Saturday, January 16, 2010

समाजवादी शिवछत्रपति (पोवाडा) – शाहीर अमर शेख

चौक १

एक रात्रि सह्यगिरि हसला । हसताना दिसला ।

आनंद त्याला कसला । झाला उमगेना मानवाला ॥

रात्रीच्या गर्द अंधाराला । चिरुन सूर्योदय कसा झाला ॥

अरबि दर्याचा चेहरा खुलला । बांधावर आम्रवृक्ष डुलला ॥

आंब्याच्या डोलिंत कोयाळ दडला । सूर मंजूळ त्यानं काढला ॥

हर्षें मयुरानं टाहो फोडला । पोपटाचा थवा गात उडाला ॥

चिनण्यानी चिंवचिवाट केला । बोध मग मानवाला झाला ॥

चाल

सूर्य नव्हता शिवबा जन्मले । विश्व आनंदले ।

गाउं लागले । चराचर होऊन् शिवबाचे भाट ॥आग्‌ळा होता त्याच्या गाण्याचा घाट ।

काढलि शाहिरानं त्यातुनच वाट ॥

अमर शाहीर शिवबाचा भाट ।

पवाडयाचा थाट । ध्यानि घ्या राजे ॥

अहो राजे जी राघुबा दाजी ॥१॥

इतिहासकार इंग्रजी । मुलखाचे पाजी ।

केली थापेबाजी । त्यानि शिवबाला डाकू म्हटलं ॥

इंग्रजीचं बूट ज्यानि चाटलं । त्यानि शिवबाला चोर म्हटलं ॥

मराठयाला कधीं नाहि पटलं । कुभांड कशापायीं रचलं गेलं ते ॥

ऐका तुम्ही राजे ॥ अहो राजे जी राघूबा दाजी ॥

चाल : बदल

सुरतेला इंग्रजानि पहिली वखार घातली जी ॥

तेथुनच दिल्लीवर तोफ त्यानी रोखिली ।

रायगडावरुन दुर्बीण होति लागली ।

टप्प्यांत तिच्या ही तोफ अचानक आला जी ॥

चाल : धावती तराजुच्या बसुन काटयावर । तिचं नव्हतं कांहिं भागणारं ।

राज्य ती होती हाकणारं अवघ्या ह्या भारतावर ।

चाल : मिळवणी

शिवबा हे द्रष्टे होते थोर । हेरलं त्यानिं सारं ।

इंग्रज हे चोर । जळवा ह्या माझ्या वंशवेलिला ।

मराठयांच्या शूर भावि पिढिला । ग्रासतिल म्हणुन चढवूं हल्ला ।

नाहि तुडवाय्‌चं गुजराथ्याला । तुडवाय्‌‍चं फक्त इंग्रजाला ।

तसंच मोंगली सरदाराला । हिस्का दावायचा बेत केला ।

मन्‌सुबा ह्यो शिवप्रभूनि केला । मुंबईच्या घोडबंदराला ।

तराफा खाडित उभा केला । नवा देव मासा जन्मा आला ।

खाडित् सुरतेच्या थेट शिरला । निस्त्या शेपटाचा तडाखा मारला ।

लोळविलं हो चोर इंग्रजाला । तसंच राजापूर दाभोळाला ।

ज्या ज्या गोर्‍यांनी दावा मांडला । घात्‌ला तुरुंगांत आणि कांड्‌ला ।

शत्रु खरा दाबला पुढच्या पिढिला । भावि पिढीनं पण त्याला हेरला ।

कधीं दोन वर्ष इंग्रजाला । सुखाचा श्वास नाहि लाभूं दिला ॥

ऐका बघा राजे ॥ अहो राजे जी राघुबा दाजी ॥

नाहि केलि त्यानं लुटालूट । केलि एकजूट ।

मावळ्यांना नीट । मार्गावर ज्यानि आणिलं काल ॥

मराठी जन हृदयाचा लाल । जिजाई पोटिं निपजला बाळ ॥

जी जी जी ॥

चाल

