Saturday, July 11, 2009

नरवीर तानाजी मालुसरे (पोवाडा) - शाहीर लहरी हैदर

चौक १
ज्यांची त्रैलोकीं कीर्ति गाजती । जो दक्षिणाधीपती ॥
शिवाजी छत्रपती । रणांत ज्यानें गाजविली तलवार ।
तानाजी मालुसरे त्यांचा सुभेदार । तसा नाहीं योद्धा हल्ली मिळणार ॥ध्रु०॥
महाड संस्थानांतिल छोटे । गांव ऊमराठे ।
कोंकण तें मोठें । डोंगराळ देश जंगल चोरवाट ।
मावळे लोकांची वस्ती आटोकाट । वनश्री रम्य दिसे आफाट ॥
त्या खेडयांतील राहाणार । तानाजी वीर ।
मराठा शूर । शिवाजिशी त्याची मैत्रि असे दाट ।
लहानपणापासून फक्त दुजे ताट । अशापरि त्यांनी जुळविला घाट ॥
अशा परिवारात तानाजी । दिसे रणगाजी ।
उमेद नित्य ताजी । अंगलोट वळण बाभळिची गांठ ।
भव्य दिसे चेहरा कल्ले असे दाट । मिशा पिळदार सदोदित ताठ ॥
चाल : जी जी जी जी
सडपातळ पण शत्रूस काळ दिसतसे जी जी ॥
पाणीदार डोळे त्याच्याकडे पहावत नसे जी जी ॥
निमगोरा वर्ण सिंहापरि भासत असे जी जी ॥
त्या वज्रापरि द्वयहस्त भासती जसे जी जी ॥
लोखंडासारख्या मांडया पोटर्या दिसे जी जी ॥
पांच हजार जोर एका दमांत काढित असे जी जी ॥
बैठकी वगैरेस त्याच्या गणती नसे जी जी ॥
मेहनतीच्या जागी घामानें चिखल होतसे जी जी ॥
त्यास आकनि पुलाव्याचें खुराख लागत नसे जी जी ॥
भाकरीवर मुठीनें तीळ पिळुन खातसे जी जी ॥
पैलवान आताचे पहा नाजुक तब्येती कसे जी जी ॥
कित्येकांस पुरी बासुंदीचा घास लागतसे जी जी ॥
चाल-गिलच्याची
असा वीर मावळा तानाजी खंदा तो निपजला ॥
छत्रपती शिवाजीस लहानपणापासून मित्र हा भला ॥
दांडपट्टा मर्दुमकी भिनलेली त्याच्या हाडा-मांसाला ॥
पूर्ण प्रेम शिवाजीचें म्हणून सुभेदारी दिली तानाजीला ॥
तानाजीच्या मदतीनें शिवाजीनें कैक किल्ला सर केला ॥
शिवाजीची मातुश्री जिजाबाई नित्य बोले शिवाजीला ॥
शिवबा तुजला तानाजी हा बंधुच आहे धाकला ॥
त्यावेळी औरंजेब बादशहा होता दिल्ली तक्ताला ॥
हिंदु लोकांचा द्वेष बादशहाचे मनीं भरलेला ॥
तेणेंकरुन हिंदुवर जुलमाचा कहर अती उसळला ॥
चाल : मिळवणी
यासाठीं शिवाजी वीर । घेऊनि अवतार ।
आले भूवर । अजरामर कीर्ति केली अनिवार ।
तानाजी मालुसरे त्यांचा सुभेदार । तसा नाही योद्धा हल्ली मिळणार ॥१॥
चौक २
सिंहगड आणखी भुलेश्वर । सात कोसावर ।
पुण्यापासून दूर । डोगरांच्या ओळी नैऋत्येला ।
त्यांत एक सुळका वरती गेला । त्यावर आहे कोंडाण्याचा किल्ला ॥
याच किल्ल्याविषयीं तानाजीचा । भाग शूरत्वाचा ।
