Saturday, June 27, 2009

शिव-प्रताप...

घेऊनी ती सहस्त्र सेना, विजापूरचा यवन निघाला
स्वत:च पूसुनि सौभाग्याला, काळ मिळे या महाभागाला..

दीन दीन ची सेना आली, घोषाने त्या धरणी कापली
घाव तो पहिला मातेवरती, गायही कापली तिच्याच पुढती

अत्याचार ते अघोर केले, देवहि नाही त्याने सोडले
बुत्शकिनच नाव तयाचे, कायमचे ते बूत राहीले

म्हणे 'कुठे पळाला अजान चुहा, पकडण्यास आला बागुल-बुआ'
बाहेर काढा त्या सिवला, शीर हवे मज बेगमेस दियाला....

**इकडे शिवाजी महाराज आणि सगळे मावळे अफजल खानाच्या वाटेकडे डोळे लावून बसले होते
**पंत अफजल खानाला भेटले त्याला हवी ती वचने दिली आणि प्रतापगाडाच्या पायथ्याला भेट पक्की झाली

सापडेल ती 'ऊ' ही एकदा, हिडिंबेच्याही केसामधली
हत्ती न सापडे कितीही शोधता, जावळ खोर्‍याचीही महती,

दीसही ठरला, जागा ठरली, बसल्या मुहूर्त मेढा
शामीयाना तो खुबच नटला, त्याला शिव-शहीचा वेढा

अगडबंब त्या देहापूढती ठाकला, युक्तित्वाच ठेला,
मनात वंदुनी जगत् मातेला, कवेत नृसिंह धावला

कोतळ्यात खंजीर खुपसला, पोट फाडले अन्यायाचे
प्रसन्न झाली दुर्गा माता, राज्य आपूल्या शिवरायांचे..

शिवकल्याणराजा

निष्चयाचा महामेरू । बहुत जनांसी आधारू ।
अखंड स्थितीचा निर्धारू} । श्रीमंत योगी ॥

नरपति हयपति गजपति । गडपति भूपति जळपति ।
पुरंदर आणि शक्ति । पृष्ठभागी ॥

यशवंत कीर्तिवंत । सामर्थ्यवंत वरदवंत ।
पुण्यवंत नीतिवंत । जाणता राजा ॥

आचारशील विचारशील । दानशील धर्मशील ।
सर्वज्ञपणे सुशील । सकळा ठायीं ॥

धीर उदार गंभीर । शूर क्रियेसि तत्पर ।
सावधपणे नृपवर । तुच्छ केले ॥

देव धर्म गोब्राम्हण । करावया संरक्षण ।
हृदयस्थ झाला नारायण । प्रेरणा केली ॥

या भूमंडळचे ठायी । धर्मरक्षी ऐसा नाही ।
महाराष्ट्र धर्म राहिला काही । तुम्हा कारणे ॥

कित्येक दुष्ट संहारिला । कित्येकांसि धाक सुटला ।
कित्येकांस आश्रयो जाहला । शिवकल्याणराजा ॥


रचना - समर्थ रामदास

जय जय महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
रेवा वरदा, कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी
एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी
भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा
जय जय महाराष्ट्र माझा ...

भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणार्या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा
काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी
पोलादी मनगटे खेळती खेळ जीवघेणी
दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढ़ळाच्या घामाने भिजला

देशगौरवासाठी झिजला
दिल्लीचेही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा !!

Tuesday, June 23, 2009

शूर आम्ही सरदार...

शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती?
देव, देस अन धर्मापायी प्राण घॆतलं हाती

आईच्या गर्भात उमगली झूंजाराची रीत
तलवारीशी लगीन लागलं, जडली येडी प्रीत
लाख संकटं झेलून घे़ईल अशी पहाडी छाती
देव, देस अन धर्मापायी प्राण घॆतलं हाती

झुंजाव वा कटुन मरावं हेच आम्हाला ठावं
लढून मरावं, मरून जगावं हेच आम्हाला ठावं
देशापायी इसरू माया, ममता नाती
देव, देस अन धर्मापायी प्राण घॆतलं हाती...


