडलं आम्हां दोघां ।
येत केव्हां जात केव्हां ठावं नाहीं हें कुणाला ।
लढनेवाला है मराठा । नाश हा झाला समजा ।
सभा झाली बरखास्त गेले सारे निघून त्या वेळा ॥
असा पाहिला विजय मोठा मिळविला ।
शिवाजीचे नांव हो झाले चारी बाजूला ॥३॥
छत्रपतींचा पोवाडा (पोवाडा) - शाहीर पां.द.खाडिलकर
येईल मग स्फूर्ति । जाई भयभीति पार विलयाला ।
बाळपणीं झेंडा उभा केला । स्वराज्याचा इमला बांधून धन्य तो झाला ।
पांडुरंग शाहीर गातो त्याच्या कवनाला ॥ध्रु०॥
असंख्य तारे तेजबलानें शोभविती आकाशाला ।
परि शुक्राचा तारा एकच खेचुनि घेतो डोळ्याला ॥
दाहकता सूर्याची भरली शिवरायाच्या मूर्तीत ।
तशि मोहकता चंद्राची ती भरुनि राहिली देहांत ॥
वटवृक्षाची विशालता ती कडुलिंबाची कडवटता ।
आम्रफळाची रसाळता ती बाभळिची ही कंटकता ॥
अथांग गंभिरता दरियाची सरोवरची गोडी ती ।
हिमालयाची असे भव्यता उदारता पृथिवीची ती ॥
वैराग्याची शोभा दिसली शिवरायाच्या वृत्तींत ।
सत्पुरुषांचें दर्शन होते शिवरायाच्या प्रतिमेंत ॥
हयपति गजपति धनपति राजा पति सर्वांचा जरि झाला ।
त्यागी जीवन नित्य तयाचे नमन असो त्या शिवबाला ॥१॥
चाल
जुलमाचे घोर थैमान माजले सारे ॥
वीरत्व लोपले भ्याड झाले हो सारे ॥
थरथरती अन्यायापुढे लोक हो सारे ॥
चाल
अशा वेळीं जन्माला आला । एक बाळ धीर देण्याला ।
जिजाईच्या पोटीं जन्मला । शिवराय नावानं बाळ चमकुं लागला ।
जिजाईनं धर्म शिकविला बाळ शिवबाला । दादाजी कोंडदेव गुरु राष्ट्रकार्याला ।
पारतंत्र्य दूर करण्याचा निश्चय केला ॥ बाळ आठ वर्षाचा झाला ।
तेव्हा तेज त्याचे पसरले चारी बाजूला ॥
खाटकाच्या सुर्याेखालून सोडवल एका गायीला ॥२॥
चाल
रोहिडेश्वरई शपथ घेतली राज्य हिंदवी करण्याला ।
तोरण गड सर करुनि बांधले तोरण त्यानें किल्ल्याला ॥
जुलूम लोकांवरचे सारे हळुहळु त्यानें थांबविले ।
जीवावरचे सारे धोके धैर्यबळानें संपविले ॥
चाल
सूर्य असा हा हळुहळु चढला ।
अंधार सारा लोपून गेला ।
घुबडांचा घूत्कार थांबला ॥
चाल
अफझल, फाझल, शिद्दी जोहार शाहिस्ताही हारविला ।
औरंगजेबाला पार चकविले, आग्र्याजहुन सुटुनी आला ॥
लहानपणापासून संकटें अशी आलि बळि घेण्याला ।
तरी त्या वरती मात करोनी शिवाजी आला उदयाला ॥३॥
चाल
शिवरायाच्या मनोमंदिरी होति देवता जिजाई माता !
स्फूर्ति देवता । सत्त्व देवता । तुळजापुरची भवानी माता ।
युद्ध देवता । शौर्य देवता । रामदास गुरु राष्ट्रदेवता । तुकाराम वैराग्यदेवता ॥
चाल
१६७४ सालीं । रायगडावरी अभिषेक झाला राजाला ।
हर्षली धरती शिवाजी राजा गरिबांचा वाली झाला ॥
शिवछत्रपतीचें नाव दुमदुमे जगतीं ॥
चाल
खडा केला भित्रा माणूस । झुंज देण्याला ॥ जी ॥
भ्याडपणा गेला विलयाश । ढाल-तलवार हाती घेतली ।
थरकांप सुटला शत्रुला । त्यानें दिला न्याय सर्वाला ।
माणुसकी मंत्र हा झाला । मग तो जुलुम कोणीही केला ।
तरी त्याचा नाश त्यांनीं केला । असा छत्रपती जगतांत कोणी नच झाला ॥४॥
चाल
बंधुंनो ऐका या वेळां । जिवाजीचे गुण बाणावे ।
विचार हा करा । महाराष्ट्र मोठा होऊ दे ।
नीतिचा झरा ॥ माया ममता वसुंधरेची ।
भेदक दृष्टी गरुडाची । विरक्तता ती वृक्षाची ।
राष्ट्रभक्ति ती, ती त्याची ॥ प्रेमळता ही गोमातेची ।
झेप असे ती चित्त्याची । निर्मला ती त्या संताची ।
तळमळ होती मातेची । अशा गुणांची एक संगती ।
शिवरायाच्या अंगी दिसती ॥
चाल
रामकृष्ण जे कुणी पाहिले जे झाले द्वापारांत ।
कलियुगांत पुरुषोत्तम झाला असा आमुच्या लोकांत ॥५॥
फणस दिसे काटेरी परि तो आंत असे अति गोड गरा ।
वरुनि दिसे तो कडा कोरडा आंत परी अति रम्य झरा ॥
छत्रपती हा राष्ट्रपती हा राष्ट्रोधारक जगिं झाला ।
मानवतेचा खरा पुजारी षड्गुण-संपत्ती त्याला ॥
सर्व धर्म सारखेच त्याला भेदभाव नच चित्ताला ।
जुलुमाचा परि कट्टा शत्रू जुलूम त्यानें चिरडीला ॥
राज्य टाकिले शिवरायानें रामदासांच्या झोळींत ।
असे थोर हे मन राजाचे तोड नसे या जगतांत ॥
मुसलमान ही कैक धुरंधर होते त्याच्या सेवेंत ।
सर्वधर्म ते समान मानुनि राज्य चालवी प्रेमांत ॥
शिवरायाचे गुण हे सारे अंगिं बाणवुन या काळा ।
स्मारक त्याचें मनीं करावे हेच खरे पूजन त्याला ॥
पुतळे देतिल सुख डोळ्यांना, घडवतील गुण तुम्हांला ।
छत्रपतीसम व्हावें मोठे तेच विभूषण सर्वांला ॥
वर्णन किती करुं शिवरायाचें पुरें कधिं नच होणारे ।
जे जे कांही असे चांगलें तें तें येथें दिसणारे ॥
दैवी संपदा पार्थिव देहा इथे राहिली येउनिया ।
भाग्य आमचें म्हणुन लाभला आम्हाला हा शिवराया ॥
सज्जन रक्षण दुर्जन ताडन हेच कार्य त्या पुरुषाला ।
महाराष्ट्राच्या भव्य मंदिरी माता दैवत शिवबाला ॥
मातृभक्त गुरुभक्त शिवाजी तसाच जनता भक्त खरा ।
असे शिवाजी राजे जन हो सदा स्मरा तुम्ही सदा स्मरा ॥६॥
राजमाता जिजाबाई (पोवाडा) - शाहीर पां.द.खाडिलकर
लखूजी जाधव पिता तियेचा सरदार निजामशाहीचा ॥
लखूजी जाधव-कन्या जिजाई मालोजींची ती सून ।
वीरपत्नीध शहाजी राजाची मोठी होती ती गुणवान ॥
चाल
जिजाबाई आमचं दैवत । मोठं जागृत ।
स्फूर्ति ती देत । आजही सार्यात महाराष्ट्रास ।
दुसरें दैवत नाहीं आम्हांस । तिच्या नांवाचा मोठा विश्वास ॥
चाल
गुलामगिरीची बेडी तोडून राज्य हिंदवी करण्याला ।
उत्सुक झाली होती जिजाई, ध्यास लागला जीवाला ॥
चाल
राजमाता जिजा महशूर । दिगंतावर ।
केला तिनं थोर । महाराष्ट्राचा राजा शिवराय ।
दुस्मान करी सदा हाय हाय । धन्य ती जिजा आपुली माय ॥
चाल
शिवनेरीला जन्म जाहला शिवाजीचा त्या वेळेला ।
महाप्रतापी बाळ जन्मला, आनंदाला भर आला ॥
जिजाबाई देई शिक्षण शिवाजी बाळाला ॥
रामायण महाभारत शिकवी ती त्याला ॥
दुष्टांचा नाश करण्याला । रामकृष्ण अवतार झाले शिकवलं त्याला ॥
लहानाचा मोठा बाळ झाला । अन्यायाची चीड ये त्याला ।
देवधर्म साधुसंताचा भक्त तो झाला ॥१॥
जिजाबाई आणि शिवराय गेले पुण्याला ॥
दादोजी कोंडदेव होते गुरुजी त्याला ॥
हिंदवी राज्य करण्याचा संकल्प केला ॥
तवां बोलला बाळ आईला । "आई आशीर्वाद दे मला ।"
रोहिडेश ठेवला साक्षीला । आणि हिंदवी राज्य करण्याच्या घेतलं शपथेला ॥
जिजाबाई बोलली त्याला । "बाळा ! आशीर्वाद हा तुला ।
जगदंबा तुझ्या पाठीला । भारी होशिल कळिकाळाला ।
शिवशंकर यश देणारा । धन्य धन्य माता ती धन्य बाळ तो झाला ॥२॥
शिवाजीचं मन तिनं भारलं थोर पराक्रम करण्याला ।
राजा शिवाजी तिनं घडविला, राज्य हिंदवी करण्याला ॥
संकटं आली मोठमोठालीं शिवरायावरती जेव्हां ।
’पुढेंच जा तूं, मागें सरुं नको’, माता बोलली हो तेव्हां ॥
"देवी भवानी प्रसन्न तुजला देईल यश तुज चौफेर ।
तूं सिंहाचा बच्चा, लांडगे कसे तुला रे धरणार" ॥
चाल
चालून आल अफझलखान । केली त्याचा दाणादाण ॥
चालून आला फाजलखान । निसटून गेला वीर महान ॥
चालून आला शास्ताखान । बोटं छाटून केला म्लान ॥
सिंह आग्र्याला सांपडला । तेथूनी पण सुटुनी आला ॥
कैक संकटें प्राणघातकी शिवबावरती जरि आली ।
तरी न माता डगमगली ॥३॥
चाल
धीर देत ती पुढे चालली ।
शिवराज्याभिषेक सोहळा तिनं पाहिला ।
तृप्त झाला मातेचा डोळा ।
चाल
शहाजी राजे नव्हते परि ते सौख्य सोहळा बघण्याला ।
मनांत येऊन खिन्न जाहली वीरपत्नीा ती त्या वेळां ॥
पंधरा दिवस ही पुढें न जगली इहयात्रा ती संपविली ।
जगदंबेचे नांव घेऊनी परलोकीं निघुनी गेली ॥
चाल
पाचाड गांवी अंत तो झाला । रायगडाच्याच पायथ्याला ।
धन्य शहाजी धन्य जिजाई धन्य शिवाजी जगिं झाले ।
मायबाप ही धन्य पुत्र हा धन्य असे जगतीं झाले ॥
घरांघरांतून दर्शन होईल जिजामातेचें ते जेव्हां ।
भरभराट होईल देशाची निश्चित जन हो मग तेव्हां ॥
जिजाई व्हावें जगांत तुम्ही आयाबहिणींनो ही विनति ।