वर्णितो सांचा । प्रथम किल्ल्याच्या माहितीला ।
देऊन निवेदितो भाग पुढला । लक्ष असो विनंति ही सकला ॥
कोंडन किंवा कौंडिण्यपूर । पायथ्यावर ।
हल्लीं खरोखर । कौंडिण्य ऋषीच्या आश्रमाला ।
म्हणतसे कोंडाण्याचा किल्ला । हल्ली म्हणती सिंहगड त्याला ॥
तीन हजार तीनशें फूट महान्‌ । समुद्रापासून ।
उंची प्रमाण । पुण्याच्या सपाटीपासून धरला ।
अडीच हजार फूट उंच भरला । आहे प्रचंड किल्ला असला ॥
कल्याण व पुणें असे दोन । दरवाजे महान ।
आज मितिस छान । दिसत आहेत पहा सकलां ।
झुंजार बुरुज उत्तरेला । कलावंतिणीचा दक्षिणेला ॥
( चाल : दुकानें औषधवाली )
या किल्ल्याविषयींची कहाणी हो । थोडिसी कथितो या स्थानीं ॥
नागनाइक नामें कोळीराजाच्या । ताब्यांत होता किल्ला हा त्याच्या ।
त्याच्यापासून यवनांनी हो । घेतला होता जिंकोनी ॥
अहमदनगरच्या अमदानींत । शहाजी राजांच्या तो होता ताब्यांत ।
सत्य जाणतिल ज्ञानी हो । डोलतील वार्ता ऐकोनी ॥
त्रिंबकच्या सुभेदारानें जिजाबाई साहेबांना । पकडून नेऊन सोडून दिल्यावर त्यांना ।
कोंडाण्याचे ठिकाणीं हो । राहिल्या होत्या येवोनी ॥
व्रिजापूरकरानें पाठलाग करितां । शहाजी दडून याच किल्ल्यांत होता ।
सत्य घ्यावे परिसोनी हो । इतिहास देतो समजोनी ॥
चाल : गिलच्याची
पुढें विजापुरकराकडे शहाजीने धरली नोकरी ।
किल्ला विजापूरकरांच्या ताब्यांत गेला गोष्ट ही खरी ।
पुणें प्रातांच्या संरक्षणार्थ हाच किल्ला बहुपरी ।
ज्यांचें त्यांचें लक्ष याच किल्ल्यावर जात असे सत्वरी ।
शिवाजीमहाराजांनी स्वराज्यांचें तोरण ज्या अवसरीं ।
तोरणा किल्ल्यावर बांधुन कोंडाणाहि घेतला तो सत्वरी ।
अशी दिली माहिती किल्ल्याची तात्पर्यांत अपुरी ।
चाल : मिळवणी
ज्यानें स्वतः हिमतीनें किल्ला । लढून सर केला ।
घोर समयाला । तोच शिवछत्रपतिचा सरदार ।
तानाजी मालुसरे बहादर सुभेदार । तसा नाहीं योद्धा हल्ली मिळणार ॥२॥
चौक ३
वर्णूं तानाजिची बहाद्दरी । तो शूर केसरी ।
शत्रुस काळ परी । नांव ऐकता दुष्ट मोंगलांस ।
भीतिनें हींव भरत होतें त्यास । होऊन गेला खंदा वीर समयास ॥
तानाजी व सूर्याजी दोघे बंधू । कल्पनेचा सिंधू ।
जणू का रवि इंदू । हेच दोन्ही हात शिवाजीचे खास ।
यांच्या सहाय्यानें मराठी राज्यास । स्थापिलें शिवाजीनें दक्षिण देशास ॥
कोंडाणा किल्ला घेण्याचा । हेतु शिवाजीचा ।
निश्चित होऊन साचा । कळविला बेत या दोघा बांधवास ।
ऐकून आले स्फुरण दोन्ही योध्यांस । म्हणति महाराज आज्ञेचाच अवकाश ॥