गीत : शांता शेळके
संगीत : आनंदघन (लता मंगेशकर )
स्वर : पं. हृदयनाथ मंगेशकर
चित्रपट : मराठा तितूका मेळवावा (१९६४)
राग : हंसध्वनी (नादवेध)

मराठी पाऊल पडते पुढे...

खरा स्वधर्म हा आपुला
जरी का कठीणु जाहला
तरी हाचि अनुष्ठिला
भला देखे.

स्वराज्य तोरण...
स्वराज्य तोरण चढे
गर्जती तोफांचे चौघडे
मराठी पाऊल पडते पुढे
मराठी पाऊल पडते पुढे llधृll

मायभवानी प्रसन्न झाली
सोनपावली घरास आली
आजच दसरा आज दिवाळी
चला सयांनो, अंगणी घालू
कुंकुमकेशर सडे,
मराठी पाऊल पडते पुढे,
मराठी पाऊल पडते पुढे. ll१ll

बच्चे आम्ही वीर उद्याचे
बाळमुठीला बळ वज्राचे
वारस होऊ अभिमन्यूचे
दूध आईचे तेज प्रवाही,
नसांतुनि सळसळे,
मराठी पाऊल पडते पुढे
मराठी पाऊल पडते पुढे ll२ll

स्वयें शस्त्र देशार्थ हाती धरावे
पिटावे रिपुला रणी वा मरावे
तुझ्या रक्षणा तूच रे सिद्ध होई
तदा संकटी देव धावून येई
जय जय रघुवीर समर्थ
जय जय रघुवीर समर्थ

शुभघडीला शुभमुहूर्ती
सनई सांगे शकुनवंती
शुभघडीला शुभमुहूर्ती...

जय भवानी.... जय भवानी...
जय भवानी, जय भवानी
दशदिशांना घुमत वाणी,
जय भवानी....

जयजयकारे दुमदुमवू हे सह्याद्रीचे कडे....


गायक: लता, आशा, उषा, हृदयनाथ, हेमंतकुमार
संगीतकार: आनंदघन
चित्रपट: मराठा तितुका मेळवावा.

शिवरायांचा पाळणा

गुणी बाळ असा जागसि का रे वांया | नीज रे नीज शिवराया
अपरात्री प्रहर लोटला बाई | तरि डोळा लागत नाही ||

हा चालतसे चाळा एकच असला | तिळ उसंत नाही जिवाला ||
निजयावयाचा हरला सर्व उपाय | जागाच तरी शिवराय ||

चालेल जागता चटका
हा असाच घटका घटका
कुरवाळा किंवा हटका

का कष्टविसी तुझी सांवळी काया | नीज रे नीज शिवराया ||१ ||
ही शांत निजे बारा मावळ थेट | शिवनेरी जुन्नर पेठ ||
त्या निजल्या ना तशाच घाटाखाली | कोकणच्या चवदा ताली ||
ये भिववाया बागुल तो बघ बाळा | किति बाई काळा काळा ||

इकडे हे सिद्दीजवान
तो तिकडे अफझुलखान
पलिकडे मुलूख मैदान

हे आले रे तुला बाळ धराया | नीज रे नीज शिवराया || २ ||

- राम गणेश गडकरी ’गोविंदाग्रज’

शिवाजी महाराज आरती...

जयदेव जयदेव जय जय शिवराया !
या या अनन्य शरणा आर्यां ताराया !!धृ!!

आर्यांच्या देशावरि म्लेंच्छांचा घाला
आला आला सावध हो भूपाला
सद् गदिता भूमाता दे तुज हाकेला
करुणारव भेदुनि तव ऱ्हिदय न कां गेला?.....१

श्री जगदंबा जीस्तव शुंभादिक भक्षी
दशमुख मर्दुनी जी श्रीरघुवर संरक्षी
ती पूता भूमाता म्लेंच्छाही छळता
तुजविण शिवराया तिज कोण दुजा त्राता?.......२

त्रस्त अम्हि दीन अम्हि शरण तुला आलो
परवशतेच्या पाशी मरणोन्मुख झालो
साधु परित्राणाया दुष्कृती नाशाया
भगवन् भगवतगीता सार्थ कराया या..........३

ऐकुनिया आर्यांचा धावा गहिवरला
करुणोक्ते स्वर्गी श्री शिवनृप गहिवरला
देशास्तव शिवनेरी घेई देहाला
देशास्तव रायगडी ठेवी देहाला

देशस्वातंत्र्याचा दाता जो झाला
बोला तत् श्रीमत्शिवनृप् की जय बोला..........४

बोला शिवाजी महाराज की ... जय !!