पांडुरंग शाहीर जाहला कीर्ति गावया सिद्धमति ॥४॥
Thursday, August 13, 2009
वीररत्ना तानाजीराव मालुसरे (पोवाडा) - शाहीर पां.द.खाडिलकर
स्वातंत्र्यसंगरीं अर्पुनि शिरकमलाला, स्वातंत्र्यदेविच्या पदीं लीन जो झाला,
तो धन्य धन्य ! नरवीर कीर्तियुत होई, ईश्वर त्यावरि संतोषला ॥ध्रु०॥
चौक १
एके दिवशीं जिजाई पहाटेला । बोलत शिवाजीला ।
"कोंडाणा जंवा दिधला । यवनाला घाला तंवा पडला ।
राज्याला मोंगल काळ झाला । चित्ताचा धीर सकळ सुटला ॥
सारा मुलुख ताब्यांत ठेवण्याला । किल्ला पाहिजे झाला ।
स्वाधीन; आपणाला । ना तरी सदा काळिमा लागला ।
राज्याला तसाच कीर्तीला ॥ पाहिजे विचार हा केला ॥
रामकृष्ण तुमचे पूर्वज । जनक धर्मराज ।
धरावी त्यांची लाज । रावणाला धाक ज्यांचा पडला ।
कंसाला धाक ज्यांचा पडला; । पृथ्वीचा भार कमी हो केला ॥
ज्यांनीं धर्म सकळ बुडविला, । देश चिरडिला, ।
त्यांच्या नाशाला । घेतसे देव नविन अवतार; ।
दुष्टांचा पूर्ण करित संहार; । लक्षांत घ्यावा तोचि व्यवहार ॥
चाल
हें राज्यपद बहु कठीण पृथ्वीवरी ॥ ती भोगलालसा सदा जगीं वावरी ॥
षड्विकार होती बहु प्रबळ अंतरीं ॥ मग शुद्धबुद्ध होईल कावरीबावरी ॥
मग दृष्टि राहिल सदैव पापावरी" ॥ ऐकून आईचे बोल ।
शिवराज चित्तिं व्याकुळ, । म्हणे "माय । काय आम्हि केलं ? ।
कधिं पाप नाहीं बघितलं, । धर्मास नाहीं सोडलं ।
गर्वास उभं कापलं । आळसास नाहीं पद दिलं ।
मन तुमच्या अर्ध्या वचनांत सदा राहिलं" ॥
मग जिजामाउलिनं पुन्हां त्यास सांगितलं, ॥
"जर किल्ला घेण्या ऊशिर । शिवराया ! लागला फार ।
तर हिंदुधर्माचं शिर । तर महाराष्ट्राचं शिर ।
मोंगल उडवि सरसर । धर्माचा होइल चूर । पापाचा वाहिल पूर" ।
डोळ्यांत अश्रु सांठले कंठ दाटला ॥ गहिंवरल्या कंठामधून शब्द उमटला ॥
"माघाच्या वद्य नवमीला । तो किल्ला पाहिजे सर झाला ।
करि पूर्ण आस ही बाळा " । शिवराज बोलले नमून मातृपदाला ॥
चाल
"जर पूर्व-पुण्याई केली । असेल लाभली ।
होइल शिव वाली । माउली । आज निश्च्य केला ।
माघाच्या वद्य नवमीला । जोडिन किल्ला मराठेशाहीला" ॥१॥
चौक २
उमराठं गांव छानदार । सुरेख घरदार ।
लावली तलवार । कमरेला, धाक यमाला पडला ।
पाताळीं काळ जाउन दडला । सौख्याला सदा मोहोर आला ॥
जसा जयंत शोभत इंद्राला । अभिमन्यु अर्जुनाला ।
स्कंद शंभूला । रायबा तसा तानाजीला ।
रायबा तसाच जनतेला । सौख्याला सदा बहर भरला ॥
शेलारमामा सांगत तानाजीला । "रायबा थोर झाला ।
आला हो लगिनाला । कराव औंदा लगिन ह्याचं ।
पाहुंद्या लगिन नातवाचं । चार इसावर हो वय आमुचं" ॥
तानाजिनं होकार तंवा दिला । सोयरा बघितला ।
मुहुर्त मग ठरला । माघाच्या वद्य नवमीचा ।
थाट लइ झाला तय्यारीचा । वर्णील कुठवर ही वाचा ॥
चाल
तंवा सम्द लोक जमुनशान बोलती तान्यास ॥
"लइ तान्या मोठा झालास शिवबाचा दास ॥
त्येचं थोरपण नावरुप सांगशि आम्हांस ॥
त्या शिवरायाच्या पायीं वाहिलं जीवास ॥
घरदार सोडून दिलं त्याच्या कार्यास ॥
त्यास आम्ही कधीं पाहावं ? । त्यास आपण कधीं देखावं ? ।डोळ्याचं पारणं फेडावं ? । ’हा ताना शिवरायाच्या मर्जीतला’ ॥
असं कौतुकानं सदानीदा सांगशि आम्हांला ॥
या वेळेस त्यास आणवावं । त्येनं आमचं गांव पहावं ।
त्येनं आपलं राहाणं देखावं । हें असं ध्येनांत धरावं ।
जा शेलारमामा ! तुम्ही तुम्ही त्यास आणावं" ॥
चाल
तानाजिनं इचार जरा केला । मामास सांगितला ।
रायबा संग घेतला । तिघेहि झाले घोडयावर स्वार ।
बाळ तरुण म्हातारपणाचा अवतार । जाहला जगांत जयजयकार ॥२॥
चौक ३
ऐका तंवाच राजगडावर । झालेला प्रकार ।
युद्धास घनघोर । आलं हो मूळ, प्रसंग थोर ।
ऐकावं शांत होऊन सारं । चित्ताचा सोडुं नव्हे धीर ॥
’युगत करुन शिवाजी सुटुन गेला । दिल्लीहून आला ।
मराठया प्रांताला । होईल राग त्याचा अनिवार ।
करिल गट्ट मोंगल सरकार । दक्षिणेंत होईल मराठा कारभार’ ॥
औरंगजेबानं विचार असा करुन । पन्नास हजार देऊन ।
शिपाई शिस्त करुन । धाडिला उदयभान सरदार ।
कोंडाणा किल्ल्याचा सम्दा अधिकार । शाहानं दिला तयास बहुकाळ ----॥
असा कागद घेऊन हेजिब आला । जयसिंगानं धाडियेला ।
त्याच समयाला । रायाच्या चैन मनाला पडेना ।
तान्ह्याच्या राया करित स्मरणा । नव्हते कां दुसरे सरदार नाना ? ॥
चाल
हा विचार करिती शिवबा किल्ल्यावरी ॥ तों तानाजी पोंचले राजगडावरी ॥
ती अक्षत देण्या झाली त्यांची तय्यारी ॥ ती जिजामाउली त्यांची इचारपुस करी ॥
हें जाणून ताना चपापला अंतरीं ॥ हें असें कसं आज झालं ।
शिवरायानं नाहिं देखिलं । त्येच्या मनांत काय हो आलं ।
तें अजून नाहिं समजलं । लगिनास आलों आम्ही त्याला बोलावायला ॥
परि येत्या वेळेला सकून सुभ नाहिं झाला ॥ तर त्यास जाऊन भेटावं ।
त्येचं मन सम्द वोळखावं । शिवबानं सदा म्होरं यावं ।
आधि कडकडून भेटावं । मग आमचा हात धरुन किल्ल्यावर न्यावं ॥
परि असं कसं आज व्हावं । याचं कारण त्याला पूसावं ।
मग मामा ! लगिनामंदि एकमन व्हावं’ ॥मग तडक तिघे निघाले । सरासर गेले ।
जेथे शिव बसले । युद्धाचा करित सकळ विचार ।
देशाचा होते करित संसार । आयास म्हणुन पडतोय फार ॥३॥
चौक ४
पाहुन तान्याला शिवाजि पुढं झाला । हातानं धरियेला ।
आणुन बसवीला । विचारी क्षेम तानाजीरावाला ।
मामाला आणिक रायबाला । येण्याचं तसं कारण त्याला ॥
चिंतेच्या अधीन पुरा । रायाचा चेहरा । तानाजीस दिसला ।
बोलला शूर मराठा सरदार । धैर्याचा मूर्तिमंत अवतार ।
प्राणाचा नाहिं तयास दरकार ॥ "तुमचं कुशल आधीं ऐकावं ।
मनानं आनंदावं । नंतर परिसावं । आमुचं; हाच उचित व्यवहार ।
राच्याचा दिला देवानं अधिकार । सांगावा आपला कुशल समाचार ॥
जसं प्रसन्न तुम्हां पाहिलं । पूर्वी मन धालं ।
नाहीं तसं देखिलं । भेटिच्या आजच्या समयाला ।
चंद्राला राहू चिंतेचा लागला । चित्तान असा कयास केला" ॥
शिवराज छत्रपति बोले । "विशेष नाहीं झालं ।
विचार सारं चुकलं । आपुलं, असे कुशळ आमचं ।
आतांच तानाजीराव येण्याचं । सांगावं काय कारण तुमचं " ॥
चाल
मालुसरे लागले बोलण्याला, आनंद जरा झाला,
तांदुळ पुढं केला, चित्ताचा हो बाग; परि गेला ।
घटकेंत वाळुनी सारा ! ॥ "शेलारमामानं सांगितलं आम्हांला,
रायबा थोर झाला, आला हो लगिनाला, सोयरा बघितला,
मुहूर्त मग ठरला, माघाच्या वद्य नवमीला ॥
सारे लोक बोलले आम्हांला, ’ऐशा समयाला,
शिवबा पाहिजे आला, आमच्या गांवाला भेट देण्याला,
होईल तोष डोळ्याला’ ॥ सारीं कामं ठेवून बाजूला,
जिजाईमाईला, घेऊन गांवाला यावं लगिनाला,
तोष, दासाला । होईन, धन्य भूपाला" ।
खळबळे प्रेम चित्तांत, आनंद मिळत दुःखांत ॥
शिवराज बोलले तान्यास, ॥ "आमचं मन धांवे येण्यास, ॥
चाल
पर शरीर दुसर्या कामावर । झालं तय्यार ।
घेऊन समशेर । कोंडाणा किल्ला कराया सर ।
माउलिनं घातली शपथ घोर । पुरवावी हीच आशा थोर" ॥४॥
चौक ५
’माघाच्या वद्य नवमीला । किल्ला पाहिजे झाला ।
आपला जन्माला ! ना तरी गनिम खास बसला ।
काळिमा लागेल कीर्तीला । जन्मुन काय उपयोग केला’ ॥
अशि शपथ घातली माउलिनं । प्राणहि अर्पुन ।
करिन स्वाधीन । कोंडाणा, जावें तुम्ही परतून ।
रायबाचं लग्न टाकावं उरकून । थाटानं यावं नंतर परतून ॥
या वेळेस स्वारिवर जावं । स्वताच अनुभवावं ।
युद्ध करावं । आशा ही झाली आम्हां अनिवार ।
हातांत घेतलि भवानी तलवार । आम्हां श्रीअंबाबाई आधार" ॥
हे शब्द हृदयिं झोंबले । मर्मिं लागले । ताना मग बोले ।
संचरे आर्यतेज हृदयांत । संचरे क्षात्रतेज अंगांत ।
उपमा नाहीं तिनहि लोकांत ! ॥ "आधीं लग्न लाविन कोंडाण्याचं ।
नंतर रायबाचं । हेंच ब्रिद आमुचं । वाहिला देह त्याच कार्यास ।
युद्ध मोक्षाचं दार आम्हांस ! । आपलं साह्य दीन दासास ॥
चाल
जरि आमच्यासारखं पडतिल लोक रणावर ॥ महाराज !