शिवाजीची मातुश्री जिजाबाई । वीराची माई ।
तानाजी लवलाही । बंधुसह घेतां तिच्या दर्शनास ।
आशिर्वचनांत बोलली त्यांस । तुम्हीच पाठीराखे माझ्या शिवबास ॥
जसे धर्मास भीम अर्जुन । पराक्रमी महान ।
तसे धैर्यवान । बंधुवत्‌ तुम्ही शिवाजीस खास ।
करुन साह्य राखाल हिंदुधर्मास । कराल बंधमुक्त हिंद देशास ॥
चाल : जी जीजी
जिजाबाई बोले आहे भवानी तुम्हां साह्याला ॥
याची खात्री आजपर्यंतची आहेच तुम्हांला ॥
करुनिया मुजरा तानाजीनें निरोप घेतला ॥
उमराठें गांवी येऊन लागला पुढिल तयारीला ॥
शूर शिपाई निवडक मावळे काढले बाजूला ॥
प्रत्येकाच्या जवळ जंबिया व बर्ची भाला ॥
तिरंदाज लोकांचा कंपू वेगळा केला ॥
घोडे आणखी उंटावर बाण भरले समयाला ॥
किल्ल्यावर चढविण्यास तिनशें घोरपडवाला ॥
खंडापट्टा बोथाटया परज समशेरवाला ॥
कडेकोट तयारीनें मावळा लोक जमला ॥
चाल : गिलच्याची
प्रत्येकाच्या चेहर्यायवर वीरश्री तेव्हां चमकुं लागली ।
तलवार चमकती जणू काय ढगांतील बिजली ।
केली सर्व फौजेची तयारी उणीव नाहीं राहिली ।
बोले बंधु सूर्याजी तानाजीस वेळ आहे चांगली ।
इच्छा आहे माझी थोडया लोकानिशीं जावें मी त्या स्थलीं ।
येतों किल्ला सर करुन दादा मज हुकूम व्हावा या कालीं ।
वेळ पडेल तर मग मागाहुन यावें तुम्ही त्या स्थलीं ।
चाल : मिळवणी
शिवाजीचे विश्वासू दिलदार । बाजी फसलकर ।
येसाजी हुषार । पुष्कळ होते पण कुशल लढणार ।
तानाजी मालुसरे बहाद्दर सुभेदार । तसा नाही योद्धा हल्लिं मिळणार ॥३॥
चौक ४
सूर्याजीस बोले तानाजी । शाहाब्बास सूर्याजी ।
आहेस रणगाजी । वाटेल तेवढी फौज तू जा घेऊन ।
येउं नये शत्रुस पाठ दावून । उजाडण्यापूर्वी गांठ जाऊन ॥
सूर्याजीचा गनीमी कावा । कुणास समजावा ।
घेऊन फौज तेव्हां । व्याघ्र जणुं गर्जु लागे खवळून ।
तसा सूर्याजी चौताळून । गर्जे हरहर महादेव म्हणून ॥
जसा पारधी श्वापदासाठीं । टपून त्यांस गांठी ।
तशीच हातोटी । किल्ल्यातटीं भिडला सरसाऊन ।
चालविला मारा दांत खाऊन । थरारले आंतिल वीर पाहून ॥
उदयभानू रजपूत सरदार । होता किल्लेदार ।
हाडाचा शूर । फसला यवनांचें दास्य करुन ।
जात्याभिमानास गेला विसरुन । अधर्मकर्दमीं पडला घसरुन ॥
त्याची पत्नीस नांव प्रभावती । खरीच प्रभावती ।
पतिव्रता सती । प्रार्थीत नित्य देवास कळवळून ।
रजपूत तेज गेलें कुठें मावळून । अधर्मानें टाकियलें आवळून ॥
ऐसा सतीचा पति तो किल्लेदार ॥ धूर्त बुद्धि फार ।