आदि पुरुष लक्ष्मणसिंह, सजनसिंह, दिलिपसिंह, सिंहजी महाराणा भोजाजी

देवराजजी, इंद्रसेन, शुभकृष्ण, रुपसिंह भूमिंद्र, धापजी, बहिरट

दाजी रं हे जीहे जी बहिरट जी एकाहुन एक रणगाजी ॥जी जी ॥

वंशवेल खलाजीची, कर्णसिंह संभाजीची । बाबाजीच्या पोटीं आले मालोजी ॥

मालोजी पोटि पराक्रमी शहाजी जी जी जी ॥

चाल : मिळवणी

पेरावं तेच पीक येतं । जगाची रीत ।

नवं न्हाई त्यात । शहाजीनं पराक्रम पेरला ॥

शिवाजी सरजा अवतरला । मराठयाचा भाग्योदय झाला जी जी जी ॥

चौक २ : चाल

आडरानि आई बरं बाळ सापडला जावा ।

चौकडुन मुसळधार पाऊस येउं लागावा ।

सूंसाट वादळानं जीव घाबरुन जावा ।

कडकडुन विजेनं त्यांत डोळा उघडावा ।

वाघुबाच्या डर्काळ्यानि कलिजा फाटुनि जावा ।

वर्षाव दग्‌डी गारांचा वर्ति सुरु व्हावा ।

एवढयांत गुहेचा आसरा त्यास्नि लाभावा ।

आई बाळ मिळुन्‌ गुहेमध्यें जीव दडवावा ।

अचानक डोंगराचा कडा कोसळला जावा ।

असा प्रसंग महाराष्ट्राच्या नशीबि यावा ॥जी॥

चाल

अति लुटालूट जाळपोळ । उडे हाःहाःकार । मराठयाभर ।

माजला बकासूर, केला हो कहर । अब्रुचे जिणे जगण्याला ॥

केलं कठिण माय बहिणिला ॥

पाणवठा बंद जाहला ॥ गुरं, ढोरं न्हेति छावणीला ॥

वेठिला मर्द जुंपिला ॥

काय वर्णु मराठयास कळस जुल्‌माचा झाला ॥ जी जी जी ॥

उन तान पाऊस आणि वारा । असा खपणारा ।

वस्त्र ना निवारा । उपाशीं दिवस रात्र राबुन ॥शेतं पिकवितो घाम गाळून । सुगीचं शेत उभं पाहूनं ।

मराठा कुणबि जाइ हरकून ॥ जी जी जी ॥

चाल

हलती, डुलती शेति करोनी क्षणांत उध्वस्त ।

आदिलशाहिचा पिसाट घाली त्याभोंती गस्त ॥

काल विजापुर आज दिल्लीची धडक मराठयाला ।

डुकरमुसंडीमुळं भरलि होति धडकि मराठयाला ॥

तळ लष्करी परकीयांचा दिसे महाराष्ट्र ।

उघडया डोळ्यांनि मरण पहावे लागतसे स्पष्ट ॥

हत्ती, घोडेस्वार, स्वार सांडणी, पायदळ लष्कर ।

मळ्या, खळ्याची, उभ्या पिकाची वाट लावि सारं ॥

फिरंगि इंग्रज आग लावि कधिं आपुल्या गोठयाला ।

दरडीचा पण मिळे न आसरा दीन मराठयाला ॥उरला सुरला जीव गाडला करपट्टी खाली ।

म्हणुन बंधुनो हर हर भेरी शिवबाची झडली ॥

चाल

त्यांत बाजी घोरपडे । बाजी मोहिते, खंडागळे ।

सावंत देसाई खोपडे । सुर्वे, डबिर आणि पांढरे ।

चोर होते सारेच्या सारे । परक्यांचे पाय्‌ चेपणारे ।

स्वकियांचा घात करणारे । करणारे हो ॥

निंबाळकर जाधव अन् मोरे जी जी जी ॥

चाल

जाधवांचि करणि लई न्यारी । मामेभाऊ होति जगदेवराव ही स्वारी ॥राघोजी माने हाडवैरी । हे सदा त्यांच्यावरी ॥

