Saturday, May 8, 2010

शिवसंभव (पोवाडा) – शाहीर करुणेश भि० डोंगरे

शिवसंभव
सरला शिमगा गुलाल उधळीत पंचमी येई रंगाची
शिवनेरीला चाहुल लागे महाराष्ट्राच्या भाग्याची ॥१॥
जुन्नर क्षेत्री गड शिवनेरी उभा ठाकला डौलात
बुरुजबंद अति सुंदर आणिक भव्य असे तो बलवंत ॥२॥
लेण्याद्रि अन ओझर क्षेत्री कौतुक पाहे गजानन
भीमा शंकरिं वास शिवाचा काय करिल मग तो यवन ॥३॥
निर्दाळित त्या असुरापायी शस्त्रे घेऊनि बहु हाती
महाराष्ट्राची माय भवानी सिद्ध रक्षणा काय भिती ? ॥४॥
अवती भवती फेर धरुनि उंच उभ्या त्या सह्य शिखा
हिरव्या झाडीमधि खेळती मोर वानरे आणि शुका ॥५॥
खाशा वाडयामधीं सजविले दालन जणुं ही इंद्रसभा
शुभ्र रंग त्यावरी रेखिली कुंकुम स्वस्तिक ये शोभा ॥६॥

द्वारपाल अन देवदेवता मंगल चिन्हे आणि किती

वाळ्याचे अन् पडदे सोडुन कलश जलाचे शीत अती ॥७॥

रत्नय मंचकी मृदु शय्येवर मात्र जिजाई विसावली
तेज ओघळे नेत्रां मधुनी गालावरती ये लाली ॥८॥
सुबक पाळणा हिंदोळत त्यावरी चांदवा छतामधी
थरथरती त्या दिपज्योती वाटे क्षण तो येई कधी ॥९॥
उत्तम सुइणी वैद्यराज अन् हकिम देशिंचे आणविले
राजोपाध्ये, हणमंते अन् नाईक सेवेला आले ॥१०॥
फाल्गुन मासी कृष्णपक्ष अन् तिथी तृतीया ये जवळ
महाराष्ट्राची माय माऊली ओठ आवळी सोशि कळ ॥११॥
संध्या छाया करिती किमया पिले-पांखरे जाति घरा
आंदोलत मन आनंदाने अंश प्रभुचा ये उदरा ॥१२॥
अस्ता जाई एक रवी तो दुजा येतसे या भुवनी
आतुर अवघे विश्र्व जणू ती मोदें थरथरली अवनी ॥१३॥
विश्व बुडाले घन अंधारी क्षणभर न कळे काय घडे
चमकुन जाई प्रकाश रेखा रुदन ध्वनी तो कानी पडे ॥१४॥
बाल रुदन ते येता कानी हरखून जाती जन सारे
पुत्र-प्रसवली ती जन-जननी वार्ता क्षणांत ती पसरे ॥१५॥
घेऊनि हाती मशाल दिवटया गडावरी ते जन जमले
आनंदाचे वृत्त ऐकता जयभवानी जय ते वदले ॥१६॥
दिवस उगवता जमुनी सारे गुलाल उधळीत पालविले
तोच रक्तिमा अंगोपांगी लेवुनि पूर्व दिशा उजळे ॥१७॥
कलश जलाचे मीठ मोहर्या आणुनी शुभ्र सुमे बहुती
दृष्ट काढण्या गडकरनी त्या जमुनि बाळ कौतुक बघती ॥१८॥
पळ पळ घटिका, दिवस जातसे पांचवीचे पूजन चाले
सटवाईच्या घुगर्या खाऊन जन अवघे मग विसावले ॥१९॥
आणवुनि ज्योतिषी जमविली जन्म कुंडली बाळाची
दादाजीने मग कथियेली वेळा नाम निधानाची ॥२०॥
द्वादश दिवशी क्षितिज उजळता वाजविती शिंगे बहुत
सनई, चौघडा आणिक मेर्याी, ढोलक ताशे कडाडत ॥२१॥
दागदागिने वसनाभरणे लेउनि जमल्या सुवासिनी
बाळ लेणी अन कुंच्या झबली दाटी जाहली त्या सदनी ॥२२॥
गोट पाटल्या वाक्या, बिलवर नथ वाकी अन गळा सरी
भरजरी पैठण नेसुनि आली दीप कुळाचा घेई करी ॥२३॥
गोंजारुन त्या लावितसे मग तीट काजळा आणि किती
नाना वसने, बाळलेणी ती; नेत्र कौतुके पाणावती ॥२४॥
देउनी हाती बाळ सखीच्या "गोप कुणी घ्या" ती वदली
कर्ण संपुटी नाम बोलली आणि हर्षे सुखावली ॥२५॥
उदरी आले बाल शिवाजी धन्य आज मी झाले
सार्थक होइल मन जन्मीचे हिंदु राष्ट्र जरी मेळविले ॥२६॥
माय जिजाई वदता जैसे तोफ तटावर गडगडली

जाणुनि होती भविष्य नियती बोल तियेचे जणू वदली ॥२७॥

No comments:

Post a Comment