तरी मिळतील रोज भाराभर ॥ रंगेल लाल रक्तानं त्यांची समशेर ॥
आपण जर जाल बिनिवर । बरंवाईट झालं तर ।
मिळतील काय अवतार । दिसतात सूर्य कां फार ।
दिसतात तारे भरपूर । आमच्यासारख लोक घरोघर ।
तुमच्यासारख येक होणार । राहो लोभ तुमचा आम्हांवर ।
करो दया आज शंकर । सोडा हुकूम जाण्या रणावर ।
माघाच्या वद्य नवमीला किल्ला हो सर ॥
झालाच असं समजावं तरिच हा वीर ॥
ना तरी अंबेच्या पायीं वाहिन शीर !" ॥
चाल
अशि प्रतिज्ञा करुन निघाला । सुचेना अन्य त्याला ।
गात कवनाला । बंधुनो ! ऐका चरित्र त्याचं ।
शूराचं प्रतापि पुरुषाचं । पावन होईल मन आमुचं ! ॥५॥
चौक ६
लगिनाचा बेत रद्द केला ॥ घेऊन सूर्याजिला ।
टेहळणी करण्याला । चालला वेश करुन न्यारा ।
वळविलं रायाजी नाईकाला । ऐकावं त्येच्या पोवाडयाला ॥
घेरेसरनाईक रायाजी । मोठा रणगाजी । म्हणतो परी ’हां जी !’ ।
यवनाला, मोह मनाला पडला । मोंगलाचा दीन चाकुर बनला ।
मर्दाचा सम्दा इचार चुकला ॥ त्येच्या मुलीच्या लग्नामंदि गेला ।
तान्हा गोंधळाला । गात कीर्तीला । शिवबाच्या, झाला सारा लोक गार ।
चित्ताला त्यांच्या त्यानं केला वार । हातांत ओढली त्यांनीं तलवार ॥
रायाजी नाईक बोलला । तंवाच गोंधळ्याला । जाणलं त्येनं त्याला ।ज्याची हो खूण त्याला कळणार । चित्ताचा झाला त्याच्या निर्धार ।
यवनाचा आला त्यास तिटकार ॥
चाल
"अक्षि रावजी ! तानू गोंधळ्याला ।
वळखिलं सम्दं ! तुम्हाला ! गोंधळ्याचा पोशाख केला ।
अन् माझं मन पाहण्याला आला व्हय ? । केल आज पुनित देहाला ।दयेचा समिंदर झाला । काय हुकूम सांगावा मला ।
लइ दिसानं योग हा आला । आज जीव आमचा वाहिला शिवबादादाला ॥
देवलोक सम्द खाली आलं वाटतं आम्हाला ॥ राखाया गोरगरिबाला ।
राखाया गाय माउलीला । राखाया आपल्या धर्माला ।
धन्य धन्य तोड गावना तुमच्या कीर्तीला ! ॥"
तानाजी लागला बोलण्यला । "दावावा बुरुज आम्हाला ।
पाहुं द्या तट आम्हांला । रोखुं द्या जागा आम्हांला ।
जिथ्नं चढुनशान गांठावं उदयभानाला" ॥
चाल
घेरेसर रायाजि नाइकाला । घेऊन संगातीला ।
रोखुन बुरुजाला । परतले तानेराव सरदार ।
भवानी साह्य ज्यास करणार । वर्णन त्याचं कसं हो सरणार ॥६॥
चौक ७
तीन इसा मावळं संगातीला । घेऊन जाण्याला ।
सांगुनशान भावाला । चालला ताना कोंडाण्याला ।
पूजिलं शंभुभवानीला । घेतलं तीस आपल्या मदतीला ! ॥
निघतांना सांज लइ झाली । दौड परि केली ।
गांठली जाळी । राच्चं नौधाव्या घटकेला ।
काळोख सर्वामंदि भरला । घुबडांनीं गोंधळ लइ केला ॥
झुंजार बुरुज गांठला । येशीच्या शेंपटीला ।
लावुन सोलाला । बोलला तान्हा घोरपडीला ।
चित्ताला त्याच्या घोर पडला । पडलेला दूर तिनं हो केला ॥
’यशवंती ! सदा यश दिलस । म्हणुन ठेवलं ।
नांव तुझं भलं । देइ ग आज बी तेंच मजला ।
पुरविन तुझ्या कौतुकाला । घालिन खायला ग्वाड तुजला !’ ॥
असं म्हणुन सोडलं वर तिला । गेली सरसरा । आला पर फेरा ।
दैवाचा, बाई खालतं फिरली । पहिल्यांदा तिनं ही कच खाल्ली ।
असली ती गोष्ट कधिं न झाली ! ॥
चाल
मग तान्हा बोलला रागानं येशवंतिला ॥
"आज इचार काय ग तूं हा केलास ?
असा कधिं नाहीं बघितला । अपशकुन आज मला झाला ।
पर आमचा देह कधिं मागं नाहीं परतला ॥
आणि एकदां सोडतो वर तुला । ततं चिकाट धरुन धीराला ।
नाहिंतर उडविल तलवार तुझ्या ग मुंडक्याला" ॥
घोरपड धांवली सरसरा । वर बसली पाहुनी थारा ।
मग तान्हा झाला सामोरा । त्यानं घट्ट धरलं सोलाला ।
हिस्का मारुन् पाहिलं दोराला । सरसर चढाया लागला ।
जीवाची फिकीर नाहिं त्याला । ’चला या हो’ बोलला लोकाला ।
झरझरा मावळा चालला ! वर भगवा झेंडा चालला ! ।
झट्कनं तान्हा झुंजार-बुरजावर गेला ! ॥
अक्षि वायसा सुद्धां गलबला । मावळ्यांनी बघावा नाहीं केला ।
तत मांसारक्ताचा काला । मावळ्यांनीं बघावा लई केला ।
असा धुमाकूळ माजला । तंवा कळल त्येंच्या लोकाला ।
खडबडून जागा मग झाला । मोंगलभाई बोलला ।
’सैतान किल्ल्यावर आला’ । ’या कोणि राखा आम्हाला ’ ।
चाल
आतां कोण कसला येणार । तुजला राखणार ।
ताना घेणार । नरडिचा घोट होउनि लाल ।
केल्या पापाच फळ भोगाल । आला या मर्तभूमिवर काळ ॥७॥
चौक ८
अशी कत्तल करुनि सरसरा । सांठवुनि शिरा ।
करुन मलमाला । आईच्या तान्हा लावि हृदयास ।
आला हो आला पूर शौर्यास । देखिलं त्यानं उदयभानास ॥
"हरहर महादेव" बोला । आला ऊत भला ।
खोर्यामदिं भरला । भानाला तान्हा सिंहापर खास ।
थरथरे काळ पाहुनी ज्यास । धांवला तो पारतंत्र्य चिरण्यास ॥
उदयभान वीर खळवळे । लाल झाले डोळे । तान्हा मग बोले ।
भानुला, देहभान नुरे त्यास । धर्माचा लागे त्याच्या मनीं ध्यास ।
भानुच्या उदयिं गुंतली आस ॥
चाल
"तूं उदयभान सरदार । रजपूत जातिचा वीर ।
तू हिंदुधर्मा आधार । तू हिंददेशा आधार ।
रामकृष्ण तुमचे पूर्वज होते नरवीर ॥
गायिवासरं पाळुनी कृष्ण झाला लइ थोर ॥
आज शिवानं घेतला अवतार । त्यास यश खास येणार ।
तू मातिमोल होणार । घरची बाईल ओढुन नेती ।
टकटका बघाया लावती । चरचरा गाय कांपिती ।
घटघटा रगात पिती । आमचं देव समदं फोडिती ।
धर्मास दुष्ट तुडविती । तोंडांत मांस घालती ।
साधुसंता त्रास लई देती । बायकाच्या अंगा झोंबती ।
त्यांची करणी सांगावी किती ? । अभिमान गेला शौर्याची झाली बघ माती ! ॥
चाल
तूं शूर मर्द सरकार । धर्मा आधार ।
जातिशीं वैर । साधुनी जाशि घोर नर्कांत ।
येउं दे आंर्यतेज अंगांत । होईल कीर्ती तिनही लोकांत ॥८॥
चौक ९
उपदेश गेला परि वाया । सत्तेची माया ।
सूडाची छाया । पसरली उदयभानावर खास ।
मोगलाचा धरला त्यानं विश्वास । जोरानं धांवला वार करण्यास ॥
तानाजी सिंह खवळला । धावुन गेला ।
पट्टा लइ फिरला । युद्धाला आला रंग अनिवार ।
बिजलिची करणी करित तलवार । दोघेही होते मोठे लढणार ॥
दैवाची करणी परि न्यारी । फिरला माघारी ।
देव कंसारी । भानानं केला तान्यावर वार ।
डाव्या हाताला रक्ताची धार । लागली; पडली भूमिवर ढाल ॥
गुंडाळून हाताला मुंडासा । झाला कसाबसा ।
सज्ज, परि फांसा । दैवानं घातला, कोण काढणार ? ।
दैवाला दया न कधिं येणार । भाळीं जें लिवलं तसंच घडणार ! ॥
तो धैर्यमेरु उमळला । धरणीला आला ।
झाला जीव गोळा । सोडुन देह गेला स्वर्गास ।
भानानं हाणली लाथ डोक्यास; । पापाची भरली त्याच्या घडी खास ॥
चाल
इतक्यांत टोळी घेऊन सूर्या वर आला ॥ त्येनं पाहिलं पळत्या लोकाला ।
त्येनं पाहिलं पळत्या मावळ्याला । "कुठं जाता ?" बोलला तो त्याला ।
सूर्याला मावळा बोलला । ’अहो ताना पडला धरणीला मोठा घात झाला’ ।
डोळ्यांत अश्रु दाटला । पर मोठा धीराचा तो पडला ।
तलवार रोंखुन बोलला पळत्या लोकांला ॥ "अर भित्र्या लोकांनो ?
