Saturday, January 16, 2010

छत्रपति शिवाजी महाराज (पोवाडा) – शाहीर वसंत बापट

धन्य धन्य शिवाजी महाराज वीर रणधीर ।
स्वराज्याचा घातला पाया ज्यानं खंबीर ।
लोकांचा राजा न्यायी गुणगंभीर । शिवछत्रपतींची कीर्ति,
दिगंतावरती, पवाडे गाती, कवी शाहीर ॥जी॥
ऐका ऐका ऐका नरनारी, सांगतो सारी, कहाणी ही न्यारी,
असा राजा न पुन्हा होणार । राष्ट्राचा झाला तारणहार ।
म्हणुन शाहीर कीर्त गाणार ॥जी॥
मायभवानीचा गोंधळी आलो तुमच्या दारीं, माझी ऐका मात न्यारी,
भीमाशंकराशेजारी, किल्ला आहे शिवनेरी, राजे भोसल्यांच्या घरीं,
जिजाऊला लेक जाहला, लाभला दिवा वंशाला,
जसा शुक्लपक्षिचा चंद्र वाढूं लागला ॥जी॥
कंसाची मथुरापुरी राज्य आसुरी, तसा विजापुरी,
राज्य करी अदिलशहा सुलतान, दरबारांत होते कैक हैवान,
घालती जुलमाचें थैमान ॥जी॥
राजे शहाजी भोसले शूर, लढाईंत चूर, भोळे भरपूर, दरबारीं शत्रू होते त्यांना फार,
सुलताना कानमंत्र देणार, शहाजी राज्य तुमचें घेणार ॥जी॥
चाल
पुरे धोकेबाज विजापूर । अचानक उठलं काहूर ॥
निसटला शहाजी शूर । पळवला घोडा चौखूर ॥
थेट गाठलं त्यानं बंगलूर । संसार ठेवला दूर ॥
जिजाबाई दुःखानं चूर । दिनरात डोळ्यांना पूर ॥
पतिवीण करु तरी काय, कसा धरुं धीर ॥जी॥
कृतनिश्चय झाली ती शिवबाची माता ।
ती म्हणे शिवा तुज मायबाप मी आता ।
प्रभु रामा ऐसा होई तूं शककर्ता । शिवा म्हणे वाहतो आण,
सतीचे वाण, घेतले जाण, स्वराज्याकरतां ॥जी॥
कारभारी दादोजी लाखामध्ये एक, मोठे इमानाचे नेक,
त्यांच्या हातीं दिला लेक, शिकविल्या हो नाना कळा,
मुलखाची दावली अवकळा, आयाबाया सोसत्याती छळा,
रयतेचा झाला पाचोळा, कळवळे शिवा कोवळा,
जमविला एक निष्ठेचा मर्द मावळा ॥जी॥
जरी बालवीर कोवळा, जमविला मेळा, मर्द मावळा,
रोहिडेश्वरा साक्ष ठेवून, बोलला शिवबा तप्त होऊन,
लढू या प्राण पणा लावून ॥जी॥
चाल
गोकुळचा नंदकिशोर । जरी होता वयानं पोर ।
तरी प्रताप त्याचा थोर । केला ठार कंस शिरजोर ।
सारी पृथ्वी झाली बिनघोर । तसा आपण धरु या ओर ।
बोला बोला माझ्या संगती कोण येणार ॥जी॥
चाल
वानरसेना जरी चिमखडी, ठाकली खडी, मावळे गडी,
वचन ते देती शिवबाला, वाहिले पंचप्राण तुजला ।
हर हर महादेव बोला ॥जी॥
भीमसेना परी बलदंड पासलकर बाजी ।
अर्जुना परी तो मालुसरा तानाजी ।
गनिमाला वाते यमफास कंक येसाजी ।
वीरांना नवे बळ आले, सरसावून भाले, सज्ज ते झाले, सारे रणगाजी ॥जी॥
चाल
तोरण्यावरी तोरणा बांधून घातला पाया ॥
मावळे निघाले आदिलशाही जिंकाया ॥
चुटकासरशीं सुभानमंगळ घेई शिवराया ।
विजापूर त्याच्या धाकानं लागे कांपाया ।
फितुरांना काढी ठेंचून धडा शिकवाया ॥
मोर्यांनचा मूर्ख अभिमान ठरविला वाया ॥
चाल
अवघड मुलुख जावळी, मोर्यांलची कुळी, होती महाबळी,