त्यानें किल्ल्यावर । रजपूत शिपायांना धैर्य देऊन ।
तोफा दिल्या तटावरती ठेवून । दिली सरबत्ती खालीं पाहून ॥
चाल : साधी
तोफांचा वरुन भडिमार । सारे दणाणले अंबर ॥
बंदुका उडती अनिवार । जणुं गारावृष्टी अनावर ॥
लालभडक गोळे अंगार । पहातां हातपाय थंडगार ॥
पण निधडया छातीचे हे वीर । मावळे लोक बहाद्दर ॥
त्यांना साह्य भवानीशंकर । तेथें काय कुणाचें चालणार ॥
बिन मार्यां्ची जागा सुंदर । त्यांना मिळाली होती भरपूर ॥
तेथून लपून बाण भराभर । होते सोडित मावळे हुषार ॥
केले वरिल बहुतेक लोक ठार । वरच्यांचे फुकट जाती बार ॥
अशी धुमश्चक्री तासभर । एकसारखि चालली अपार ॥
चाल : हो जी ची
तीस उंट बाण भरलेले हो । झाले खलास सूर्याजिनें पाहिले जी ॥
नाहीं अशानें भागत वाटले हो । जाऊन शत्रूस पाहिजे गांठले जी ॥
किल्ला अवघड उपाय खुंटले हो । चढण्यासाठीं इलाज खूप केले जी ॥
पांच वेळां थोडे वर चढले हो । पण थकुनि लोक खाली पडले जी ॥
सूर्याजीनें मनीं जाणिलें हो । आपल्या फौजेचे दोन भाग केले जी ॥
अर्धे किल्ल्याच्या पिछाडिस नेले हो । अर्धे तेथेंच लपवुन ठेविले जी ॥
पिछाडिच्या बाजुनें आलेले हो । लोक किल्लेदारानें पाहिले जी ॥
चाल : मिळवणी
कावा गनीमी सूर्याजीनें केला । शत्रुस फसविला ।
ऐकून समयाला । शिवाजी मनीं थक्क झाला अनिवार ।
तानाजी मालुसरे बहाद्दर सुभेदार । तसा नाहीं योद्धा हल्लीं मिळणार ॥४॥
चौक ५
लोक पाठविले मागिल बाजूला । फसविले शत्रूला ।
गनिमी कावा केला । खात्री झाली उदयभानुची खास ।
मोर्चा वळविला पिछाडी भागास । साधला डाव सूर्याजी वाघास ॥
पिछाडीवर सुरु केला मारा । किल्ल्यांतुन सारा ।
उदयभानु खरा । वीर पण गांगरला समयास ।
मावळा लोक हुषार दडून आसर्याास । भुलवी जसा चित्ता व्याघ्र हरणास ॥
जणुं बावरली भेकरें । रजपूत वीर सारे ।
कावरेबावरे । होऊनिया म्हणती एकमेकांस ।
सैतान बडा भारी हाय ये बदमाश । इसका नहीं लगता म्हणति अदमास ॥
सूर्याजीनें विचार असा केला । मागील बाजूला ।
शत्रु गुंतला । आपण चाल करावी पुढील भागास।
फोडुन किल्ल्याचे दरवाजास । घुसावें आंत हेंच उचित आपणांस ॥
आपल्या लोकांस म्हणे सूर्याजी । वीर हो गाजी ।
धनी शिवाजी । यानें धाडिले आहे आपणांस ।
अधर्माने ग्रासलेल्या देशांस । उद्धरायासाठीं आला तो जन्मास ॥
चहुंकडे झाला भ्रष्टाकार । हिंदुलोकांवर ।
जुलुम अनिवार । म्हणून आली दया श्रीशंकरास ।
घेऊनी अवतार शिवाजी रुपें खास । प्रगटला हिंदु धर्म रक्षणास ॥
चाल : लगट