जरा । ईचार मनामंदी करा ! । अर लढुनशान तरि मरा ।
इथनं पळुनशान जाऊन अमर काय झाला ? ॥
जो भ्याड पळपुटा झाला । तो खास गेला नर्काला ।
ठेवावं खालतं भाल्याला । नेसावं चोळीलुगडयाला ।
कमरेच्या सोडून शेल्याला । नेसावं बायकी शालुला ।
डोक्याला लावुन कुंकवाला । हातात भरुन बांगडीला ।
मग पळुनशान जाऊन राखा जीवाला ॥ काय आल्या धरुन दोराला ।
जाणार सांगाव मला ? । तो दोर तुमच्या आधींच झुंजुन मेला ! ॥
लइ जपुनशान जीवाला । कायमचं काय राहिला ।
इथनं जाउन्शान गांवाला । सांगाल काय राजाला ? ।
’हर हर महादेव’ बोला । चला घुसूनशान् उडवुया लाख मुंडक्याला" ॥
चाल
धन्य ! धन्य ! सूर्याजीराव ! उतराई व्हावं ।
कशानं सांगावं । भावाचं दुःख लोटुनी पार ।
देण्याला जीव झाला तय्यार । घेऊन याल कधीं हो अवतार ! ॥९॥
चौक १०
पुन्हां सारा उलटला भाला । मावळा एक झाला ।
केला मग हल्ला । मोंगलाची झाली तारपिट फार ।
पळती हो खाल्ला त्यांनीं लइ मार । घेण्याला लावली त्यांना माघार ॥
मामाची झुंज लागली । भानाशीं भली ।घालुन खालीं । भानुला धाडलं घोर नर्कांत ।
फडफडे भगवा झेंडा किल्ल्यांत । प्रसिद्ध झाला तिनहि लोकांत ॥
वृत्तांत सारा घडलेला । कळला राजाला ।
लागली डोळ्यांला । पाण्याची धार, गेला आधार ।
शिवबाला तान्हा प्राणापर प्यार । दुःखाचा झाला त्यास लइ भार ॥
हुंदक्यानं आला उमाळा, । शिवबा बोलला ।
"हाय ! घात झाला । ठेवुन पृथ्वीवरती आम्हांस ।
सोडुन गेला । तान्हा स्वर्गास ! । दैवाला नाहिं दया लव खास ॥
चाल
स्वातंत्र्यदेविच्या गळ्यामधुन मणि गळला ॥
काय एकदांच सद्भाग्यचंद्र मावळला ॥
तो देशभक्तिचा सिंधु कोरडा पडला ! ॥
माणीक एक हरपला ! । स्वातंत्र्यहंस तो मेला ।
ताब्यांत आला गड परी सिंह तो गेला ! ॥
पांडुरंग शाहीर गातो त्याच्या कवनाला ॥१०॥
ठकास महाठक (पोवाडा) - शाहीर पां.द.खाडिलकर
योजून पार झाला । शेराला सव्वाशेर शिवराय ।
दिल्लिपति सदा करित हाय ! हाय ! ! ।
पोवाडा पांडुरंग कवि गाय ॥ध्रु०॥
चौक १
जंवा पुरंदरचा तह झाला । शाहा खुष झाला ।
जयसिंगाला । शिवाजीनं मदत केली हो फार ।
आदिलशाही त्यानं केली बेजार । शौर्याची शर्थ केली अनिवार ॥
शाहानं लिहिलं शिवाजीला, । "तुमच्या शौर्याला । तुमच्या कीर्तीला ।
तोड नसे, फिदा झालों मी फार ! । यावं भेटिला, करिन दरबार ।
करिन बहुमान तुमचा मी फार ! ॥ मनिं शंका मुळीं नच धरा ।
माझ्या या घरा । विचार ठाम करा । येण्याचा, तोष होईल चित्तास ।
एकमेकांचा जडेल विश्वास । एकदां आम्हांकडं यावं तुम्ही खास" ॥
विश्वासु मित्र जमविले । किल्ल्यावर भले । राजा मग बोले ।
"गडयांनों ! शहा बोलवी आम्हांस । सल्ला काय तुमचा असल्या समयास ।
धरावा कसा त्याचा विश्वार ? ॥ तरी जावं वाटतंय् मला । भेट देण्याला ।
हिंदुराज्याला । चार शाह्या झोंबती आजच्या समयास ।
कांहीं काळ वश करणं एकास । खास जरुरीचं वाटतं आम्हांस" ॥
सर्वांनीं विचार जरा केला । अभिप्राय दिला । अनुकूल त्याला ।
राजा मग बोलला फिरुन सर्वांस । "शाहाचा मुळीं नसे विश्वास ।
केव्हां दगा होईल कळे ना कोणास " ! ॥
चाल
म्हणुन मोरोपंत पेशवे पंडित; । अण्णाजी दत्तो सुरणीस; ।
निळो सोनदेव मदतीस । तीघांच्या हातीं सोंपविली सत्ता ते वेळा ॥
किल्ल्यांची पाहणी शिवराय करुन हो आला ॥
राज्याचा बंदोबस्त केला । अन् कोण कोण घेतले मदतीला ।
दादांनो ! सांगतों तुम्हाला ॥
चाल
निराजी आवजी न्यायाधीश । बाळाजी आबजी चिटणीस ॥
त्रिंबक सोनदेव डबीर । आणि प्रतापराव गुजर ॥
जीवनराव माणकोजी खास । नरहरपंत सबनीस ॥
राघो मित्र घेतले मदतीस । दत्ताजी त्रिंबक हि खास ॥
हिरोजी फर्जंद वीरास । राजानं घेतलं मदतीस ॥
कित्येक असले सरदार घेतले मदतीला ॥
संभाजी राजपुत्राला । त्येनं संग घेतलं ते वेळा ।
पांच हजार घेतलं फौजेला । भवानीच्या केले स्मरणाला ।
आठवलं रामदासाला । जिजाईला भेटून आला ।
आणि राजा चालला आगर्यााला ॥ दोन महिने लागले जाण्याला ।
शिवाजिला खास राहण्याला ॥ शिवपुरा तयार होता केला ।
ततं राजा जाऊन उतरला । रामसिंग दिला दिमतीला ।
असा राजा थाटमाटानं गेला आगर्यादला ॥
चाल
पुढं काय प्रकार झाला । पुढच्या चौकाला ।
सांगिन तुम्हांला । कथानक गोड मोठं छानदार ।
शिवाजी सांबाचाच अवतार । असा कधिं हिरा पुन्हा होणार ? ॥१॥
चौक २
दरबार शाहानं भरविला । दुसर्याम दिवसाला ।
थाट लइ केला । वाटे जणु ’मयसभा’ ही छान !
कराया शिवाजीचा अपमान । बादशाहा झाला होता बेभान ! ॥
तंवा जमले सारे सरदार । मोठे सुभेदार । शाहीचे नोकर ।
जमले पाहण्याला शिवाजीला । दरबारीं जो तो खडा झाला ।
मनाप्रमाणंच ते वेळा ॥ पच्चिस हात मारतोय उडी ।
शिवाजी गडी । वाघाला फाडी । असला हा वीर कसला झाला ! ।
पाहावं एकदां तरी त्याला । जो तो करि असल्या विचाराला ! ॥
शिवाजीनं पोशाख छान केला । तरवार कमरेला ।
चालला दरबाराला । ज्याचा त्याचा डोळा खिळुन गेला ।
वाटे जणुं मदनाचाच पुतळा । अमीर उमराव थक्क झाला !! ॥
चाल
शिवाजीनं लवुन शाहाला मुजरा तंवा केला ॥
पंधराशें होनांचा वरती नजराणा दिला ॥
सहा हजार मोहरा देऊन बहुमान केला ॥
असा बहाणा राजनिष्ठेचा ठाकठीक केला ! ॥
असा विधि झाल्यावर शहा बोलला शिवबाला ॥
"राजनिष्ठा तुमची पाहुन शाहा खुष झाला ! ॥
जसवंतसिंगराजाच्या खालच्या बाजूला ॥
जा, उभे रहा, तो मान तुम्हांला दिला !" ॥
असं बोलला शहा शिवबाला । शिवाजीचा अपमान झाला ! ।क्रोधाग्नि आंत भडकला ! । जसा सूर्य बारा डोळ्यानं, तसा चमकला ! ॥
जसा वणवा रानाला,तसा राजा भडकला ! ॥
जसा जलधि खवळावा, तसा राजा खवळला ! ॥
तंवा शिवबा बोलूं लागला । अपमान माझा करण्याला । काय इथं आणलं तुम्ही मला ? ।
जो करार जयसिंगराजानं माझ्याशीं केला । तो आज तुम्ही मोडला ! ।
बस्स ! पुरे ! जातों माघारा " । असं बोलला राजा ते वेळा ! ।
सरदार सुभेदार जिरले जागच्या जागेला ! ॥ जणु महारुद्र खवळला ।
शाहानं दरबारच जल्दी बरखास्त केला !! ॥२॥
चौक ३
शिवाजीचा बाणा पाहून । दरबारी खान । गेले हादरुन ।
शहाही झाला थक्क ते वेळा ! । सर्वांची मति कुंठित ।
धाक पोटांत । एक चित्तांत । शिवाजी हो दिसला ! ॥
जंवा शहा विचारमूढ झाला । सुचेना कांहीं त्याला ।
सल्ला देण्याला । आली तंवा त्याची मामी जोरानं ।
नवर्यादचीं बोटं कापली । म्हणुन भडकली ।
बोलाया आली । मामी आणि सून ! ॥
"अवरंग ! ऐक सल्ल्याला ॥ शिव्या आयता हातीं गवसला ।
कैद कर त्याला । कांटा हा झाला । उपटून काढला पाहिजे या वेळा ।
ही संधी आली चालून । जर म्हणसी आतां तूं न न । शिरजोर पुढं होऊन ।
सूडाची ज्योत घेऊन । करिल हैराण । पादशाहीला ! ॥
मामीचा सल्ला हा पटला बादशहाला । शहानं कैद केलं त्याला ।
शिवपुर्या्मधींच शिवाला । कोंडून ठेवलं ते वेळा ।
पिंजर्यां्त कोंडलं सिंहाला । कडेकोट पहारा वाडयाला ।
पोलादखान मुख्य नेमला । पांच हजार शिपाई मदतीला ।
जो राजा भेटीला आला । शाहानं कैद केलं त्याला ! ।विश्वासघात करुनि हो शिवा पकडला !! ॥
शिवाजीला पूर्वी धरण्याला । बडाबडा खान पाठवला ।
पण ज्यानं थांग नाहिं दिला । तो आज कपटजाळ्यांत सिंह सांपडला ! ॥
चाल
दख्खनचा सिंह कैद झाला । आपदा हिंदुराज्याला ॥
बीं नुकतं रुजलं भूमीला । पर भुंगा लागला त्याला ! ॥
स्वातंत्र्यसूर्य उदयाला । पर केतु ग्रस्त करि त्याला ! ॥
या दुष्ट बातमीचा गोळा । दख्खनला जाळत आला ! ॥
जणुं आला वज्राचा घाला ! । काळ मोठा दारुण आला ॥
चाल
काय युक्ति शिवबा योजील । कसा निसटेल ।
सांगे शाहीर । दादानों ! गोष्ट घ्यावी चित्तांत ।
शिवाजीनं केली शहावर मात । कशी ती ऐका पुढच्या चौकांत ॥३॥
चौक ४
जगदंबा गेली सप्नाला । बोलली शिवबाला ।
"भिंऊ नको बाळा ! निरशीन तुझ्या संकटाला" ।
शिवाजीला तोष फार झाला । उपाय एक सुचलां खासा त्याला ॥
आजार्यााचा बहाणा त्यानं केला । अंथरुणाला खिळला ।
निरोप शाहाला । धाडला त्यानं एक त्याच वेळेला ॥
"लोक माझा हैराण झाला । हवापाणी मानवेना त्याला ।
जाण्याला दख्खन देशाला । आतुर फार झाला । निरोप द्या त्याला ॥
चाल
शाहानं विचार मनिं केला । ’देऊं निरोपाला ।
सार्या फौजेला । शिवाजिच्या, जाऊ द्या दख्खन देशाला ।
मग शिवा एकटा राहील । भय त्याचं कमी होईल ।
मग तोच झुरुन जाईल । मरण पाहील । खास आग्या िर ला" ।
लोक सारा पाठवुन दिला । दख्खन देशाला; । थोडा पण ठेवला ।