इमानाने परक्याच्या दारीं । जातिवंत मराठे जगति खरकटयावरी ॥

मुस्लिम न् फिरंगिच कांहीं । नव्हते शत्रु, होते घरिदारी ठायीं ठायीं ॥ जी जी ॥

चाल

चक्रव्युहाहुन फास भयंकर आम्हांभोंति होता ।

अभिमन्यू शोधिते मराठी मूढमति जनता ॥

चक्रव्यूह भेदुनिही येइल विजयी होवोनी ।

असाच दिग्विजयी अभिमन्यू देते जिजा मानी ॥

चाल

आला आला शिवाजी आला । अरुणोदय झाला ।

लाल जनतेला, जिजानं दिला, योग्य समयाला ।

मराठयांनो करा रं जयजयकार ॥

थोर त्या आईचे उपकार । न्हाइं रं न्हाई तुमच्यानं न्हाई फिटणार ॥ जी जी जी ॥

चौक ३

बाळपणची ऐकावी कथा । जिजाईसुतानं ।

देशाचि व्यथा । जाणुनि स्वतः केलं काय काय ।त्याविणा नाहि झाले शिवराय । वंदिले माता, गुरुचे पाय ॥

जी जी जी ॥

चाल

व्यसनी, शौकिन माणुस त्यांना शत्रु दुजा भासे ।

दिसला हलकट त्याच्या भोंवती टाकितसे फासे ॥

चाल

दिसे काबाडकष्ट करणारा । त्याला बाळशिवबा देई तुरा ।

तो श्रमपूजन करणारा । स्वतः बागून मार्ग दावणारा ।

थंडि पाउस ऊन नाहिं वारा । असा घातला पालथा दरिखोरा ।

असो बिकट चढण उतरण । जाई बाळ शिवा सपाटयानं ।

वाघ सिंह श्वापदे यांची । भीति नव्हति त्याला कवणाची ।

गड किल्ले निरीक्षण केले । चोरवाटा मार्ग निरखले ।

गोड बोलुन जना मोहविले । किति शत्रु आपलेसे केले ।

कांहिं शत्रु होते कसलेले । त्यांना कपट जलिं पकडिले ।

दैवाला पंगु ठरविलें । मनगट श्रेष्ठ म्हणितलें ।

आधि राजबिंड असलेलें । पिंड व्यायामानें कसलेले ।

मैदानी मर्दाच्या कला । सार्‍या लागल्या शिवबा चरणाला ।

साहसाची आवड त्यांना मोठी । निर्धार घेइ त्यांना पाठीं ।

चाल : मिळवणी

शहाजीनं पेरलं पिक आलं । हिरवं गार झालं ।

डुलूं लागलं । जिजाइचा मळा फुलून आला ॥

मोत्याची कणसं लागलि त्याला । सोन्याची ताटं शिवाराला ।

शिवा रायगडीं होता गेला । ताटं थेट गेली रायगडाला ।

शोभा त्यानिं आणलि सिंहासनाला । भोसले कुलदीप सिंहासनिं रवि तळपुं लागला ॥

मग व्हय मन दादा । दादा रं दाजी जी ॥

चौक ४ : चाल : धावती

शिवबा सरजा राजा होतो । भूमिहीनां प्रेमे कवळितो ॥

त्यांना जमिन मिळवुनी देतो । मिळवून बियाणं देतो ॥

भू लागवडीला आणितो । माळरानीं मळा फुलवितो ॥

महसुलाची शिस्त लावितो । झेपेल इतका कर घेतो ॥

पण सावकारांना आडवितो । ऐपती प्रमाणंच घेतो ॥

सावकार जो कर चुकवितो । सक्तीनं त्याला दंडितो ॥

जरबेंत राज्य चालवितो । परी जनतेला सुखवितो ॥

शिवबाचं नांव जो घेतो । अन्‌ चोर्‍या छापे घालतो ॥त्यासाठीं चौक्या बसवितो । यमसदनिं चोर पाठवितो ॥