आम्ही तुम्ही हिंदुचे बच्चे । हाडाचे सच्चे ।
नव्हे अर्धकच्चे । दर्जा आमचा उच्च ।
असुनी हे लुच्चे । मानती आम्हा तुच्छ ।
मोराचीं पिच्छें । बांधुन अंगाला ।
हे बगळे गडयांनो दटाविती हंसाला ॥ यास्तव धैर्य मनीं धरा ।
आठवा उमावरा । कीं शंभो हरा ।
म्हणुन ललकारा । करुनिया त्वरा ।
किल्ल्यामध्यें शिरा । शत्रुजन धरा ।
कापा चरचरा । दावा शौर्याला ।
अजरामर करुं या सनातन धर्माला ॥
ऐकतां लोक कडेकोट । थरारुन उठले चावती ओठ ।
माजले हत्ती खावोनी रोट । सिंहाचे बच्चे फोडूं त्यांचा गोट ।
कटयारी खुपसुन फाडूं पोट । टाकूं कडयाखाली बांधुनी मोट ।
शत्रूला दाऊं शौर्य अलोट । छातिवर बसून नरडीचा घोट ।
घेऊं समयाला । असें म्हणून धांवले खूप चढुन त्वेषाला ॥
जाऊन भिडले दरवाज्यावर । बंद दरवाजा मजबूत फार ।
लोखंडी तगड परते हत्यार । मग सूर्याजी करित सुविचार ।
मराठे वीर आम्ही बहाद्दर । आम्हांस काय दरवाज्याची खातर ।
म्हणून तीस हात उंच तटावर । मोकळया पायानें चढले भराभर ।
तया वेळेला । दुर्ग लंकेचा हे वानर भेदिती त्याला ॥
चाल : महासागरी हाय हाय हाय
बहाद्दर ते मावळे लोक । दाविलें खर्याल शौर्याला ॥ध्रु०॥
तटावरुन आंत जावोनी । दरवाजा उघडिला त्यांनीं ॥
मावळा लोक आंत शिरला । एकदम चढविला हल्ला ॥१॥
बंदुका तीर बंद पडले । हातघाईवर वीर भिडले ॥
समशेरी चमकती भाले । खणखणाट त्यांचा उडाला ॥२॥
भेदाया चक्रव्यूहाला । अभिमन्यु बाळ जणु शिरला ॥
असा भास मनाचा झाला । त्या पाहुन सूर्याजीला ॥३॥
जणू गज कमलें उपटोनी । टाकितो तडागांतूनी ॥
तशीं शत्रु-शिरें छेदूनी । टाकितां सूर्याजी दिसला ॥४॥
चाल : मिळवणी
’जय शिवाजी’ म्हणुन करी वार । घावांत दोनचार ।
शत्रु होती ठार । शिवाजीच्या होत आनंद मनीं फार ।
तानाजी मालुसरे बहाद्दर सुभेदार । तसा नाहीं योद्धा हल्लीं मिळणार ॥५॥
चौक ६
असे चाललें रणकंदन । दुमदुमलें रण ।
वीरांचें आक्रंदन । धुळीनें व्यापियला तो ठाय ।
शत्रु किंवा मित्र त्यांत ओळखाय । समजेना म्हणती करावें काय ॥
रजपूत लोक लढती बेभान । मोठे धैर्यवान ।
लढाऊ महान। मरती पण मागे घेतीना पाय ।
कौरव पांडवांचें युद्धच कीं काय । असें लागलें मनीं बाटाय ॥
तानाजीनें किल्ल्यापासून दूर । बर्यालच अंतरावर ।
फौज तय्यार । ठेवुन होता बैसला आठवित शिवराय ।
लढाईचें वर्तमान तरी काय । अजुनी कोणि येईना म्हणे सांगाय ॥
शिवाजीचा सेवक बहिर्जी । मावळा तो फर्जी ।
शिवाजीची मर्जी । त्याच्यावर पूर्ण, कारण ते काय ।