ठायीं ठायीं गावामध्नं ते वेळा ॥ ते आपला वेष पालटून ।
गावात्नंय राहिले जाऊन । शिवाजीला जाती भेटून ।
नित्य येऊन, । रोजचा नेम झाला ॥ बरं वाटतं आतां जीवाला ।
म्हणून मिठाई तो वाटतो गांवाला । पेटारे जाती भरुन ते वेळा ।
शिवपुर्यांातून रोज किती । नाहीं गणती ।
अचाट हि युक्ति । सुचली शिवबाला ! ॥
चाल
रोज पहारेवाले नेमानं ॥ पेटारे बघती उघडून ॥
आरंभी रोज उघडून । पाहती नित्य नेमानं ॥
पर कंटाळले रोज पाहून । पुढं पुढं पाहतीना कोण ! ॥
ठकालागीं ठक होऊन । शिवाजीनं केलं वर्तन ! ॥
चाल
रोज असा नेम चालला । विश्वास वाटला सर्वांला ।
एके दिशीं शिवानं कळविलं आपल्या लोकांला ॥
"की व्हा तय्यार अमक्या जागेला । आज आज रात्रीं नेमक्या वेळेला" ।
जंवा सूर्य चालला अस्ताला । तंवा त्यानं सोडलं पलंगाला ।
हिरोजी फर्जंद वीराला । त्यानं पलंगावरती निजवला ।
पांघरली शाल अंगाला । शिवाजीची आंगठी हिरोजीनं घातली ते वेळा ॥
अन् हात बाहेर (उघडा) ठेवला । शिवाजीच्या गादीवर हिरोजी हो पहुडला ! ॥
एक मुलगा मदारी मेहेतर चेपतो पायाला । असा सारा देखावा केला ।
अन् शिवाजी पेटार्यां त बसला । संभाजी जवळ घेतला ।
अन् पहार्यापत्नंि बाहेर चालला ! । शिवा गेला ! गेला ! निसटला !! ।
आणि बघतां बघतां शिवराजा नाहिंसा झाला ! ॥४॥
चौक ५
दुसरे दिवशीं पोलादखान आला । पहारा करण्याला ।
थक्क पार झाला ! । गलबला रोजचा दिसेना त्याला ।
सामसूम वाडा शांत दिसला । पक्षी कोंडलेला उडून गेला ! ॥
लगबगीनं शहाकडं गेला । बोलला शाहाला ।
"हुजूर ! घात झाला! । पिंजरा आज रिकामाच पडला ।
शिवा फसवून निघुन गेला ! । गेला कसा ठाव न कोणाला ! ॥
चोवीस तास पहार खडा केला । तरि ही पार झाला ! ।
कळेना कसा गेला ! । काय जमिनीच्या आंत शिरला ।
अस्मानांत काय उडुन गेला । भूत चेटूक साहाय्य त्याला ! ॥
पचीस हात मारतोय उडी । ऐकलं घडोघडी । म्हणुन मोठे गडी ।
ठेवले होते पहार्याीवरती मी खास । फसवून गेला कसा सकळास ।
समजेना गूढ पडलं आम्हांस ! ॥ दांत ओंठ चावले शाहानं ।
मुठी वळून । बोलला रागानं । "गेला कसा ? कुठं हराम सैतान ।
काय करुं !" ----- बोलला दाढी हालवून । गेलं कंबरडं त्याचं वांकून ! ॥
चाल
मग धाडली फौज शाहानं चारी दिशेला ||
’जिथं शिवा दिसेल तिथं पकडा’----हुकुम असा केला ॥
किती स्वार गेले शोधायला चारी बाजूला ॥पण शिवा सांपडेना त्याला । दाढी मिशा काढल्या ते वेळा ।
वेष बैराग्याचा हो केला । अन् चालला राजा मथुरेला ।
अज्ञातवास हा भला । काय धर्मराज प्रगटला ! ।
नलराम पांडवादींना जोड जाहला ! ॥ असो !
आतां ऐका गोष्टीला । मथुरेला राजा हो गेला ।
संभाजी संगें घेतला । कृष्णाजी विसाजी काशिराव मथुरेला ॥
होते, त्यांच्या जवळ संभाजी बाळ ठेवियला ॥
शिवराय गेला मग पुढं काशियात्रेला ॥
हळुहळु राजा मग आला दख्खन देशाला ॥
मग गेला राजगडाला । बालेकिल्ल्याजवळ जरि गेला ।
तरि वळखेना कोणी राजाला ॥ शिपायानं रोखलं राजाला ! ।
आणि आंत निरोप धाडला । कीं "बैरागी एक वर आला ।
अन् भेटायची इच्छा तुम्हांला" । मोरोपंत आले दाराला ।
जिजा माउली आली दाराला । पण वळखेना आई बाळाला ! ।
शिवबानं धरलं पायाला । जंवा हात लागला पायाला ।
तंवा वळखिलं तिनं मग त्याला ! । प्रेमाचा ओघ सुरु झाला ।
अन् शिवाजीच्या हातांतून तिच्या पायामधिं शिरला ॥
पोटाशीं धरलं बाळाला । प्रेमानं डोळा भरुन आला । आनंदीआनंद झाला ॥
चाल
किती तोफा झडल्या ते वेळां । चहुंकडे बातमी देण्याला ।
किती दानधर्म हो केला । आणि पुजा बांधली देवीला ॥
असा कांहीं काळ मग गेला । संभाजी दक्षिणेंत आला ॥
चाल
उघडलं शब्दभांडार । शारदेचा वर ।
तरि न भरपूर । शिवाजिचं यश वर्णाया खास ।
’नेति ! नेति’ ! मौन पडलं सकळांस ।
शाहीर पांडुरंग शिवदास ॥५॥
चाल
मग धाडली फौज शाहानं चारी दिशेला ||
’जिथं शिवा दिसेल तिथं पकडा’----हुकुम असा केला ॥
किती स्वार गेले शोधायला चारी बाजूला ॥पण शिवा सांपडेना त्याला । दाढी मिशा काढल्या ते वेळा ।
वेष बैराग्याचा हो केला । अन् चालला राजा मथुरेला ।
अज्ञातवास हा भला । काय धर्मराज प्रगटला ! ।
नलराम पांडवादींना जोड जाहला ! ॥ असो !
आतां ऐका गोष्टीला । मथुरेला राजा हो गेला ।
संभाजी संगें घेतला । कृष्णाजी विसाजी काशिराव मथुरेला ॥
होते, त्यांच्या जवळ संभाजी बाळ ठेवियला ॥
शिवराय गेला मग पुढं काशियात्रेला ॥
हळुहळु राजा मग आला दख्खन देशाला ॥
मग गेला राजगडाला । बालेकिल्ल्याजवळ जरि गेला ।
तरि वळखेना कोणी राजाला ॥ शिपायानं रोखलं राजाला ! ।
आणि आंत निरोप धाडला । कीं "बैरागी एक वर आला ।
अन् भेटायची इच्छा तुम्हांला" । मोरोपंत आले दाराला ।
जिजा माउली आली दाराला । पण वळखेना आई बाळाला ! ।
शिवबानं धरलं पायाला । जंवा हात लागला पायाला ।
तंवा वळखिलं तिनं मग त्याला ! । प्रेमाचा ओघ सुरु झाला ।
अन् शिवाजीच्या हातांतून तिच्या पायामधिं शिरला ॥
पोटाशीं धरलं बाळाला । प्रेमानं डोळा भरुन आला । आनंदीआनंद झाला ॥
चाल
किती तोफा झडल्या ते वेळां । चहुंकडे बातमी देण्याला ।
किती दानधर्म हो केला । आणि पुजा बांधली देवीला ॥
असा कांहीं काळ मग गेला । संभाजी दक्षिणेंत आला ॥
चाल
उघडलं शब्दभांडार । शारदेचा वर ।
तरि न भरपूर । शिवाजिचं यश वर्णाया खास ।
’नेति ! नेति’ ! मौन पडलं सकळांस ।
शाहीर पांडुरंग शिवदास ॥५॥
शाहिस्तेखानाचा पराभव (पोवाडा) - शाहीर पां.द.खाडिलकर
नाश कराया शिवरायाचा आला शाहिस्ताखान ॥
छाटुन बोटें दूर पळविला; । धन्य शिवाजी भूरमण ! ॥ध्रु०॥
चौक १
केला धुमाकूळ शिवरायानं संकट मोंगल-राज्याला ।
स्वातंत्र्याच्या मुळ्या भेदिती अभेद्य मोंगल-भिंतीला ! ॥
चिरे धडाधड पडूं लागले, बुरुज कोसळे धरणीला ! ।
शिवशक्तीच्या तोफेमधुनी सुटला भीषणसा गोळा ! ॥
शिवतेजाची वीज देतसे झटके औरंगजेबाला ! ।
कांहीं सुचेना, अन्न रुचेना, झोपहि ये ना नयनाला ! ॥
भगवा झेंडा फडफड फडके भूषण वार्याला झाला ।
फडफड करुनी गगनी बोले, ’धन्य शिवाजी अवतरला !’ ॥
दर्याखोर्यांतुन मैदानांतुन पाउल टाकी शिव जेव्हां ।
विजयश्रीचीं फुलें उमलती त्या त्या स्थानीं मग तेव्हां ॥
फिरंग फिरवी शिवबा इकडे, तिकडे मोंगल गडबडला ! ।
टाप घोडिची ऐकुनि तिकडे शाहा कासाविस झाला !! ॥
दर्प असा हा शिवशक्तीचा सहन होइना दिल्लीला ।
रात्र्म्दिन नच झोप कुणाला, काय करावें शिवबाला ! ॥
विचार ठरला, दूत निघाला आला दख्खन देशाला ।
बादशाहाचं पत्र दिलं मग त्यानं शाहिस्ताखानाला ! ॥
"चला, मरा, तुम्हि कांहि करा, पण धराच या शिवचोराला ।
सरा न मागें, घरा न जावें, चराचरा शिवचोर चिरा !" ॥
बादशहाचं पत्र असं हे वाचुन शास्ताखान जरा ।
मनीं चरकला, विषण्ण झाला क्षणिं कोमेजुन ही गेला ! ॥
शुभ्र लोंबत्या दाढीवरचा रंग लगोलग पालटला ! ।
हात मस्तकावरती ठेवुन करि तो घोर विचाराला ॥
"काम असे हें अवघड मोठें शिवा न सोपा धरण्याला ।
पिशाच्च चेटुक अनुकुल त्याला कसें धरुं सैतानाला !!" ॥
स्वारीचा पण निश्चय केला शूर शिपाई जमवीला ।
फौज घेउनी खान चालला शिवरायाला धरण्याला ॥
जातां जातां बेत ठरवला चाकण किल्ला घेण्याला ।
वेढा दिधला मग खानानं सत्वर, चाकण किल्ल्याला ॥
प्रकार पुढचा काय जाहला सांगिन पुढच्या चौकाला ।
धन्य शिवाजी रसिकजनांनो ! ऐका श्रीशिवकीर्तीला ॥१॥
चौक २
नरसाळा फिरंगोजी वर । होता किल्लेदार ।
मोठा बाणेदार । झाला तय्यार संग्रामाला ।
केले घनघोर लढाईला । अस्मानांत धुरळा सारा भरला ! ॥
आटोकाट झगडा त्यानं केला । किल्ला लढविला ।
उपाय पर थकला । खानानं केलं कैद त्याला ।
किल्ला खानाच्या हातीं गेला । नरसाळा धन्य धन्य झाला ! ॥
चाल
शाहिस्ताखान मग त्याला । काय बोलला सांगतों तुम्हांला ।
"र्हा आतां आमच्या चाकरीला । चढवीन मोठया हुद्याला ।
शिवा काय देणार तुला ? । शिवाजीचा नाश करण्याला खान हा आला ॥
शिवाजीचा नाश खास झाला । असं समज आज या वेळा ॥
कोल्ह्यानं सिंहाशीं झगडा कधीं काय केला ? ॥
शिवा चोर बंडखोर झाला । चल माझ्यासंग या वेळा ।
पकडुया बंडखोराला !!" । असं बोलला खान हो त्याला ।
फिरंगोजी लालेलाल झाला ! । फिरंगोजी बोलला खानाला ॥
चाल
"शिवाजीचा बंदा नोकर । नरसाळा अस्सा राहणार ! ॥
शिवाजीच्या पायावर शीर । ठेविन मी, तोच मज प्यार ॥
शिवराय माझा रे मोर । शिवराय चंद्राची कोर ॥
चाल
बडबडसी व्यर्थ या वेळा । जंवा पाहशी खाना !
