Thursday, July 1, 2010

छत्रपती शिवाजी महाराजांचा (पोवाडा) – शाहीर कुंतीनाथ करके

मिळवणी

महाराष्ट्र कुलस्वामिनी । शस्त्र धारिणी ।

दैत्य मर्दिनी । भवानी माय वंदितो आज ।

जन्मले छत्रपती शिवराज । स्थापिले शक्तिशाली साम्राज्य ॥जी जी॥

उत्तुंग दुर्ग शिवनेरी । वंद्य भूवरी । सह्याद्रि गिरी ।

काळ्या खडकांतुन अवतरला । पराक्रमी पुत्र जिजाईला ।

भवानीचे तेज शिवाजीला ॥जी जी॥

दांगटी

ज्यावेळीं सार्‍या देशांत । घ्या दिवसा पाप रस्त्यांत ।

लुटमार अब्रु घेतात । कुणी खाल्ल्या लाथा पेकटात ।

मोंगलानी गिळला भारत । नरसिंह पडले पिंजर्‍यात ।

त्याकाली न्हवता कुणी वाली महाराष्ट्रांत ॥जी जी॥

चाल -- जी जी ची

नवस मागते हात जोडुनी जिजा राजमाता ।

पराक्रमी रणधीर पुत्र दे धर्मवीर दाता ॥जी जी॥

हांक ऐकुनी प्रसन्न झाली शिवनेरीं माता ।

जगन्मंगले बाळ जन्मले प्रतिपालक जगता ॥जी जी॥

तेजःपुंज रविबिंब प्रभातीं चढे उंच गगनीं ।

जसा चंद्रमा कलेकलेनी तसा शिवा सदनीं ॥जी जी॥

धावती-जी जी ची

घेऊन मांडीवर माता बाल शिवबाला ॥जी जी॥

सांगते कथा वीरांच्या वीर पुत्राला ॥जी जी॥

रामाने कशास्तव चिरले दुष्ट दैत्याला ॥जी जी॥

अर्जुन संगरीं लढे पाप नाशाला ॥जी जी॥

ऐकतां कथा वीरांच्या स्फूर्ति शिवबाला ॥जी जी॥

बाळकडू दिले मातेने राष्ट्रपुरुषाला ॥जी जी॥

मिळवणी

दादोजी कोंडदेवाने । मोठया प्रेमाने । जिवाभावाने ।

मर्दानी धडे दिले शिवबास । रणांगणीं विजयी लढा देण्यास ।

लाठी दांडपट्टा भाला धरण्यास ॥जी जी॥

भरदार छातीचा वीर । शिवाजी शूर । मोठा झुंजार ।

युद्धशास्त्रात झाला निष्णात । अश्वारुढ घोडदौड करण्यात ।

गर्जु लागला दर्‍याखोर्‍यात ॥जी जी ॥

कटाव

सह्याद्रीच्या खांद्यावरती । हिंदु लागला शिवा भूपती ।

झडू लागलय नव्या नौबती । तरणे ताठे मर्द खेळती ।

कुस्त्या लाठया पट्टे फिरती । जोर बैठका दंड मारती ।

पराक्रमाची नवी निर्मिती । शक्ति शौर्य सामर्थ्य जागृति ॥हो॥

दांगटी

पुरुषार्थ केला जागृत । मर्दांच्या मर्द रक्तांत ।

पोलादी दंडा पिंडात । आली स्फूर्ति भगव्या झेंडयात ।

चढविले स्फुरण मावळयात । जे वाढले दगडा धोंडयात ।

जे राहिले कणी कोंडयांत । शिवबानं केला जागृत ।

रांगडा गडी रं तगडा महाराष्ट्रांत ॥जी जी॥

चाल : जी जी ची

सह्याद्रीच्या कडयाकडयातुन स्फूर्ती खळखळते ।

स्वातंत्र्याच्या संग्रामाची दुंदुभी झडते ॥जी जी॥

बोली हरहर महादेव ही गगनाला भिडते ।

त्याग भक्तिचे निशाण भगवे वरती फडफडते ॥जी जी॥

राष्ट्रशक्तीची शिवशक्तीशी युति इथे झाली ।

राष्ट्ररक्षणा धर्मभावना जरी पटक्याखाली ॥जी जी॥

मिळवणी

शत्रुला केले हैराण । क्षात्र तेजानं ।

पेटवी रण । किल्ले कपारीला चढवी हल्ला ।

शोभे पुरुषार्थ पौरुषाला । स्वराज्याची शपथ सह्याद्रीला ॥जी जी॥

तोरण्याला बांधलं तोरण । स्वाभिमानानं ।

शिंग फुंकुन । हिंदवी स्वराज्याला सुरुवात ।

भिजल्या रक्तानं संगिनी ज्यांत । सलामिच्या तोफा उडविल्या सात ॥जी जी॥

चाल : जी जी ची

मस्तवाल मग्रूर मोंगल सरदार ।

शिवशक्तीच्या कथा ऐकतां खचली कंबर ॥जी जी॥

शिवतेजाने महाराष्ट्राचा निरसे अंधार ।

रवितेजाच्या पुढे काजवे किडे थंडगार ॥जी जी॥

चाल : धांवती

कोंकणचा घाट उतरुन । कल्याणचा खजिना आला ॥जी जी॥

आबाजी सोनदेवानं । पकडिला अहमद मुल्ला ॥जी जी॥

सांपडली मुल्लांची सून । तारुण्य रुप नवतीला ॥जी जी॥

आणि आले आबा परतून । दरबारी हजर करण्याला ॥जी जी॥

मिळवणी

आबाजी बोलले शिवबाला । रत्‍नाची माला ।

आपल्या भेटीला । आणली सुंदरी आपल्यासाठीं ।

भडकले शिवा अग्निदृष्टी । शिवकळा भरली आबा कष्टी ॥जी जी॥

आम्ही असतो अधिक सुंदर । आमची आई ।

असती अशी तर । धन्य जन्मुनी हिच्या पोटीं ।

शील रत्‍नाचे शब्द ओठीं । स्वर्गातुन झाली पुष्पवृष्टी ॥जी जी॥

चाल : धावती जी जी ची

मानाने पाठवून दिले विजापुरीं तिला ।

उजळले शीलाचे तेज राजपुरुषाला ॥जी जी॥

मानुनी परस्त्री माता मान राखिला ।

लक्षांत ठेवा बंधुनो अशा घटनेला ॥जी जी॥

या इथें शिवाजी दिसे वंद्य सर्वाला॥जी जी॥

दांगटी

सरदार विजापुरवाला । घेऊन मोठया सैन्याला ।

आला प्रतापगडच्या पायथ्याला । शिवबानं वर्दी दिली त्याला ।

एकटेच यावे भेटीला । भेटीला खान चालला ।

मारुन मिठी राजाला । कांखेत दाबू लागला ।

वाघनखे लावून पोटाला । शिवबाने मोठया धैर्याने चिरलं खानाला ॥जी जी॥

मिळवणी

पुढे आला सिद्दी जोहार । पन्हाळ्यावर ।

कैद करणार । काक हंसाशीं शर्थ धरणार ।

भास्करापुढे दिवा जळणार । तसा शिवबाशीं झुंज देणार ॥जी जी॥

औरंग्याचा शाहिस्तेखान । दिल्ली सोडून ।

आला गर्वानं । सिंहाचा छावा कैद करण्यास ।

गाठलं शिवबानं रात्रीला त्यास । बोटं कापून पळविला खास॥जी जी॥

शिवा गेला दिल्ली दरबारीं । शहा सामोरी ।

हातावर तुरी । ठेवुनी आला महाराष्ट्रांत ।

आग्र्याहुन सुटका झाली प्रख्यात । दख्खनची अब्रू राखिली ज्यांत ॥जी जी॥

असा मर्द वीर अग्रणी । झुंजला रणीं ।

प्राण ओतुनी । भवानीची तळपे नंगी तलवार ।

प्याली दुष्टांच्या रक्ताची धार । गर्जला भवानीचा जयकार ॥जी जी॥

चाल-जी जी ची

जयजय रघुवीर शब्द मिळाले स्फूर्तिचे बोल ।

मेळवावा मर्द मराठा अर्थ ज्यांत खोल ॥जी जी॥

सोनेनाणें आम्हां मृत्तिका बोले तुकाराम ।

संतकृपा ही श्री शिवबावर होती निष्काम ॥जी जी॥

मिळवणी

शिवाजीने मंत्री मंडळ । नेमले तात्काळ ।

राज्य निर्मळ । न्याय नीतीने राज्य हाकणार ।

लोकशाहीने चाले दरबार । शिवाजी छत्रपति सरकार ॥जी जी॥

ही वाहिली शाहिरी कला । राष्ट्रपुरुषाला ।

शिवाजीराजाला । ध्यानीं मनीं स्वप्नीं स्मृति चित्तात ।

कुंतीनाथ करके शाहिर गातात । कोल्हापुरी कला महाराष्ट्रांत ॥जी जी॥

No comments:

Post a Comment