हेराच्या कामीं कुशल शिपाय । नंबर एक अचूक बातमी घ्याय ॥
तो बहिर्जी लढाईतून । बातमी पूर्ण ।
आला घेऊन । घडलेलें वर्तमान ऐकाय ।
तानाजीची उत्कंठा वर्णाय । कविमति गुंगलि सुचेना काय ॥
सूर्याजीचा पराक्रम खरा । ऐकुन खुले चेहरा ।
अंग फरफरा । फुगून लागला मन डोलवाय ।
वीराचाच बच्चा धन्य त्याची माय । लांडगे ते म्हणति वाघापुढें काय ॥
(चाल : मी माळिन तूं फुलमाळी )
इतक्यांत निरोप दुजा आला । वीरश्रींत साधली संधि कशी चिंतेला ॥ध्रु०॥
हिरोजी नामे नोकर जो शिवाजीचा दुसरा । महाराजाची आज्ञा म्हणे आज युद्ध बंद करा ॥
उद्या सकाळी तुम्हास येइल मदत ती । येइल किल्ला सहजचि मग आपुले हातीं ॥
म्हणे आतां करावं कसं याला । चहुबाजूंनीं पडला पेंच तानाजीला ॥१॥
मदतीसाठी महाराजानीं का घाई केली । गडावरती फौज सूर्योदया पूर्वींच गेली ॥
म्हणोनी मीही निघालों तिकडेच आतां । नाइलाज न ये लढाई बंद ठेवितां ॥
दिलगिरी वाटति मनाला । याचि क्षमा व्हावि सांग विनंति महाराजांला ॥२॥
इतक्या अवधींत ऐका हकिगत किल्ल्यांतली । असंख्य शत्रू संहारिले सूर्याजी तो महाबली ॥
एक्या अमृतास्तव देवादिकें समुद्र मंथियला । तसा सूर्याजी उदयभानूस कीं शोधूं लागला ॥
म्हणे उदयभानु हा कसला । उदयाचल सोडुनि कुठें गेला अस्ताला ॥३॥
उदयभानूचा मेहुणा मोहनलाल यानें । पायीं वार करुन पळाला तो मागल्याबाजूनें ॥
अपघातें वार लागता जखमी तो झाला । धिक्कार असे म्हणतसे रजपुतांच्या कुळीला ॥
होतां जखमी वेढिलें त्याला । जणुं चक्रव्यूहामध्ये अभिमन्यू सांपडला ॥४॥
( चाल : मज टाकुनी बाळा जासी )
सूर्याजी शत्रूंनीं धरला । मराठयांचा तो धीर तूटला ॥ध्रु०॥
मालुसरा । आहे दुसरा ।
तानाजी तो । आणाया ।
समरीं त्या । आम्हीं जातो ।
असे बोलुन मावळे फिरले । तानाजी सन्मुख आले ।
पण चेहरे हिरमुसलेले । काय बरें ।
झालें खरें । सांगा त्वरे ।
तानाजी त्या पुसूं लागला ॥१॥
सूर्याजिला । कैद केला ।
शब्द येतां । वाहवा रे ।
षंढ कां रे । तुम्ही दिसतां ।
कशि लाज तुम्हां नच त्याची ।
बुडवितां कुळी मराठयांची ।
मागें फिरा । शस्त्र धरा ।
चाल करा । भित्रा हा स्वभाव कुठला ॥२॥
अहा रे भूता । रजपूता ।
माजलासी । तूंच पाहे ।
गांठ आहे तानाजीशीं । आजपासुन तीन दिवसांत ।
तुला ठार करुन किल्ल्यांत । भगवें निशाण लावलें नाहीं त्यांत ।
तर कुलहीन । मी होईन ।
जीव देइन । लागो बट्टा माझ्या या कुळीला ॥३॥
(चाल : मिळवणी)