तूं त्याला । तंवा दरदरेल घाम अंगाला ।
दांतखिळी बसेल तोंडाला । शिवराय सिंह रे झाला ।
लोळविले कैक भूमिला । करुं नको त्याच्या निंदेला ।
जाऊं नको त्याच्या वाटेला । माझ्यासारखे कैक रे वीर त्याच्या पदराला ॥
परतून जा जा माघारा । अन् सांग बादशाहाला ।
कीं शिवाजीला कैद करण्याला । गेलों होतों---आलो माघारा ! ।
जो करील कैद शिवाजीला । असा एवढा सार्या दुनियेंत कोण हि न झाला !!" ॥
चाल
ऐकुनी बोल वीराचे । खान मनीं गारेगार झाला !
पाहून स्वामिभक्तीला । खानाला संतोष झाला ! ।
खानानं सोडलं मग त्याला । अन् त्याचा मोठा गौरव केला ॥
चाल
शिवरायाकडं पाठवलं त्यानं मग त्याला ॥
चाल
चाकणचा किल्ला घेऊन । चालला जल्दीनं ।
मोठया ऐटीनं । पुण्यामंदि थेट खान आला ।
शिवाजीचा वाडा त्यानं घेतला । ऐका प्रकार काय झाला ॥२॥
चौक ३
शिवाजीच्या महालामधिं खान । राहिला येऊन ।
बंदोबस्तानं । जागजागीं ठेवलं शिपायाला ।
हुकुम मनाईचा हत्त्याराला । वेशीवर पहारा रोज बसला ! ॥
खानाच्या परवान्यावीन । फिरकेना कोण ।
पाखरुंहि लहान । एवढा त्यानं बंदोबस्त केला ।
धाक शिवाजीचा वाटे त्याला । रात्रींही झोंप न डोळ्यांला ! ॥
सिंहाच्या गुहेमधिं जसा । ससा कसाबसा ।
शिरावा तसा । शिरला पुण्यामंदि खान ते वेळा ।
मगराच्या दाढेला हात । हात लावला त्यानं निभ्रांत ।
निभ्रांत जाहला भ्रांत । झाला काय वात ।
कळेना मजला ! ॥ शिवराय होता सिंहगडीं ।
घेउन सवंगडी । विचार घडोघडी । घडविती किल्ल्यावरती ते वेळा ॥
शाहिस्ता आला चालून । पुण्यामंदि राहिला येऊन ।
काढावा कसा हुसकून । विचार जोरानं असला हा झाला ॥
पाठवला एक ब्राह्मण । शिवरायाने । पुण्यामंदि त्यानं ।
जाऊन वश केलं एका मराठयाला ॥ एक खोटया लग्नाचा घाट ।
घाट घातला बीनबोभाट । वरातीचा रात्रीला थाट ।
कैला ऐटींत । लोक किति जमला ! ॥
चाल
घाट कात्रजचा जवळ झाला । तीन कोसाच्या अंतराला ।
शक्कल सुचली शिवाजीला । खानाची फौज चकविण्याला ।
पोत बांधवले हो झुडपाला ! । कात्रज घाटांत ते वेळा ।
पोत बैलांच्या हो शिंगाला ! । बांधले खानाला ठकविण्याला ।
झुडपं झालीं साहाय्य शिवाजीला । पशुपक्षी झाले साहाय्य त्याला ।
दुसरा जणु रामचंद्र आला ! । नंदी झाले साहाय्य शंकराला ! ।
गाऊं किती त्याच्या पोवाडयाला ? । इकडं असा त्यानं बेत केला ।
अन् एका बोलावलं मावळ्याला । गवताचा भारा दिला त्याला ।
भार्यामंदि घातलं तलवारीला ! । मावळा पुण्यामंदि घेउन गेला ।
तंवा शिवाजीनं । दहा वीस जण । मावळे घेऊन ।
वेष पालटून । सोडला गड, पुण्यामंदि आला ।
काळोख काळा कुट्ट भरला । वरात आली होती गणपतीला ।
गर्दिमंदि शिवराय हो शिरला । ऐकावं र दादा ॥३॥
चौक ४
लाल महालामधीं येऊन राहिला जरि खान । तरि हालचाल होईना शत्रुपासून ।
खानाला वाटलं शिवराय गेला घाबरुन । बंदोबस्त मोठा पाहून ।
खानाचं मन । होतं प्रसन्न ॥ चहुकडं सामासूम झाली ।माणसं झोंपली । गाढ झोंप आली । खानाला, नव्हतं त्याला देहभान ।
भररात्रीं खिडकी उघडून । शिवराय आणि चार जण । गेले घुसून ! ॥
खानाचा मुलगा ठार केला । झाला गलबला । खान जागा झाला !
पाहतो तों दिसला काय प्रकार । शिवाजी झाला छातीवर स्वार ।
तय्यार झाला कराया वार ॥ बायकांनीं दुःखी होऊन ।
अति गहिवरुन । हात जोदून । विनवणी केली शिवाजीला ।
"आमच्याकडं बघुन या वेळेला । जीवदान द्यावं-थोर झाला !" ॥
चाल
शिवराय बोलला खानाला । "बायकांनीं आक्रोश केला ।
म्हणुन देतों जीवदान तुला । पण ऐक माझ्या बोलाला ।
इथं राहणं योग्य नाहीं तुला । शिवाजीचा मुलुख हा झाला ।
तो घेईल तुझ्या जीवाला । जीवदान देतों आज तुला ।
जर ऐकशील एका गोष्टीला । माझ्या संगं गोटाबाहेर चला; ।
आलं पाहिजे तुम्हां सर्वाला" । खानसाहेब घाबरुन गेला ! ।
हा कोण आदमी घरिं आला । समजेना कांहीं हें त्याला ।
खानसाहेब चालले शिवाजीच्या संग ते वेळा ! ॥
गोटाच्या बाहेर जंवा गेला । तंवा बोलला राजा खानाला ॥
चाल
"धाक ज्याचा बादशाहीला । शिवाजी तोच हा आला ! ॥
जाऊं नको याच्या वाटेला । वाघनखं लाविलं पोटाला ॥
पण आठवण रहावी रे तुजला’ म्हणून छाटतों तुझ्या बोटाला ! ॥
आजपासून ऐक बोलाला । म्हण ’शास्ताखान । आपणांला" ॥असं म्हणून बोट छाटून शिवबा पार झाला !! ॥ मग खान गेला माघारा ।
लाज मोठी वाटली त्याला । तय्यार केलं फौजेला ।
अन् पाठविली पाठलागाला ॥ इकडं शिवाजीनें काय बेत केला ।
धोक्याचा करणा फुंकला । कात्रजच्या घाटांतिल पोत पेटले ते वेळा ! ॥
शिवाजी गेला त्या स्थळा । असं वाटलं यवनी फौजेला ।
अन् कात्रजच्या घाटाकडं गेली पाठलागाला ! ! ॥ ततं जाऊन पाहती त्या वेळा ।
अन् परतले सारे माघारा !! ॥ पर इकडं सिंहगडावरी शिवा पार झाला ॥
चाल
गेला खान फार घाबरुन । पुणं सोडून ।
तळ हालवून । भवानी साहाय्य शिवाजीला ।
यश राजाचं वर्णायाला । शाहीर पांडुरंग झाला ॥४॥
वीराग्रणी मुरारबाजी देशपांडे अर्थात् पुरंदरचा वेढा --- पोवाडा
शाहीर पां.द.खाडिलकर
ज्याच्या कबंधानं भूतळी । तीनशें जण बळी ।
घेतले पुरंदरीं । मुरारबाजी धन्य धन्य सरदार ॥
झाला तीन लोकां वीर तो प्यार । शाहीर पांडुरंग गाणार ॥ध्रु०॥
चौक १
शाहिस्तेखानाची केली पार धुळदाण ।
जरी आला होता एक लक्ष फौज घेऊन ।
बोटें तोडुन शाहिस्ता केला फार हैराण ।
हैराण फार होऊन । पुणें सोडून । गेला जल्दीनं ॥
जसा पाला पाचोळा उडवि पवन लीलेनं ।
किंवा ढग मोठमोठाले एका लहरीनं ।
मेंढयांचा कळप उधळावा जसा सिंहानं ।
तशि थोडी युक्ति योजून । दिला हांकलून । शाहिस्ताखान ॥
केल्या स्वार्या अवरंगजेबाच्या मुलखामधून ।
चार दिवस सुरत शहराची लूट मारुन ।
अगणित द्रव्य जवाहीर मोतीं घेऊन ।
भयभीत केला यवन । यवनांची झाली गाळण ।
ध्यानीं मनीं दिसतो सैतान । झोंप ही न छान ! ॥
कोण रात्रीं झोंपेंतून उठती बरळ बरळून ।
पाहती स्वप्न आणि त्यांत शिवा सैतान ! ।
भिंतीला जाऊन थडकती वेगवेगानं ।
आरडती किंचाळून कोण । सैरावैरा धांवती कोण । वस्त्र सोडून ! ॥
’शिवाजी डोंगई उंदीर फार लहान ।
तो करतो काय चिरडून त्याला टाकीन---’ ।
असा होता बादशहाचा वेडा हो भ्रम । शिवाजीनं केली धामधूम ।
धामधूम झाली पाहून । शाहाचं मन । झालं हो खिन्न ॥
उंदीर नव्हे हा, असे रे जहरी बाण । आला ! आला ! जाइल छातित्नं पार घुसून ।
पादशाही करिल हैराण, काळ दारुण ! । दारुण करुनिया रण ।
कणिं करिल यवनकंदन । करिल धुळदाण ॥ चाल ॥
अवरंगजेबाला शत्रु प्रबळ हा झाला ॥ शाहिस्त्याची फजिती ऐकून शाहा लाल झाला ॥
शिवाजीचा कांटा काढण्याचा बेत त्यानं केला ॥ मग बोलला जयसिंगाला ।
"शिवा मोठा पुंड हो झाला । त्यानं मुलूख हैराण केला ॥
हा कांटा मोंगलशाहीला । जर असा वाढूनच दिला ।
तर होईल भारी आम्हांला । मामाचा मोड त्यानं केला ।
प्रतापगडीं खान ठार केला । लुटालूट केली सुरतेला ।
त्यानं केल जेर शिद्दीला ॥ दरारा त्याचा मुलखाला ।
हें विघ्न आमच्या राज्याला । तुम्ही जावं पारिपत्याला ।
दिल्लीरखान तुमच्या मदतीला । कांटा हा काढा या वेळा" ॥
असं बोलला जयसिंगाला । मग शाहा बोलला एकांतीं दिल्लीरखानाला ॥
’तुम्ही जावं जयसिंगराजाच्या संगें मदतीला’ ॥
पण कानमंत्र हा दिला । "नीट ठेवा तुमच्या लक्ष्याला ।
जयसिंग हिंदु हा होईल फितुर शिव्याला ! ॥
हिंदु हिंदु एक होतील होइल घोंटाळा ॥
बारीक सारीक सार्या बातमीला । नीट काढा आतां या वेळा ।
नीट ठेवा त्याच्यावर डोळा । आणि स्वारी फत्ते करुन यावं दिल्लीला" ॥१॥
चौक २
मग फौज ऐंशीं हज्जार । पायदळ, स्वार ।
घेऊन पेंढार । मिर्झा राजा आणि दिल्लीर आला ॥
वेगानंच दख्खन देशाला । हिंदवी राज्य चिरडण्याला ॥
मिर्झा राजा आणि दिल्लीरखान । राहु केतु जाण ।
आले जोडीनं । ग्रासाया सूर्यशिवाजीला । हिंदू हिंदूला काळ झाला ।
निखारा अस्तनींत पडला ! ॥ हत्ती घोडे बैल आणि उंट ।
होते अफाट । तोफा घनदाट । थाट माट तेव्हां फार केला ।