चंद्रराव धुंद होता गर्वांत । टपला स्वराज्याचा कराया घात ।
शिवबानं केली त्यावरी मात ॥जी॥
रागाने कांपे आदिलशाही । अंगाची लाही । सुचेना कांहीं ।
चंद्रराव होता त्यांचा सरदार ॥ शिवबानं केला मोर्याीला ठार ।
बोला तर सूड कोण घेणार ? ॥जी॥
शिवबाचं ऐकतां नांव । मिशीवर ताव ।
देती उमराव । थरथरा कांपतात परि आंत ।
जात अवसान सार्यार देहात । कोण उचलील शिवावर हात ॥जी॥
विजापूरचा क्रूर हैवान । दुष्ट सैतान । नांव अफझलखान ।
होता गर्विष्ठ आणि बलवान ॥ उचलुनी घेई पैजेचं पान ।
म्हणे चुव्व्याचा घेतों मी प्राण ॥जी॥
चाल
विजापुराहुन खान निघाला । संगें अगणित बर्ची भाला ।
हजार हत्ती बडा रिसाला । बंदुक तोफा अन्‌ जेजाला ।
तुळजापुरवर घालुन घाला । फलटण लुटुनी वाईस आला ।
म्हणे कुठे तो चुव्वा लपला । जिवंत धरुनी नेईन त्याला ।
जा जा सांगा कुणी शिवाला । हात जोड ये शरण आम्हाला ।
जर का मजवर हल्ला केला । तुफान मी, तू केवळ पाला ।
खान पाठवून दे वकिलाला । शिवबा सांगे निरोप त्याला ॥जी॥
चाल
शिवबा म्हणे खान तुम्ही मोठे । चुव्वा मी कोठे ।
भीती मज वाटे । कसा मीं येऊं तिकडे तोर्यांजत ॥
आपणच यावे जावळी खोर्यांमत । भेटतों तुम्हां तुमच्या डेर्यां।त ॥जी॥
चाल
’अच्छा अच्छा’ बोलला खान खूष मनिं झाला ॥
एकांतांत मारुं शिवबाला बेत त्यानं केला ॥
मैदान सोडलें प्रतापगडाला आला ॥
अफझलखान पुरा बेभान ठावं शिवबाला ॥
शिवा पुर्याा तयारीनिशी भेटीला गेला ॥
चाल
जरिपटका गगनीं उडे । सह्यगिरि कडे ।
गर्वानें खडे । मातितुन वीर उभे केले ।
गवताचे झाले लाख भाले । शिवाजी छत्रपती झाले ॥
सन १६७४ । रायगडावर । झाला जयजयकार ।
वाद्यांचा गजर भिडे गगनास । झाला अभिषेक शिवाजी राजास ।
हिंदवी राज्य आले उदयास ॥
चाल
जाहीर जगाला केले । शिवराय छत्रपति झाले ॥
आनंदित झाले वारे । रोमांचित झाले तारे ॥
नाचतात सागर लहरी । आनंद भरे गिरिकुहरी ॥
थय्‌थया नाचते बिजली । अन्‌ मेघगर्जना झाली ॥
जणुं आकाशांतिल वाणी । मज शिकवुन गेली गाणी ॥
म्हणुनि मी पवाडा गातो । रसिकांनो ऐकावा तो ॥
चाल
चिलखतावर झगा आबाशाही । जिरेटोप डोई ।
बिचवा एक बाहीं । वाघनखें दुसर्याो बाहीला ।
संगतीं शूर जिवा महाला । संभाजी कावजी जोडीला ।
शिवाजी डेरेदाखल झाला । खुशी लई वाटली खानाला ।
’आओ बेटे आगे तो आओ’ बोले शिवबाला ।
’आओ बेटे, गले लग जाओ' बोले शिवबाला ।
’मैं दूँगा कुछ भी तुम चाहो’ बोले शिवबाला ॥लांडगा, रानदांडगा बोले प्रेमाने ।
मगरमिठी कोकरु शिवबाला घातली वेगाने ।
खंजीर खुनी खुपसला अफझलखानानें ।
वाघनखें बिचवा चालवून । कोथळा काढून ।
पोट फाडून । टाकलं सर्जानें ॥
चाल
’तोबा तोबा’ खान बोलला । भुईस लोटला ।
झाला गलबला । सैयद बंडा ये पुढे समयास ।
जिवा महाल्यानं पुरा केला त्यास । यशश्री लाभे शिवरायास ॥ जी ॥