अशी घोर प्रतिज्ञा केली । शूरवीर बली ।
कीर्ति गाजविली । छत्रपति शिवाजीचा आधार ।
तानाजी मालुसरे बहाद्दर सुभेदार । तसा नाहीं योद्धा हल्लीं मिळणार ॥६॥
चौक ७
इकडे किल्ल्यांत घडलेले वर्तमान । करितों निवेदन ।
तानाजीचा पण । कथन करुं पुढें योग्य भागास ।
कुर्हाचडीचा दांडा काळ गोत्रास । अशी एक व्यक्ति जाणतो समरास ॥
प्रभावती जवळ वाढलेला । भाऊ जोडलेला ।
मोहनलाल भला । त्याच्या मनीं कपट आलें समयास ।
उदयभानुचा व्हावा यांत नाश । म्हणजे किल्लेदारी मिळेल आपणांस ॥
असें जाणून त्यानें कारस्थान । योजिलें महान ।
आंगठी चोरुन । आणली त्यानें प्रभावतीची खास ।
शिवाय सूर्याजीस धरले वक्तास । घेतली होती त्याची आंगठी आपणास ॥
आतां करणार म्हणतो कारस्थान । अतिशय छान ।
जुळवितों संधान । किल्ला बादशहास किंवा मराठयास ।
कुणासही जावो, देणारे ते खास ।
किल्लेदारी याच मोहनलालास ॥ आधीं तुरुंगांत सूर्याजीपाशीं ।
वळवावें जाऊन त्याशीं । वेळ येइल तशी ।
करावी नवी युक्ती त्याच प्रसंगास । किल्लेदारी आहेच माझ्या नशिबास ।
असा झाला गर्क मनोराज्यांस ॥ दिवसा लढून रजपूत थकलेले ।
म्हणुन मद्य प्याले । झिंगत बैसले ।
तुरुंगावर पहारा लागला घोरायास । मोहनलाल मध्यरात्रीं सुमारास ।
शिरला तुरुंगांत काढुन कुलपास ॥
( चाल : पनघटु पर होरही धूम)
आंत जाऊनी मोहन त्यांस । वदत समयास कपटपटु झटकीं ॥ध्रु०॥
धरीं वाट तूं म्हणे सूर्याजीला । पहा दरवाजा उघडीला ।
निसट झट खास सटक झटपट कीं ॥१॥
सूर्याजी दचकुन पाही । म्हणे विपरीत सर्वच कांहीं ।
दिसत ही खास फुकट लटपट कीं ॥२॥
बोले मोहन आणखी त्याला । युद्धामध्यें पाहुन तुजला ।
मोह पडला प्रभावतिला कीं ॥३॥
झणिं सोडविण्याशीं तुजला । वेष बदलुन धाडिलें मजला ।
झाली ती खास आशक तुझ्यावर कीं ॥४॥
सूर्याजी कपट म्हणी सारे । साध्वी त्या रजपूतणी रे ।
नव्हे पापी, थाप तुझी लटकी ॥५॥
शिवाय शूर मराठा वीर । नव्हे चोरासारखा पळणार ।
नको तुझी जारे युक्ति शिळपट कीं ॥६॥
(चाल)
किल्लेदाराचा मेहुणा । मोहनलाल जाणा ।
बंधु प्रभावतिला । हो । होता मानलेला ॥१॥
लहानपणापासुन त्यांनी यास । पाळला होता खास ।
आतां उलटला । हो । जातीवर गेला ॥२॥
किती नीचपणा तरी मनीं । सूर्याजीस म्हणी ।
खरें वाटण्याला । हो । खूण पटण्याला ॥३॥
तिनें दिली आंगठी ही घ्यावी । कुलपाची चावी ।
मागिल दाराला । हो । चोरवाटेला ॥४॥
तेथुन तिच्याकडे जाया । वाट आहे राया ।
मंदीराला । हो । सूर्याजी चकला ॥५॥