आकाशीं धुरळा दाट भरला । सूर्याला पार लोपवीला ॥
चाल
विजापूरच्या आदिलशहाला । अवरंगजेबानं धाडलं पत्र ते वेळा ॥
कीं "करा मदत आतां या वेळा । शिवाजीनं पुंडावा केला ।
अफझुलखान तुमचा ठार केला । देतो हा पीडा मुलखाला ।
हा शत्रु तुम्हां आम्हाला । दोघं मिळून चिरडूंया त्याला ।
मी फौज मोठा धाडली हो दख्खन देशाला ॥
तुम्ही पाठवा फौज या वेळा । दोघं उचल खाऊं या वेळा ।
आणि करुं ठार हो त्याला । सापाचं पिल्लु हा झाला ॥
वेळींच डोकं ठेचुं या आज या वेळा" ॥ आदिलशहा पत्र वाचून खूष फार झाला ॥
फाजलखान फौज देऊन धाडला मदतीला ॥ आणि गेली पत्र कितिकांला ।
जावळीच्या मोर्याचे मुलगे-बाजी, अंबाजी-गेले मदतीला ॥
शिवप्पा नाईक बेदनुरचा । जहागिरदार बसवपट्टणचा आला मदतीला ॥
माणकोजी धनगरही आला । कोळीराजे गेले मदतीला ।
शिवाजीचा नाश करण्याला । कुर्हाडीचा दांडा गोत्याला काळ हो झाला ॥
कुंपणानं खाल्लं शेताला ! । भावानं मारलं भावाला ! ।
असो असे राजे यवनांच्या गेले मदतीला ॥ जयसिंग दक्षिणेंत आला ।
सासवड गांवीं तळ त्यानं दिला । आणि पुढच्या स्वारीचा विचार त्यानं सुरु केला ! ॥२॥
चाल
"जे वीर पुरुष जाहले । आर्य आपुले ।
सर्व बिघडले । दास ते बनले ।
मनिं मानलालसा धरुनी अंकित झाले ! ॥
चाल
हें असें मला बघवेना, या पुढें ॥
पाहुनी चित्त हें माझें तडतडे ! ॥
निशिदिनीं हृदय हें माझें धडधडे ॥
चाल
क्षणभर मजला चैन देइना क्षात्रधर्म हा भला ।
देह हा या कामीं वहिला ! ॥
चाल
पर राजे आज तुम्ही दया दाखवा मला ॥
हा तुमच्या शब्दाबाहेर नाहीं राहिला ।
जसे वडील माझे तस्सेच तुम्ही हो मला ! ॥
दोन शब्द सांगणं तुम्हांला । हा अधिकार ना मला ! ।
हें धरा पोर पोटाला । आणि क्षमा करा हो मला ।
परचक्र मोठं हें आलं हिंदू राज्याला ॥ हा वृक्ष आम्हीं लावला ।
आतां तुम्ही वाढवा त्याला । मोंगलाचा मुलुख मी देतों परत मोंगलाला ॥
द्या तुमचा सल्ला या वेळां । मी येतों तुमच्या भेटीला" ।असं पत्र धाडलं शिवानं हो जयसिंगाला ॥३॥
चौक ४
ही बातमी ऐकून मोंगल दिल्लीरखान ।
लाल झाला रागानं म्हणे ’हा जयसिंग कोण ? ।
तह करणार शिवाजी संगें मोठया ऐटीनं ।
हिंदु हिंदु एक होऊन । मला आतां दूर वगळून ।
शाहाशीं झाला बेइमान । आज संपूर्ण ॥
मग मिर्झा राजाला बोलला दिल्लीरखान ।
"तह नका करुं शाहाच्या हुकमावीण ।
कायमचा कांटा काढायची संधि सोडून ।
कां असें मनीं बिचकतां आज हो आतां ।
धीर सोडून" ॥ जयसिंग बोलला "ऐका हो दिल्लीरखान ! ।
उंदीर नसे हा शिवा, सिंह भीषण । कितिकांना खडे चारुन केलं हैराण ।
कितीकांची मान फाडून । कितीकांचीं बोटं तोडून ।
धूळ चारुन गेला वेगानं !" ॥ मग बोलला राजाला मिया दिल्लीरखान ॥
दाढीवरन्म मोठया तोर्यानं हात फिरवून ।
"शिवाजीला झाला सामील तुम्ही आंतून । केला घात फंदफितुरीनं ।
हिंदुला घेरलं हिंदूनं । असं मला सांगतय मन । बोला आपण ! ॥
चाल
वाटेल तें तुम्ही हो करा । बेत तुमचा आवडेना मला ।
मी जातो पुरंदराला । सर करतों पुरंदर किल्ला ।
तुम्ही जावं सिंहगडाला । शिव्याचा धाक नको मला ।
मी धरीन त्याच्या कानाला । अन् फरफटत नेइन दिल्लीला ।
तो कुत्रा करतो काय मला ? । तुम्ही खास फितुर हो झाला ।
म्हणुनि बोलता असल्या बोलाला" । असं म्हणुन चालला दिल्लीर पुरंदराला ॥
डोईची पगडी काढून ठेवली भूमीला । अन् बोलला खान आपणाला ।
’सर करिन पुरंदर किल्ला । तरच घालीन पगडी डोक्याला’ ।
असा त्यानं निश्चय केला ! अन् मग मोठी फौज घेऊन तिकडं चालला ॥४॥
चौक ५
गडामध्यें पुरंदर गड । मोठा अवघड ।
भयंकर चढ । धडधडे ऊर बघुन त्याला ।
दिल्लीरखान खिन्न झाला । निराशा झडपी हृदयाला ! ॥
पर मोठी हिय्या धरुन । फौज घेऊन । चाल्ला जल्दीनं ।
पुरंदर किल्ल्याखालीं आला । देश जाळून फस्त केला ।
किल्ल्याला वेढा त्यानं दिधला ॥
चाल
इकडं शत्रु पन्नास हजार । वर मावळे दोन हजार ! ॥
इकडं वेढा घाली दिल्लीर । वर होता बाजी मुरार ॥
पसरला सेनासागर । मधें पुरंदर कमळ ॥
पुरंदर कमळ सुंदर । वर शोभे देव मुरार ॥
चाल
मुरारबाजी शूर सरदार । योद्धा घनघोर ।
शिवबाचा प्यार । झाला तय्यार झुंजण्याला ।
फिकीर जीवाची नव्हती त्याला । किल्ल्याचा बंदोबस्त केला ॥
धान्याची तरतूज केली । किल्ल्यावर भली ।
शस्त्रं जमविली । तोफ चढविली हो बुरुजाला ।
कडेकोट बंदोबस्त केला । झाला तय्यार झुंजण्याला ॥
चाल
मुरारबाजीनं बेत केला । गनीमाचा लोक फार आला ।
भेडसवावं दिल्लीरखानाला । म्हणून पठाणाचा वेष केला ।
मावळा पांचपन्नास मदतीला । रात्री किल्ल्याच्या खालीं केला ।
शत्रुच्या छावणीमंदि शिरला । रखवालदार ठार केला ।
दारुगोळा सारा लुटून नेला । अन् चट्कन किल्ल्यावरती गेला ! ।
यवन मग उठला पहांटेला । बघतो दारुच्या कोठाराला ।
अन् मारतोय हात कपाळाला । आज काय दारुगोळा नेला ।
उद्यां काय चोरटा हल्ला केला । परवां ठार केला शिपायाला ।
बभ्रा हा रोजच्या रोज झाला ! । एकदां रात्रीच्या समयाला ।
मुरारबाजीनं, पंचवीस जणं, मावळे घेऊन, वेश बदलून हल्ला केला ।
पठाण सार होता झिंगलेला । मुरारसिंहानं हल्ला केला ।
तलवारीनं चिरलं कितीकाला । यवन खडबडून जागा झाला ।
हात मग मारतोय तोंडाला । तोबा ! तोबा ! सैतान हा आला ।
पळतो वाचवायला जीवाला । कितिक दरीमंदि खाली पडला ! । ऐकावं र दादा ॥
चाल
मग झाला रागानं लाल दिल्लीरखान ।
म्हणे ’ठार करिन सैतान तलवारीनं ।
उद्यां शर्थ करुन हा खास गड जिंकीन’ ।
वर्णन पुढच्या चौकांत पुढं सांगीन ॥५॥
चौक ६
निकराचा हल्ला मग केला । सुरुंग लावला ।
गडाच्या बुरुजाला । तोफांचा मारा वरनं झाला ।
सुरुंग लावणारा ठार केला । मुडद्यांचा मोठा ढिगारा पडला !।
धडधडा धुम् धुम् धडधडा । आवाज कडकडा ।
गोळे धडधडा । धडकती येऊन बुरुजाला ।
बुरुज कोसळला धरणीला । आणीबाणीचा काळ आला ! ॥
चाल
शत्रु होता पन्नास हजार । वर मावळे दोन हजार ॥
तरी त्यांनीं केलं बेजार । दिल्लीर झाला दिलगीर ! ॥
परि फौज होती अनिवार । मुरारबाजी काय करणार ? ।
तरी त्यानं केला बहु जोर । कितीकांना केलं हो ठार ! ॥
चाल
ढांसळला बुरुज किल्ल्याचा ! मुरारबाजीचा ।
बुरुज हृदयाचा । त्वेषानं लालेलाल झाला ! ।
मावळे घेऊन हल्ला केला । गातों मी त्याच्या पोवाडयाला ॥
शत्रूंचा हल्ला उधळला । मुरार परतला ।
खान वेडा झाला । बघून मुराराच्या प्रतापाला ।
मग त्यानं दुसरा बेत केला । पुरंदर किल्ला जिंकण्याला ! ॥
चाल
पुरंदरच्या एका बाजूला । एक किल्ला होता दुसरा ।
वज्रगड म्हणती हो त्याला । त्या किल्ल्यावरनं डागाव्या तोफा या वेळा ॥
मग पुरंदर किल्ल्याला । थडकेल जोरानं गोळा ।
असा बेत खानानं केला । अन् तिकडं मोर्चा फिरविला ।
बाबाजी बोवाजी वरती होता त्या वेळा । यशवंतराव त्याचा हो भाऊ धावला मदतीला ॥
दोघांनीं नेट फार केला । धारातीर्थीं देह टाकला ।
खानानं किल्ला सर केला । तोफखाना वरती चढविला ।
काळ मोठा कठिण हा आला । आतां पुरंदर खास गेला ।
असं वाटलं मुरारबाजीला । निकाराचा विचार त्यानं केला ।
मग बोलला आपल्या बायकोला । सांगेल शाहीर आतां पुढच्या चौकाला ॥६॥
चौक ७
मुरारबाजी बोले बायकोला । "आला हा घाला ।
आज किल्ल्याला । शिकस्तीचा यत्न मी केला ! ॥
किल्ल्याचा बुरुज तडकला । ढांसळून गेला ।
शत्रु हा आला । निकराचा काळ ग आला ।
थोडासा उशीर जर झाला । होईल घोंटाळा ।
आज या वेळा । सर करील शत्रु हा किल्ला,
लाज आम्हांला ॥ जर किल्ला हातचा हा गेला ।
डाग कीर्तीला । जन्मभर जडला ।
कसं काळं तोंड दाखवूं मी शिवरायाला ॥
जावं अस्सं याच घटकेला । शत्रु चिरण्याला ।
वाटतंय मजला । धारातीर्थी देह टाकून जावं या वेळा ॥
चाल
पर पाश एक जीवाला । प्रेमाचा तुझ्या ग झाला ! ॥
कसं तोडू प्रेमपाशाला । ही एक चिंता ग मजला ॥
चाल
तव नेत्र सोडिती बाण । जाती भेदून ।
हृदय या वेळा । तव लाल अधर मोहती सखे !
