Saturday, May 8, 2010

शिवछत्रपतींचा पोवाडा (पोवाडा) – शाहीर भा.ल.रानडे

नमन
आधी नमन गौरिनंदना । दत्तगुरु याना । संत सज्जनां ।
देशभक्तांना । नारि रत्नांुना । बालावर असू द्या कृपा हीच प्रार्थना ॥जी जी॥
ध्रुपद--धन्य धन्य शिवाजी राणा । मराठी बाणा । अवतारी जाणा ।
स्थापिले हिंदु स्वराज्याला । पराक्रम करुनि अमर झाला र ॥जी॥
जिजाईने थोर तप केले । फळाला आले । बाळ जन्मले । शिवनेरी गडावरति हो खास ।
दुष्ट संहार जणू करण्यास । सारा महाराष्ट्र धरी त्याची आस ॥जी॥
चाल
पाळण्यातले पाय पहावे दैवी बाळाचे ।
विजापुरी हो प्राण वाचवी एका गाईचे ॥
गुलामगिरीची चीड निर्मिली माता--गुरुजीनी ।
दरिखोरी तुडवून पाहिली स्थिति हो जातीनी ॥
जीवीच्या जिवलगां जमविले मोठया कष्टाने ।

मावळ्यात अंगार फुलविला अति चातुर्याने ॥
रोहिडेश्वरा वरती धरली रक्ताची धार ।
संकल्पाला समशेरीला चढली मग धार ॥
चाल
कल्याणचा खजीना लुटून । तोरणा जिंकून ।
वेवस्था लावून । उडविली झोप मोंगलांची ।
गनीमी कावा, रीत साची र ॥जी॥
चाल
अफझुल्ला ठार मारुन । शाहित्याची बोटं छाटून ।
पन्हाळगडाहून निसटुन । दिल्लीस तेज दावुन ।
गेला नजर--कैद चुकवून । आला दक्षिणेत परतुन ॥
चाल
जिजाईचे डोळे पाणावले । बाळ लाभले ।
भले जाहले । भवानि शंकराची कृपा हो ज्यास ।
कशाची वाण पडे का त्यास ॥जी जी॥
चाल
रायगडी मग राज्यारोहण--सोहळा तो झाला ।
पंडित गागाभट्ट काशिचा पुरोहीत सजला ॥
सुवर्ण तुला करुनि गरीबा अमाप दान दिले ।
नजर गुणांवर ठेवुनि त्याने मंत्री नेमियले ॥
परराष्ट्राच्या वकिलानी त्या नजराणे दिधले ।
"गोब्राह्मण प्रतिपालक" ऐसे बिरुद मिरवीले ॥"
गमे सुरक्षा जनतेला, ती देई त्यास दुवा ।
स्वर्गामधल्या देवांनाही वाटावा हेवा ॥
चाल
असं करुनियां आक्रीत । सोळाशे ऐशीत ।
शिवरुप होत । कीर्ति तो अमर करुनि गेला ।
शाहीर भालचंद्र नमित त्याला रं ॥जी॥

No comments:

Post a Comment