- स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर

वाघाच्या जबड्यात घालुनी हात...

वाघाच्या जबड्यात घालुनी हात
मोजिते दात जात ही आमुची
पहा चाळुनी पाने पाने
आमुच्या इतिहासाची

पुरुष काय पण स्त्रिया ही लढल्या परंपरा ही आमुची
तुम्हा काय ठाऊक ती लढली मर्दानी झाशीची
दाभाड्याची उमा ती लढली चन्नमा चित्तुरची
पहा चाळुनी पाने पाने आमुच्या इतिहासाची


जिवंत वीर तर लढले लढले नवल ते काय घडले
धडवेगळे शिर झाल्यावर धड ते अवघे लढले
मुरारबाजी म्हणती त्याला अमर कथा ही त्याची
पहा चाळुनी पाने पाने आमुच्या इतिहासाची

वंशज आम्ही रामकृष्ण अन् गुरु गोविंदसिंगाचे
तसेच आमुच्या शिवबाचे अन् प्रताप रणा याचे
आम्हा बरोबर लढण्या नसेल व्यली माय कुणाची
पहा चाळुनी पाने पाने आमुच्या इतिहासाची

दुष्ट हेतुने आल जरी तू गिळण्या हिंदुस्थान
तुम्हालाच तो गिळेल तुमचे बनेल कब्रस्थान
दुष्ट शत्रुचे मढे गाडण्या जमीन पुरते आमुची
पहा चाळुनी पाने पाने आमुच्या इतिहासाची

अरुणोदय झाला...

शतकांच्या यज्ञातुन उठली, एक केशरी ज्वाला
दहा दिशांच्या हृदयांमधुनी, अरुणोदय झाला

शिवप्रभूंची नजर फिरे अन्‌उठे मुलूख सारा
दिशा-दिशा भेदीत धावल्या खड्गाच्या धारा
हे तुफान स्वातंत्र्याचे
हे उधाण अभिमानाचे
हे वादळ उग्र वीजांचे
काळोखाचे तट कोसळले चिरा-चिरा ढळला

कडेकपारी घुमू लागले विजयाचे गान
जळल्या रानातुनी उमलले पुन्हा नवे प्राण
रायगडावर हर्ष दाटला खडा चौघडा झडे
शिंगांच्या ललकारीवरती भगवा झेंडा उडे
शिवराय भाग्य देशाचे
हे संजीवन प्राणांचे
हे रूप शक्तियुक्तीचे
हा तेजाचा झोत उफाळुन सृष्टितुन आला

गंगा-सिंधू-यमुना-गोदा कलशातुन आल्या
शिवरायाला स्नान घालुनी धन्य धन्य झाल्या
धिमी पाउले टाकीत येता रुद्राचा अवतार
अधीर हृदयातुनी उमटला हर्षे जयजयकार

प्रौढप्रताप पुरंदर क्षत्रीयकुलावतंस
सिंहासनाधिश्वर महाराजाधीराज शिवछ्त्रपती महाराज

’शिवछ्त्रपतींचा जय हो !’
’श्रीजगदंबेचा जय हो !’
’या भारतभूमिचा जय हो !’
जयजयकारातुनी उजळल्या शतकांच्या माला

हे हिन्दु नृसिंहा प्रभो शिवाजी राजा...

हे हिन्दुशक्तिसंभुतदिप्तितमतेजा
हे हिन्दुशक्तिसंभुतदिप्तितमतेजा
हे हिन्दुतपस्यापुतईश्वरिओजा
हे हिन्दुश्री सौभाग्यभुतिच्यासाज्या
हे हिन्दु नृसिंहा प्रभो शिवाजी राजा

करि हिन्दुराष्ट्र हे तु ते । वंदना
करि अंतःकरणज तुज । अभिनंदना
तव चरणी भक्तिच्याचर्चि । चंदना

गुढाशा पुरवी त्या न कथु शकतो जा
हे हिन्दु नृसिंहा प्रभो शिवाजी राजा


हा भग्न तट असे गडागडाचा आजी
हा मग्न आज जयदुर्ग आसवांमाजी
ही भवानिची ह्या पुन्हा गंजली धारा
ती म्हणुनि भवानी दे न कुणा आधारा
गड कोट जंजिरे सारे । भंगले
जाहली राजधान्यांची । जंगले
परदास्य-पराभिव सारी । मंगले
या जगित जगू हि आज गमतसे लज्जा
हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा


जि शुध्दि ह्रदाचि रामदास शिर डुलवी
जि बुध्दि पाचशाह्यास शत्रुच्या झुलवी
जि युक्ति कुटनितिक खलासि बुडवी
जि शक्ति बलोन्मत्तास पदतलि तुडवी

ति शुध्दि हेतुचि कर्मि । राहुदे
ति बुद्धि भाबड्या जिवा । लाहुदे
ति शक्ति शोणिता माजि । वाहुदे
दे पुन्हा मंत्र तो िदले समर्थे तु ज्या
हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा


- स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर.

वेडात मराठे वीर दौडले सात ...पूर्ण ...

वेडात मराठे वीर दौडले सात ॥ धृ. ॥

“श्रुती धन्य जाहल्या, श्रवुनी अपुली वार्ता
रण सोडूनी सेनासागर अमुचे पळता
अबलाही घरोघर खऱ्या लाजतील आता
भर दिवसा आम्हा, दिसू लागली रात”

वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ १ ॥

ते कठोर अक्षर एक एक त्यातील
जाळीत चालले कणखर ताठर दील
“माघारी वळणे नाही मराठी शील
विसरला महाशय काय लावता जात!”

वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ २ ॥

वर भिवयी चढली, दात दाबिती ओठ
छातीवर तुटली पटबंधाची गाठ
डोळ्यांत उठे काहूर, ओलवे काठ
म्यानातून उसळे तलवारीची पात

वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ३ ॥

“जरी काल दाविली प्रभू, गनिमांना पाठ
जरी काल विसरलो जरा मराठी जात
हा असा धावतो आज अरि-शिबिरात
तव मानकरी हा घेऊनी शिर करांत”

वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ४ ॥

ते फिरता बाजूस डोळे, किंचित ओले
सरदार सहा, सरसावूनी उठले शेले
रिकिबीत टाकले पाय, झेलले भाले
उसळले धुळीचे मेघ सात, निमिषांत

वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ५ ॥

आश्चर्यमुग्ध टाकून मागुती सेना
अपमान बुजविण्या सात अर्पूनी माना
छावणीत शिरले थेट भेट गनिमांना
कोसळल्या उल्का जळत सात, दर्यात

वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ६ ॥

खालून आग, वर आग, आग बाजूंनी
समशेर उसळली सहस्र क्रूर इमानी
गर्दीत लोपले सात जीव ते मानी
खग सात जळाले अभिमानी वणव्यात

वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ७ ॥
दगडांवर दिसतील अजून तेथल्या टाचा
ओढ्यात तरंगे अजूनी रंग रक्ताचा
क्षितिजावर उठतो अजूनी मेघ मातीचा
अद्याप विराणि कुणी वाऱ्यावर गात

वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ८ ॥

- कुसुमाग्रज

Monday, June 22, 2009

उत्तर पहार डरी सिवाजी न रिंदते

दूरजन दार भजी ,भजी बे समार चढी,
उत्तर पहार डरी सिवाजी न रिंदते

भूषण भनत भिन भूषण बसन सादे,
भूख न पिया सन ते नाहन को निंदते

बालक अयाने बाट बिच ही बिलाने कोमे,
लाने मुख कोमल अमल अरविंदते

धृगजल कज्जल कलित बढ्यो कढ्यो मानो,
दूजासो तो तरनी तनूजा कुलिनते

-कविराज भूषण

अर्थ :