हृदयाला ! ॥ करपाश तुझे बलवान ।
गुंतलों हरिण । तडफडे मीन ।
कर्तव्यकर्म परि असं आलं दारुण ॥
चाल
काळ इतक्या वर्षांचा गेला । सुख नसे तुझ्या वांटयाला ॥
सदानिदा जातों स्वारीला । सोडुनी सखे ! मी तुजला ॥
काय पाप पूर्वजन्मीला । केलस ग ठाव कोणाला ? ॥
म्हणुन पती असा हा आला । सखये ! ग तुझ्या दैवाला" ॥
चाल
बोलला असे हे बोल । प्रेम-कल्लोळ ।
हृदयिं खळखळले ! । भेटाया तिला नेत्रांतुन मग ते आले ! ॥
प्रेमानं मिठी मारुन । झाला एक क्षण ।
स्तब्ध ते वेळा । पण अश्रु टपटपा गालावर गळला ! ॥
चाल
प्रियपत्नी बोले मग त्याला । जरि जीव व्याकुळ झाला ॥
"नका होऊं खिन्न या वेळा । प्रेमाच्या तोडा पाशाला ॥
चाल
तुम्ही शूरवीर रणधीर । पंचानन रणझुंजार ! ॥
किती जन्म नवस मी केले । म्हणुनी मी भार्या झाले ॥
अजि नाथ ! भाग्य मम फुललें । म्हणुनी मी भार्या झालें ॥
अबलेला तुम्ही वरलें । हें शरीर पावन केलें ॥
चाल
कर्तव्यकर्म आचरतां । धर्मार्थ तनू ही पडतां ।होईल सौख्य मज नाथा ॥ झणी तोडा मम पाशाला ॥
हें राज्य नसे शिवबाचें । हें राज्य देव-धर्माचें ! ॥
माजलें बंड यवनाचें । होतात हाल अबलांचे ! ॥
पर्व हेंच स्वातंत्र्याचें । धन्य, जो रणावर नाचे ॥
चाल
मी वीरपत्नी, तुम्ही वीर । गाजवा रणीं समशेर ।
होउं द्या युद्ध घनघोर । जा पाशा तोडुनी सारा ! ॥
पण क्षण एक गडे ! थांबाबं ! मी पंचारती आणीन ॥
अक्षता भाळिं लावीन । प्रेमानं दृष्ट काढीन ॥
डोळाभर मग पाहीन । मग निरोप मी देईन" ॥
चाल
बोलली अशी ती अबला । डोळ्यांतुन अश्रु गळला ।
गद्गदा कंठ गहिंवरला । ओंवाळुनि मग नाथाला ।
जाहली धन्य ते वेळा ! ॥७॥
चौक ८
जगदंबा मातेचं सत्वर करुनी स्मरण ।
प्रिय पत्नीकडे शेवटली दृष्टि टाकून ।
शेंपाचशें मावळे रणवीर संगें घेऊन ।
ढाल फिरंग करिं घेऊन । चालला वेगानं । शिवाचा बाणा ॥
जसा सिंह चवताळुन दरीमधुन तो यावा ।
एकाच झडपेनं मस्त हत्ती फाडावा ।
तसा दिसला डोळ्याला मुरारिचा देखावा ।
तो प्रसंग कविला कां न च स्फूर्तिद व्हावा ? ॥
का वीर्यवृत्तिचा मूर्तिमंत हा पुतळा ! ।
अभिमन्यु बाळ हा किंवा दुसरा नटला ! ।
कां प्रलयसिंधु हा शिखरावरुनी सुटला ! ।
यवनांचा कराया अंत । जोरानं जात ।
तेज उधळीत । आज या वेळा ! ।
तंवा बसला होता हत्तीवर दिल्लीरखान ।
त्यानं पाहला वरनं येतांना मुरार खवळून ।
थरथरलं ऊर खानाचं त्याला पाहून ! ।
म्हणे, "सिंह आला रे आला । फाडाया मला । जबडा उघडून" ॥
खणखणले भाले तलवार । झुंजती वीर ।
म्हणती ’हर हर महादेव’ वीर गुंग झाला ।
लढाईचा कैप त्यांना चढला । प्रेतांचा ढीगच्या ढीग पडला ।
हाडकारक्तांचा काला झाला ! ॥ केली शर्थ मुरारबाजीनं ।
कितीक कापून । आला जोरानं । खानानं पाहिलं समोर त्याला ।
होता रक्तानं मुरार न्हाला । जणूं काय सूर्य उगवणारा ! ॥
चाल
खान बोलला मुरारबाजीला । "पाहुन रे तुझ्या शौर्याला ।
हा खान खूष फार झाला । घे कौल आज या वेळा ।
अन् ये शरण आज खानाला । शिफारस करीन शाहाला ।
अन् चढवीन मोठया हुद्याला । नाहींतर मरशील व्यर्थ या वेळा" ॥
ऐकून शब्द खानाचे मुरार लाल झाला ॥ मग बोलला वीर खानाला ।
"काय येऊं शरण तुर्काला ? । काय विकूं देह मानाला ।
हा देह दिला धर्माला । हा मुरार बळी पडणार नाहीं मोहाला ॥
एक वेंळ गळेल भूमिला अढळ ध्रुव तारा ॥
पण मुरारबाजी हा सदा अढळ रे झाला ! ॥
देहाचा चूर जरि झाला । तरि फिकीर नाहीं रे मला" ।
असं बोलला वीर खानाला । खान हत्तीवरनं उतरला ।
अन् दोघांचा संग्राम झाला । गर्जती वीर ते वेळा ।
कानठळी बसली कानाला ! । दैवाचा घाला पण आला ! ।
मुराराच्या हातावर वार जोराचा झाला । ढाल पडली खालीं भूमिला ।
मग शेला बांधला हाताला । आणि वीर गर्जूं लागला ।
खानावर वार त्यानं केला । पण तो वार निसटून गेला ।
इतक्यांत खानानं सोडलं एका तीराला ! ॥ तीर लागला मुरारबाजीला ।
तीरानं तोडलं डोक्याला । शिरकमळ पडलं धरणीला ! ॥
तरी धडानं कहर तो केला । धूळ चारली तीनशें यवनाला ।
मग कोसळलं धड धरणीला ॥ जीवानं सोडलं देहाला ।
’स्वातंत्र्यदेविच्या गळ्यांमधुन मणि गळला !" ॥
धर्मार्थ देह खर्चून धन्य तो झाला !! ॥८॥
चौक ९
देहाचे तुकडे जमविले । किल्ल्यावर नेले ।
मावळा मग बोले । मुरारबाजीच्या बायकोला ।
"बाईसाहेब ! मोठा घात झाला । जिवाचा मोहरा ठार झाला ! ॥
प्राण आमुचा सोडुन गेला ॥ झाला घोटाळा ऐन वेळेला ।
खान घेईल आतां किल्ल्याला ॥ काय आम्ही करावं बोला ।
अशा निकराच्या समयाला ? ॥ नाथाचं प्रेत पाहून ।
साध्वीचं मन । भरलं दुःखानं । एक क्षण आली घेरी तिजला ।
डोळ्यांतुन अश्रु फार गळला । अंगाला कंप सारा सुटला ! ॥
चाल
पण दुःख सारं आवरुन । त्वेषानं लाल होऊन ॥
बोलली साध्वी जोरानं । पळतांना मावळा पाहून ॥
"कुठं जातां धीर सोडून । मी आलें खड्ग घेऊन ।
द्या दुष्ट शत्रु हांकलून । जा ! मरा ! झुंज झुंजून" ॥
चाल
असं बोलली साध्वी मावळ्यांला । नवर्याच्या प्रेतावर शेला ।
टाकून गेली युद्धाला । मावळ्यांना चेव तंवा आला ।
अन् करती घोर युद्धाला । खानानं पाहिलं वर तिला ।
अन् तोंडात घातलं बोटाला । मग बोलला आपला आपणाला ।
"सैतानखाना हा झाला । आतां औरत आली लढण्याला ! ।
सोडावं आतां नादाला । काढावं आतां वेढयाला ।
सर करणं असल्या किल्ल्याला । फार बिकट काम हें मला" ।
असं म्हणून वेढा काढून खान चालला ॥ मग साध्वी आली माघारा ।
पालखींत घातलं प्रेताला । अन् पालखी घेऊन चालली रायगडाला ॥
शिवराज आले सामोरा । गडावर नेलं पालखीला ।
शिवराज व्याकुळ झाला ! । खालीं काढलं त्यानं प्रेताला ।
अन् ढळढळां रडूं लागला ! । जिजाबाई बोलली साध्वीला ।
"बाई ! उपमा नाहीं ग तुला । देशाला प्राणपति दिलास् ।
अन् राखलस् ग तूं ही किल्ल्याला ॥
चाल
त्वत्समान शंभर अबला । जर मिळतिल या देशाला ॥
जाईल दुःख विलयाला । चमकेल सुखाचा तारा ॥
चाल
तव पती जाहला धन्य ! । या समान कोणी न अन्य ।
चिरकाल जोडलं पुण्य । हा वंद्य तीनि लोकांला" ॥९॥