सरकारी नोकर जो होतो । त्याला खुषित सदा ठेवतो ॥

जो शूरपणा दावतो । कडं, तोडा, घोडा त्याला देतो ॥

इनामदारी त्याज्य ठरवितो । जमिनदारालाही रोधितो ॥

देवाचि धरति मानतो । ती फक्त कसणार्‍याला देतो ॥

गरिबांना वचन जे देतो । ते पुरेपूर पाळतो ॥

परधर्माला वंदितो । सर्वांना न्यायि वाटतो ॥

चाल

नव्हति सत्ता पोलिसां हाती । लाच खायची नव्हति हिंमत, कुणाची छाती ॥

सभा न्यायदानाच्यासाठीं । सभासद निवडले न्याय तोलुनी देती ॥

न्यायदानीं ढवळाढवळीची । काय बिशाद लागली माय व्यालि कोणाची ॥

न्यायदाते थोर छत्रपति । हा डंका वाजला झालि चोंहिकडं ख्याति ॥

चाल

काळाबाजार हा शब्दच नव्हता शिवबा समयाला ।

शेठया एखादा नाडी जनतेला मिळे फांस त्याला ॥

पुंड पाळेगार, मातले जमिनदार सावकार सारे ।

वाट लावितो सर्वांची शिवबा परभारे ॥

जमिनी वाटुन दिल्या शिवबानें कसणारांना त्या ।

जळवा सगळ्या नष्टच केल्या होत्या नव्हत्या त्या ॥

चाल

पटवून स्वराज्याचा अर्थ दिला जनतेला ।

मावळा मराठा सर्व घेऊन संगतीला जी जी ॥

शिवबानं घेउन अवतार ध्वजा रोविला जी जी ॥

धन मान प्राणाहुन प्यार आम जनतेला जी जी ॥

चाल

हाक घुमे मग नविनच गगनि नव महाराष्ट्रांत ।

परकी हाकला सगळे घालून पेकाटांत लाथ ॥परकी सत्तेविरुद्ध लढणें ब्रीद मराठयाचे ।

दावुं जगाला आम्हीच वारस श्रीशिवरायाचे ॥

महाराष्ट्राचा वारा, पाणी सर्व कांहिं न्यारें ।

या दावाया मर्द मराठे समधं चला या रे ॥

चाल

"व्हा पुढें चला पुढें व्हा पुढें चला पुढे । हाक कानि शिवबाची गगनि झडति चौघडे ॥

व्हा पुढें चला पुढे ॥ या मराठि जनतेचे राज्य स्थापण्या चला पुढें ॥

व्हा पुढें चला पुढें ॥ दिल्लि आदिलशाहीला चारण्यास या खडे ॥

व्हा पुढें चला पुढें ॥ आनंदें ध्वज गगनिं शिवबाचा फडफडे ॥

व्हा पुढें चला पुढें ॥

चौक ५

जेव्हां शिवबा सर्जा रणि आला । खुल्या मैदानाला ।

रवी लकाकला । ध्वनी "हर हर महादेव" घुमला ॥

आदिलशाहिचा कुजका इमला । करुं या जमिनदोस्त सगळा हो ॥ या हो या राजे ॥

चाल

दख्खनचे मर्द लढणारे मराठे शूर ॥

कांबळी, उशाला धोंडा न् भाकर कांदा आम्हां जरि प्यार ॥

जन्मता ठावं न्हाइ आम्हां जिणं लाचार ।

स्वप्नींही गुलामी नाहीं सहन करणार ॥

सच्च्या मराठयाचं एक ब्रीद हेंच असणारं ॥

म्हणुनीच लावुनी प्राण पणा लढणारं ॥

हेर हेरुन जमविले असे मराठे वीर ॥

गुरुंढोरं न्हाइ जमविली निस्ति खिल्लारं ॥

हिंदु मुस्लिम भेद वलांडून जमविले शूर ॥

चाल

सह्याद्रीनें बाहु पसरले उभारुन किल्ले ।

जाळीखालीं वाघ मावळे पाजळती भाले ॥

गड ठाकला उभा आपुला राखण्यास शेती ।