फडकला मराठी झेंडा गगनावरती । आनंद समुद्रा प्रचंड आली भरती ।
हा धन्य धन्य शिवराय जाहली कीर्ती । भयभीत झाली अदिलशाही ।
तशी निजामशाही । मोगलपातशाही । हादरली पुरती ॥
चाल
विजापुरी झाला हाहाःकार । शिवबानं ठार ।
केला सरदार । रागानं लाल झाला सुलतान ।
बोले ये शहाजीका सन्तान । बन गया पुरा पुरा सैतान ॥
चाल
बडी बेगम पेटली हट्टाला । सिद्दि जोहर तिनं धाडला ।
फाजलखान होता साथीला । पन्हाळ्यांत शिवबा कोंडला ।
शिवबानं किल्ला लढविला । दाद नाहीं दिली खानाला ।
तेव्हढयांत प्रकार काय झाला । इंग्रज आला मदतीला ।
त्याच्या संग तोफखाना आला । तटावर गोळा डागला ।
शिवाजीनं विचार काय केला । गड आपल्या हातांतुन गेला ।
हवी युक्ति अशा घटकेला । शरण येतो बहाणा केला ।
फाजलखान मनीं हरखला, बक्षिशी दिली फौजेला ।
जल्लोश सुरु जाहला । हातांत शराबी पेला ।
नाच रंग आला रंगाला । तिकडे मध्यरात्र प्रहराला ।
शिवबानं गुंगारा दिला । बाजी प्रभु घेऊन संगतीला ।
विशाळगडच्या लागला वाटेला । पन्हाळ्याचा वेढा फोडून सर्जा निसटला ॥
( नव्हं नव्हं ) पोलादी पिंजरा तोडून सिंह निसटला ॥
चाल
ऐकून शिवाच्या पराक्रमाचा डंका । औरंगजेब चरकला मनीं धरि शंका ।
जाळाया येतील वानर माझी लंका । त्याचा मामा शाहिस्ताखान ।
फौज देऊन । धाडला त्यानं । प्रसंगचि बांका ॥
चाल
मोगलफौजा आल्या वेगात । मराठी मुलखांत ।
झाला उत्पात । शाहिस्ता आला पुणें शहरांत ॥
छावनी दिली लाल महालांत । शिवबाला चैन नाहीं दिनरात ॥
चाल
शिवबानं विचार मग केला । खान फार जोरावर आला ।
जसवंतसिंग मदतीला । कसा निभाव लागेल आपला ।
बेसावध गाठु या त्याला । शिवाजीनं वेश बदलला ।
लग्नाचा वर्हााडी झाला । चार सहा मित्र सोबतीला ।
अंधार रात्र प्रहराला । बेधडक आला शहराला ।
लाल महाल त्यानं गाठला । वाडयावर छापा घातला ।
’तोबा तोबा’ ओरडा झाला । बेगमांनीं कालवा मांडिला ।
जाग आली त्यानं खानाला । त्यानं जवा पाह्यलं शिवबाला ।
थरथरा कांपूं लागला । खान सैरावैरा धांवला ।
खिडकीतून निसटूं लागला । शिवबाने वळखलं त्याला ।
अदंजानं वार एक केला । घाव बसला त्याच्या पंज्याला ।
बोटांचा तुकडा पाडला । वाचला खान परि अब्रु गमावुन गेला ॥
चाल
शाहिस्त्याचीं बोटें तुटली चिडला आलमगीर, जसा झाला वेडा पीर,
आतां धरुं कसा धीर, डोंगरचा चुव्वा माजला, त्याला ठार करिल आजला,
असा वीर माझ्या दरबारी कोण गाजला ॥
दरबारांत होता मिर्झा राजा जयसिंग, म्हणे ’जय एकलिंग’, या शिवाजीची झिंग,
उतरुन टाकतो पुरी, ’खाविंद, घ्यावी चाकरी’, बादशहा म्हणे ’जाणतो तुमची बहादुरी’ ॥
त्याच्या संगें मदतीला दिला दिलेरखान । होता क्रूर तो पठाण ।
संगे लष्कर तुफान । हाहाःकार झाला देशांत ।
आले शिवाजीच्या राज्यांत । जिंकून घेतले कैक किल्ले मुलखांत ॥जी॥