त्या नरवीर शिवाजीच्या भीतीने शत्रु स्त्रिया आपली आभूषण टाकुन उपाशी तापशी नवर्यांच्या निंदा करीत अनिवार पाने उत्तरे कडील पहाडांवर , पर्वतांवर चढू लागल्या आहेत , अदन्यान बालकान प्रमाने निर्मल कमला प्रमाने असलेली कोमल मुख त्यांची कोमेजुन गेली आहेत , मूल तर वाट चुकून भलती कडेच निघून गेली आहेत ,त्यामुले त्यांच्या मातांच्या काजळ घातलेल्या डोळ्यातून अश्रूंचा जो प्रवाह सुरु जाला आहे, तो कालिंद पर्वता पासून निघालेल्या यमुनेचा दूसरा ओघ आहे की काय अस वाटायला लागल आहे .

महाराज सिवराज चढत तुरंग पर

महाराज सिवराज चढत तुरंग पर
ग्रीवा जाति नैकरी गनीम अतिबल की
भूषन चलत सरजा की सैन भूमिपर
छाति दरकती खरी अखिल खलनकी
कियो दौरि घाव उमरावन अमीरनपै
गई कटिनाक सिगरेई दिली दलकी
सूरत जराई कियो दाहु पातसाहुउर
स्याही जाए सब पातसाही मुख झलकी

-कविराज भूषण

अर्थ :

आधी चढे भोसला मर्द जो, तो अरीची लवे मान भीतीमुळे
त्वेषे निघाली यदा दौड तेव्हा किती कापली शत्रु वक्षस्थळें
केला अहा ! घाव दिल्ली दलाची जाणो नाकची कापली संगरी
जाळून तो सुरतेला शहाच्या उरी दाहालावी प्रभेला हरी

चक्रवर्ती चकता चतुरंगिनी

चक्रवर्ती चकता चतुरंगिनी चारिऊ चापि लई दिसिचक्का
भूप दुरीन दुरे भनि भूषन एक अनेकन बारिधि नक्का
औरंगसाहिको साहि के नन्द लर्यो शिवसाहि बजाय कै डंका
सिंह की सिंह चपेट सहै गजराज सहै गजराज का धक्का

-कविराज भूषण

अर्थ :

चक्रवर्ती चुगताई घराण्याचा वंशज औरंगजेबाने आपल्या चतुरंगदलाने चारी दिशांना आपला अंमल बसविला. कित्येक राजे दरी खोर्यात लपून बसले. काही समुद्रपार झाले. पण अशा औरन्गशाहाविरुद्ध शाहजीनंदन छत्रपति शिवाजी महाराज डंके वाजवून लढला. सिंहाच्या पंजाचा फटकारा सिंहच सहन करू शकतो आणि हत्तीचा धक्का दुसरा हत्तीच !

छत्रपति शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका

चारि चारिचौकी जहाँ चकत्ताकी चहूं और
साँज अरु भोर लगी रही जिय लेवा की
कँधे धरी कांवर, चल्यो जब चाँवसे
एकलिए एक जात जात चले देवा की
भेंस को उतारी डार्यो डम्बर निवारी डार्यो
करयों भेंस और जब चल्यो साथ मेवा की
पौन हो की पंछी हो कि गुटखा कि गौन हो
देखो कौन भाँति गयो करामात सेवा की

-कविराज भूषण

अर्थ :

चारी बाजूला या चुग़ताई वंशाच्या - चकत्याच्या म्हणजेच औरंगजेबाच्या प्राणघातक चौक्या दिवसरात्र बसलेल्या आहेत. कावड खांद्यावर घेऊन एक एक जण मोठ्या डौलाने देवाकडे जात आहेत. अशा वेळी त्यांनी ( छत्रपति शिवाजी महाराजांनी ) आपला वेष उतरवला, अवडंबर टाळलं, वेष बदलला आणि मेवा मिठाईच्या त्या पेटार्याबरोबर ते निघाले आणि पळून गेले. छत्रपति शिवाजी महाराजांची ही करामत बघून ( आग्र्याचे ) लोक थक्क झाले. त्यांना कळेना की ते ( छत्रपति शिवाजी महाराज ) वार्याच्या झुळकीसारखे गेले की पक्ष्यासारखे उडून गेले की गुटखा खाऊन एकदम गुप्त झाले.