उठा बंधुनो गड सत्ताविस अजुन शत्रु हातीं ॥

चाल

उठ्‌ला अव्‌घा मराठा उठला । बाण जणु सुट्‌ला ।

बाँब जणु फुटला । दगडांतही नवा जीव आला ।

मनसुबा आगळा त्यानं रचला । शेतकर्‍याच्या गोफणीत बसला ।

दुश्मनाचा माथा त्याला दिसला । थेट मेंदूंत दगड घुसला हो शत्रुच्या दादा ॥

तुम्ही ऐका ॥

चाल

वार्‍यानं रंग पालटिला । कोपरान्‌ कोप्‌रा व्यापिला ।

दिलि साथ ठेंग्‌ण्या बहिर्जीला । सारा वारा आप्‌ला हेर झाला ।

तो धाडी उडत पक्षाला । पोप्‌टाला, व्हल्या पारव्याला ।

कळवलं हे झाडा झुडपाला । चराचर लागलं कामाला ।

दरिखोरा आगळ्या धुंदींत नाचुं लागला जी जी ॥

चाल

खेळ विटीदांडू गोटयांचा पोरांचा सुटला ।

ढाल तलवारिचा शत्रु धरायचा खेळ त्यानी थाट्‌ला ॥

सुगंध घेऊन पुष्प येई तें अर्थ नवा सांगे ।

सुगंध दरवळुं या ऐक्याचा श्री शिवबामागें ॥

दंवबिंदूंची कोमलताही पूर्ण लया गेली ।

ठिण्‌गी आगीची भासे अरीला गठडि त्याचि वळली ॥

अरबी दर्या बनला होता हुकुमाचा बंदा ।

भासे शिपाई शिवबाचा तो सच्चा अन् खंदा ॥

म्हणुन मिळवला विजयदुर्गवर विजय मराठयांनी ।

ह्याच इंग्रजाचं टोपडं उडवलं पाजलं होतं पाणी ॥

तोफेमधुन पण गोळा उडाय्‌चा अजब मासल्याचा ।

कर्दनकाळच भासे शत्रुला शिवबा भोंसल्याचा ॥

चाल

अफझूल खानानं फुजूल बकवा केला ॥

विजापूर दरबारी विडा काय उचलला ॥

त्या प्रतापगडीं अभिमन्यु होता वेढिला ॥

अभिमन्यु शिवबानं खल कौरव ओळखिला ॥

नव्या दुर्योधनाचा कोथ्‌ळा त्यानं काढिला ॥

शिवबानं असा सव्याज विडा धाडिला ॥

चाल : मिळवणी

असा मोड शत्रुचा केला । झेंडा उभविला ।

गनिमि काव्याला । महाराष्ट्रांत जन्म घातला जी जी ॥

निर्वंश बाजि घोरपडा करुन टाकिला ॥

चंद्रराव मोर्‍याकडं गेला । चुचकारुन पाहिलं त्याला ।

ईर्षेला तोहि पडलेला । त्याचा पुरा पुरा मोड केला ।

बाया मुलं सोडुन बाकिच्याना स्वर्ग दाविला जी जी ॥

मोर्‍यांचं नांव लावणारा नाहि कुणि उरला ॥

बांदलांचा पुंडावा त्यानं मोडुन काढिला ॥

आणि आम जनतेचा दुवा त्यानं घेतला ॥

चाल

शाहिस्ता पुण्यामध्यें आला । एक लक्ष सैन्य दिमतिला ।

पाच सातशे हत्ति साथिला । पाच हजार उंट काफिला ।

चाल

दोन हजार छकडे घोडयांचे होते साथिला जी जी ॥

तीन हजार छकडयावर दारुगोळा लादला ॥

बत्तीस कोटीचा खजिना होता पाठिला ॥

तीन महिने लागले फौज खाली यायाला ॥

या अफाट फौजेचा व्यूह आगळा रचलेला ॥

चाल

दरोबस्त पहारा बसविला । कडयाभोंवती कडा रचलेला ।

त्याच्या आंत खान बसलेला । सदोदीत सावध असलेला ।एक रात्रि शिवबाचा गनिमि कावा जागला ।