चाल
जयसिंगानं केला हाहाःकार लोक गांजले ॥
मुरारबाजी परी मोहरे कैक हरपले ॥
शिवबा म्हणे राज्य राखाया हवे आपले ॥
चाल
असा विचार करुनिया मनी । भेटे जयसिंगाला जाउनी ॥
जयसिंग म्हणे शिवबाला । जा भेटा औरंगजेबाला ॥
तुम्ही करा शहाला अर्जी । तुमच्यावर होईल मर्जी ॥
शिवबानं केला निर्धार । यावेळीं घ्यावी माघार ॥
पण फिरुन येतां संधी । शत्रूची उडवूं चंदी ॥
चाल
दुनियेमधि होते तसे कैक नरवीर ।
कुणी मुत्सद्दी तर कुणी श्रेष्ठ रणधीर ।
परि खरा दरारा गाजवी आलमगीर ।
आग्र्या ला भरला दरबार, मोगल सरदार,
रजपूत लाचार, झुकवती शीर ॥
चाल
राहिला शिवाजी उभा अशा दरबारी ॥
नरसिंह वाटला तेजस्वी अवतारी ॥
औरंगजेब तो और धोरणी भारी ॥
शिवाजीचा केला अपमान खवळली स्वारी ॥
सह्याद्रि सिंह गर्जला हबकली स्वारी ॥
चाल
कोंडला शिवा पंजरी । कैद केला जरी ।
वीर केसरी । कोल्ह्याला शरण काय जाणार ।
शक्तिबुद्धिचा शिवा अवतार । फोडुनी कोंडी झाला पार ॥
शिवराय निसटुनी गेला । कळलं औरंग्याला ।
जळफळाट झाला । करकरा चावी रागानं दात ॥
गावला होता चुव्वा हातांत । युक्तीनं केली माझ्यावर मात ॥
चाल
परत घेतले सारे किल्ले । करि शत्रूवर गनिमी हल्ले ।
दूर दूरचे गाठी पल्ले । मोगलखजिने त्यानें लुटले ।
स्वातंत्र्याचें तुफान उठले ॥
चाल
वैर्यातचा घेई तूं सूड, पेटवी चूड, उचल आसूड,
जिजाई बोले शिवरायास । गडावर जिंकले गड,
त्यांत अवघड, किल्ला सिंहगड, पाहिजे ध्यायास ॥
बेलाग उंच गडकोट, चौबाजू तट, बिकट लई वाट,
असा हा किल्ला कोण घेणार । तानाजी मालुसरा शूर,
बहाद्दूर वीर, खरा नरवीर, नेक सरदार ॥जी॥
लेकाचा लगीन सोहळा, गोत झालं गोळा,
मित्रांचा मेळा, उमराठे गांवा । आधिं लगीन कोंडाण्याचं, मग रायबाचं,
धाडला राजाला त्यानं सांगावा ॥जी॥
झरझरा गाठी सिंहगड, भयंकर चढ, कडे अवघड,
भोवती किर्र रान घनघोर ।
काळोख भरला त्यांत काळाभोर । कडयावर लावले तानाजीनं दोर ॥जी॥
चाल
मराठयाचा पोर काय कधीं मरणाला भ्याला ॥
तानाजी मावळ्यासंग गडावर चढला ॥
अंधार रात्र चमकला मराठी भाला ॥
उदयभानू शूर गडकरी चवताळून आला ॥
चाल
भाला बरची ढाल तलवार । भिडले अनिवार ।
वारावर वार । खणाखण झुंज चाले घनघोर ।
पराक्रम केला तान्यानं थोर । हाय परि तुटला औक्षाचा दोर ॥
चाल
शेलारमामा आला चालून त्याच घटकेला ॥
दोन्ही हातीं पट्टा घेऊन वार त्यानं केला ।
उदेभान एका घावांत यमा घरी नेला ॥
चाल
गड आला सिंह माझा गेला ।
दुःख शिवबाला । बोले रायबाला ।
शिवाजी मेला, ताना जगणार ।
वीर तो अजरामर होणार ।
पवाडा गंधर्वही गाणार ॥जी॥
चाल
गडकोट जिंकले पराक्रमानें साठ ।
अन् स्वतंत्र केले तळकोकण वरघाट ।
हा कणा मराठी केला ज्यानें ताठ ।
तो धन्य शिवाजी धन्य, असा नाहीं अन्य,
वीर असामान्य, सार्या। जगतांत ॥

2 comments: