Thursday, July 1, 2010

बालशिवाजीचा पोवाडा- शाहीर लहरी हैदर

चौक

ज्याची कीर्ति सार्‍या जगतांत । मृत्यु लोकांत दख्खन देशांत ।

महाशूर शिवाजी अवतरला । हिंदुधर्माच्या रक्षणाला ॥जी॥

असुरांनिं सारा मुलुख पिडिला । मानिना कोणी देवाजीला

ऋषींचा होम बंद पडला । न्याय नाही जगामंदि उरला ।

माय वळखिना लेंकराला । लागली चिंता महादेवाला ।

इचार केला बसुनि कैलासाला । दैत्यांचा मोड करायाला ।

अवतार शिवाजीला झाला । गा व्हय म्हन दादा, दादा रजी र दा जी०॥१॥

चौक २

गोरगरिबांचा कैवारी । राजा अवतारी ।

असा श्रीहरी । देशाचा पालनवाला ।

धांवुन येणारा संकटाला । जशि काय माय लेकराला ।

तसा तो शिवबा धनि आपुला । वाघ दख्खनचा जागा जाला ।

करावं साह्य त्येला । वैर्‍यांच्या भुलून संपत्तीला ।

लाळ भलत्याचिच घोटायला । लाज कशी नाहीं मुरदाडाला ।

पेटवा आपुल्या जिनगानीला । गा व्हय म्हन दादा ॥२॥

चौक ३

शिवबाची खरी बहाद्दरी । कोकण हेटकरी, घेऊनि बरोबरी ।

दिली त्यांना घोडीं बसायाला । शिलेदार करुनि बरोबरिला ।

झेंडा मराठयांचा फडकविला । राज्याचा पाया तोचि पहिला ।

घ्यावा म्हणू चाकणचा किल्ला । नरसाळा फिरंगोजी तिथला ।

गडकरी शूर लढनेवाला । शिवबानं जागविलं त्येला ।

वळविला तसल्या बहाद्दराला । पेटवा तुमच्या जिनगानीला ।

गा व्हय म्हन० ॥३॥

चौक ४

म्हणे शूर मर्द फिरंगोजी । मराठी गाजी, अकलेची भाजी,

तुझ्या कशि झाली ? सांग मजला । दास वैर्‍याचा कसा बनला ?

जात गोत धरम बुडवायाला । गेल्या तरि कुठं तुमच्या अकला ?

इसरला कुठं इरसरीला । द्या कि आया बहिणी दुस्मानाला ।

लाज नाहीं मिशा बाळगायला । शूरपणा कुठं तुमचा गेला ?

हिजडयावानि काय जलम असला । थूं तुमच्या जिनगानीला ।

गा व्हय म्हन दाद, दादा, र जी० ॥४॥

चौक ५

ज्याला नाहीं जातीची चाड, मुलूख तो द्वाड, कुत्रा खादाड ।

दुष्टाच्या जिनगानीला भूलला । कुळी नरकांमंदि घालायाला ।

कशापायीं घ्यावा जलम असला । सांगावं काय निलाजर्‍याला ।

धरम किर खास तुमचा बुडाला । लांचावलास कुत्र्या तुकडयाला ।

धरति किर तुमच्या बायकांला । ओढून नेतात रंगमहालाला ।

त्यांचा हंबरडा ऐकायला । कसा येईल रानदांडग्याला ।

थूं तुमच्या जिनगानीला ॥ गा व्हय म्हन० ॥५॥

चौक ६

शिवबाच्या पायिं लागुनी, फिरंगोजी म्हणी, आपुल्यावानी ।

आमाला गुरु नाहीं मिळाला । कुणाला ठावं धरम कसला ।

वाघाचा बच्चा असुनि त्येला । मेंढरामंदीच वाढविला ।

म्हणून जातीचा विसर पडला । झालो चाकर बघा आपुला ।

फिरुन गड सारा त्येनं दावला ।"म्हणा हो अपुला आतां किल्ला" ।

बोलून गड दिला शिवाजीला । फिरंगोजी चढला लौकिकाला

भाऊपणा शिवाजीसी केला । गा व्हय म्हन० ॥६॥

No comments:

Post a Comment