तो शास्ता खानाच्या पाठी क्षण लागला ।

थय् थय् थय् थय् निस्त्या बोटावर्ति त्याला नाचविला ।

त्याच्या चक्रव्यूहाचा चुथडा चुथडा जाहला ।

अभिमन्यु शिवा पुनः खुशाल सिंहगडि आला ॥

रुस्तूम जमानाचा जमाना पालटुन दिला ।

त्या उदयभानुचा पुरा अस्त घडविला ।

दिल्लीरखानाचा दिल हलवुन सोडिला ।

एक समय अचानक आला । शिवबा सर्जा आग्‍र्याला गेला ।

दरबारांत मान नाहि त्याला । रांग तिसरी मिळाली त्याला ।

तो मनीं बहुत कोपला । रोकडा शब्द सोडला ।

शत्रुनं गराडा दिला । आग्‍‍र्‍याला व्यूह रचलेला ।

त्या मध्यें सर्जा अडकला । दिली धडक व्यूह फोडला ।

अभिमन्यु राजगडि अभिमानें धडकला जी जी ॥

अतिरथी शत्रु आघाडिला । वेंचवेंचून काढिला, कुठें वेढिला ,

ठेचुन काढिलान् गनिमि कव्याचा हिस्का त्याला दाविला ऐका बघा राजे ॥

चाल

महाराष्ट्राच्या दर्‍याकपारित सिंहाचा छावा ।

पळतां थोडि भुइ करित शत्रुला दावुन गनिमी कावा ॥

चाल

शिवबाचा पाहुन दळभार । हादरलं विजापुर सारं ।

दिल्लींत भरलं कापरं । पोतुगीझ इंग्रज हे चोरं ।

लालबुंद त्यांचे चेहरं । पण पडलं काळंठिक्करं ।

देशमूख पुंड पाळेगारं । मातले ते झाले गारेगारं ।

दावून दिलं जगताला । जन्मता आम्हा मराठयाला ।

कसलि लढाई ? अरे कसलि लढाई मळ हातचा झाला ।

पाचविला पुजतो तलवार बरचि अन्‌ भाला ।

स्वातंत्र्य राखतो देउन प्राणाच्या मोला ।

जे कार्य हातिं घेउं पुरे नेउं शेवटाला ।

चाल

नवा मनसुबा मनांत बांधा हे शिवबा सांगे ।

बेत आपुला पुरा कराया धावा त्या मागें ॥

चौक ६ : चाल

शत्रुला वागवायची नीति । आगळि त्याची होती ।

दीप संस्कृती । आजही मार्ग दावि जगतास ।

परस्त्री माता वाटे शिवबास । आज झाला पुरा संस्कृतिचा र्‍हास ।

होइल त्यामुळेंच सत्यानास जी ॥

चाल

आफझल यमसदनाला । पाठवून पुरा मोड केला ।

त्याचा मुलगा शोधुन काढिला । जो गर्द झाडित लपलेला ।

भितिमुळं गाळण उडालेला । शिवबापुढं त्याला उभा केला ।

भरलं होतं कापरं त्याला । शिवबानं धीर त्याला दिला ।

बेटा डरो मतबोलिला । पाठीवरुन हात फिरविला ।

पोशाख उमरावाचा दिला । आणि घोडा दिला संगतिला ।

त्याला बहुमान देऊन, मोठया इज्जतीनं । विजापुर दरबारास पाठविला ॥जी॥

नाहीतर आजच्या दुनियेंत, । विसाव्या शतकात । सांगतो काय होतं ।

प्रश्न पुरुषाचा द्या सोडून । शत्रु देशांतल्या स्त्रिया ओढून ।

आब्रूचे धिंडवडे काढून । टाकती माणुसकीच गाडून जी जी ॥

चाल

एकोणीसशे त्रेपन साल । कोरियांत युद्ध सुरु झालं ।

अमेरिकन सैन्य तिथं आलं । उत्तर कोरियांत गेलं ।

नर्स बायानाहि पकडिलं । त्यांना नागडं उघडं पण केलं ।

मिरवीत रस्त्यानं नेलं । नीतिशास्त्र पायिं तुडविलं ।

चाल

इतकं दूर कशाला जावं । गिरगांव चौपाटिला जावं ।

दादर, पुण्यांत थोडं भटकावं । शाळा, कॉलेजभवति हिंडावं ।