म्हणी कपट पाहिजे कपटयासी । थाप द्यावी याशीं ।
याच वेळेला । हो । मोहनलालाला ॥६॥
तुझें म्हणणें खरे आहे बरे । जातों मी किरे ।
म्हणुन निघाला । हो । बाहेर पडला ॥७॥
बाहेर जाऊन म्हणतो मोहनलाल्या ।
बाहेर ये रे साल्या । वीर नाहीं भुलला ।
हो । तुझ्या कपटाला ॥८॥
(चाल : मिळवणी)
त्या नराधमासी साचा । जमालगोटयाचा ।
जुलाब जोराचा । सूर्याजीनें दिला छान खुबीदार ।
मोहनलालास पुरती आली गार । म्हणतो चिंता नाहीं घेइन समाचार ॥७॥
चौक ८
सूर्याजी गेला म्हणून याची । मोहनलालाची ।
कायली अंगाची । होऊन गेली आग तळव्याची मस्तकास ।
म्हणतां बच्चाजी नाहीं सुटलास । घालतों तुला वेगळाच गळफांस ॥
योजिले कृष्ण-कारस्थान । बनावट पत्रें दोन ।
स्वताहा खर्डून । शिपाई बनुन गेला राजवाडयास ।
उजाडण्यापूर्वी शिवाजी महाराजास । पत्र आणि आंगठी हुजुरास ॥
शिवाय सूर्याजी प्रभावतीवर । आशक आहे फार ।
वचन खरोखर । दिलें तिला, मदत करणार रजपुतांस ।
असा गुतला तिच्या मोहास । वाचविणार म्हणतो किल्लेदारास ॥
असें ऐकून कोप शिवाजीला । अतिशय आला ।
आलेल्या शिपायाला । निरोप देऊन, करित विचारास ।
शंकरानें विष गिळलें प्रसंगास । तसा पोटीं घाली शिवाजी रागास ॥
येथुन मोहनलाल वेषधारी । जाऊन सत्वरीं ।
तानाजीच्या करीं । पत्र दिलें दुसरें वाचुन पाहण्यास ।
फितुर आणि परस्त्रीचा अभिलाष । शब्द हे झोंबले त्याच्या काळजास ॥
लाल डोळे थरारले ओठ । अग्नीचा लोट । भडकला दाट ।
वाटे जणुं सूर्य कोपला खास । भस्म करणार जाळुन सर्वांस ।
तसा तानाजी दिसे सकलांस ॥
(चाल : आजिसाहेब)
गर्जे तानाजी रागानें धिक्कार असो तुजला ।
वीरसिंहा पोटीं सूर्याजी हा नामर्द कसा आला ॥
ज्यानें परस्त्रीच्या अभिलाषें स्वकुल धर्माला ।
जाळून फस्त केलें त्याचा शिरच्छेद पाहिजे केला ॥
जाऊन शिवाजी सन्मूख मजकूर निवेदीला ।
तेव्हां शिवाजीनें दाखविली आंगठी आणि त्याला ॥
ही पर्वा दिलेली मी आंगठी सूर्याजीला ।
पाहुन घेई तानाजी तू करुन खात्री तुझी तुजला ॥
गेला भडकून अग्नी त्यांत तेल मिळालें त्याला ।
मग नाहीं पारावार क्रोधाग्नि तो जाळित सुटला ॥
आधीं महाराज किल्ल्यामध्यें गाठून त्या अधमाला ।
ठार करुन सूर्याजीशी, नंतर सर करतों किल्ला ॥
महापातकी चांडाळा बंधु तूं आतां कुठला ।
तुं खुशाल फितुर होई कंठस्नान घालीतो तुजला ॥
झाला मनिं खूष मोहनलाल डाव म्हणे साधला ॥
आतां किल्लेदारीं जाती कुठें माझीच आखेरीला ॥

No comments:

Post a Comment