डोळं सताड उघडं ठेवावं । कानावरचं झाकनं काढावं ।

गल्लोगल्ली आणि दारोदारी, । मायबहिणिवरी ।

प्रसंग येती ते, आज तुम्ही उघडया डोळ्यानी पहावं जी ॥

चाल

परकी स्त्री मानी माता । असा शिवबा सर्जा होता ॥ जी हा ॥

दिला त्रास कुणी बाईला, । बांबूने झोडपुन ठार करितसे त्याला ॥

आई मुलगी केशर सिंगाची, । धारातीर्थी पडलेल्या आपल्या एका शत्रुची ॥

वागणूक देउन मानाची, । पाठविले दिल्लीला सेवा करुनी त्यांची ॥

कल्याणच्या सुभेदाराची---सून आई मानली साची ॥

तिला चोळि बांगडी केली---सौंदर्यपुतळि गहिंवरुन सासरी गेली ॥

कर्नाटक प्रांति राणीला---शिवबाच्या सरदारनं त्रास दिला तो कळला ।

देहांत शासन दिलं त्याला, । दुर्गंध नरकाची सजा फर्माविली त्याला ॥

चौक ७ : चाल

संस्कृति नीतिसाठीं खरा मार्ग दावाया ।

घ्या समोर आजही छत्रपती शिवराया ।

आरमार पूर्वी होतं फक्त मक्केला जाया ।

आरमार उभारलं पश्चिमेस राखाया ।

भारतीं जन्म दिला ज्यानं गनिमिकाव्याला ।

भारताचा पहारेकरी मराठा झाला ।

आग्र्‍यांत शिवबाचं थडगं बांधणार्‍याला ।

थडगं बांधुन घ्यावं लागलं शिवबा चरणाला ।

जो दुःख, दैन्य, दारिद्रय अंधकाराला ।

चुटकीत सारितो दूर, नमावे त्याला ।

चाल

आजही हवा मज असाच शिवबा माझा ।

तो समाजवादी महाराष्ट्राचा राजा ।

तो राजा कसला लोकशाहीचा कलिजा ।

तो असुनि राजा पर समाजवादी सरजा ।

मुजरा माझा त्या महान् संस्कृतिबुरुजा ।

भागवीत होता आधि जनतेच्या गरजा ।

नफ्यासाठी धडपडे त्यास म्हणे तू मर जा ।

ठावं न्हवता विसावा फक्त ठावं होति प्रजा ।

सारी हयात घोडयावर गेलि । काया झिजवली ।

प्रजा सुखि केली, । कीर्ती पसरली ।

अशी फुलवेली । पुनः उगवली नाहि बघा राजे ॥

अहो ॥ कधिं बरें पुनरपि सह्यगिरी हसणार ?

आनंद त्याचा कधीं उसळुन वर येणार ?

रात्रिच्या अंधाराला सूर्य कधीं चिरणार ?

अरबी दर्याचा चेहरा कधीं खुलणार ?

बांधावर आंब्याचा वृक्ष कधी डुलणार ?

आंब्याच्या डोलित कोयाळ कधीं गाणार ?

हर्षानं मयुर कधिं सांगा टाहो फोडणार ?

पोपटांचा थवा कधिं गात पुनः उडणार ?

चिमण्यांचा चिव्‌चिवाट्‌ आग्‌ळा कधी होणार ?

झोपडीवर सुखाचं तोरण कधी दिसणार ?

शाहिराच्या मनींची ओढ, । काळजाचा फोड ----।

फुटुन तो गोड गळ्यानं गीत कधीं गाणार ॥जी॥

अजि समाज-शिवबा बनुन मजपुढं यावा ।

तो साडेतीन कोटीत समवला जावा ।

त्यानं शिवबा सरजाचा कित्ता आज गिरवावा ।

सत्तेचा नांगर जरबेंत त्यानं चालवावा ।

नफेबाज चोर त्यानं सर्व दूर सारावा ।

अवघा समाज समृद्ध-सुखी बनवावा ।

त्या थोर समाजशिवबाचा पोवाडा गावा ।

ही फक्त अमर अभिलाषा । दुजी न्हाई भाषा ।

एक ही आशा । शाहिराचा गोड हट्ट पुरवावा, । राजे जी जी ॥

1 comment:

  1. a very good and rare collections
    thanks for that

    ReplyDelete