Thursday, July 16, 2009

बाजी देशपांडे यांचा पराक्रम (पोवाडा) - शाहीर रामचंद्र शंकर दळवी

(चाल :- श्रीमंत पेशवे सवाई माधवराव )

चौक १

श्रीभवानी पुढे कापिला अफझुला म्हैसा ।

बादशहाला भीति बडी बहुत डुबाया पैसा ॥

धारण पांचावर बसली वखत आया कैसा ।

धाडावा कोण इकडून, गनिम पकडून, आणिल जखडून, वीर कोण ऐसा ॥ध्रु०॥

रुस्तूम जमान बेगुमान सरदार शूर । तीन हजार स्वार पायदळ असूनी भरपूर ।

शिवाजीच्या पहिल्या धडकेंत जाहला चूर ।

मार खाऊन खाऊन वैतागें, पळाला मागें, गाठले वेगें, त्यानें विजापूर ॥

अल्ली अदिलशाहासी लागली चिंता हूरहूर ।

सरदार अमीर सर्वांचा उतरला नूर ।

खलबत करतां आठविला सरदार क्रूर ।

रणीं न खायेचि जो हार, शिद्दी जोहार,

धाडिता बहार, करिल तो शूर ॥

आणविला शिद्दी तो होता कर्नाटकीं दूर ।

सन्मान करुनी दिला किताब रणबहादूर ।

मदतीस फाजलखान जवान आतूर ।

सोळा हजार घोडेस्वार, पायदळ भार चाळीस हजार, सैन्य भ्यासूर ॥

चाल

दारु गोळा, तोफा बंदुका, पुरविन पैका निघा सत्वर, शिवाजीवर ॥

जय घेऊन येशील जरी देइन जहागिरी शिद्दी तुजवर माझी आहे नजर ॥

असे ऐकुनी संतोषला, घेऊनी आला सैन्य सागर, करविरावर ॥

चाल दुसरी

बादशहाचा हुकूम जंजिर्‍याचे शिद्दीला ।

दुजा हुकुम वाडीच्या सावंतासहि दिला ।

घेउनी उठा आपआपुल्या शिबंदिला ।

आम्ही पन्हाळगडाकडे शिवाजीस शह दिला ।

चहुंकडून सर्वांनी उठावें या संधिला ।

गनिमासि भिऊनी कोणी बसूं नये संधिला ॥

मोडते

शिवाजीस समजतां बेत शत्रुचा ऐसा ।

बंदोबस्त करुनी कडेकोट राज्यामध्यें खासा ।

स्वतः पन्हाळगडावरी आपण शार्दुल जैसा ।

नेताजी, पालकर खालीं, शत्रूभोवतालीं घिरटया घाली, पिडा देत लइसा ॥१॥

चौक २

आठ महिने लढविला किल्ला शिवाजीनें शांत ।

तीन वर्षे पुरेल असा होता पुरवठा आंत ।

शिद्दी फिरकू देईना आंत बाहेर निभ्रांत ।

दमादमानें लढतां सहजीं शिवाजी फर्जी, गनिम अपमर्जी, येईल हातांत ॥

शिवाजीने विचार केला आपुल्या मन मोहल्यांत ।

कोंडुनि राहुन काय उपयोग या किल्ल्यांत ।

शिद्दीस निरोप दिला नका पाहु म्हणे अंत ।

जरि अभय द्याल तुम्ही आम्हा, करु तहनामा,

दाविला प्रेमा, भेटिचा हेत ॥

एके दिवशीं अस्तमानीं भेट झाली दोघांत ।

मुख्य कलमें मुक्रर केलि चार चौघांत ।

बाकींची उद्यां पाहूं झाली काळोखी रात।

तुम्ही थोर पुरुष चांगले, दैव लाभले; वचन द्या भले, हातावरी हात ॥

चाल

ढिला पडला बंदोबस्त, शिपाई झाले सुस्त त्याच रात्रीला, तहनामा झाला ॥

वीस हजार घेऊन मावळे, शिवाजी पळे राजरोस गेला, गड उतरला ॥

शिपायांनी केला गलबला, गनिम आलबेला भाग गया अल्ला, गांठला पल्ला ॥

चाल दुसरी

सेनापतीस बातमी कळतां नाचे थयथया ।

झूट बात करुन बड़ा गनिम किदरसे गया ।

बेसावध भूल पडी हमें खबर नहीं दिया ।

इतनेमें फाजलखान दौडता आया ।

चलो उठो अभी लष्कर को हुकूम देव मिया ।

केला पाठलाग सुरु पहांटेच्या समया ॥

मोडते

दोनी फौजेंत अंतर मुळींच नव्हता लइसा ।

झाली नजरानजर दोन तास सुमारे दिवसा ।

वीर बाजी देशपांडे शूर सेनापती खासा ।

पांच हजार मावळ्यांसह भली, खिंड रोखली,

स्वारी पुढें गेली, करुनी बेत ऐसा ॥२॥

चौक ३

आली यवन फौज खिंडिच्या तोंडावरी वेगें ।

दिला मार त्यास अनिवार परतली मागें ।

पुन्हा दुसरा हल्ला चढविला परतुनी रागें ।

त्याचा फडशा उडविला पुरा, कापून चरचरां,

म्हणती शिव हरा, करी मना जोगें ॥

यवनांनी तयारी केली पुन्हा वैतागें ।

तोफखाना पुढे घोडदळ तयाच्या मागें ।

आले दीन दीन गर्जत पठाणवीर आगे ।

तोफांचा करीत भडिमार, उडविला कहर,

कोणी माघार, त्यांतुनी नेघे ॥

सहा हजार मुसलमान रणीं पाडिले नंगे ।

जसे मारुतीनें अहिमहिचे चिरडिले भोंगे ।

इतक्यांत गोळा बाजीच्या छातीवर लागे ।

गडावरच्या तोफा ऐकुन, आनंदित मन, नामस्मरण, करी वैरागे ॥

चाल

छातींत बैसला धक्का, धीराचा पक्का देशपांडे वीर, महारणशूर ॥

पांच तोफा होता क्षणीं हर्षला मनीं, नामउच्चार, करित झाला गार ॥

त्याचें प्रेत शीघ्र घेऊन, न लागतां क्षण, झाले पसार, मावळे वीर ॥

चाल दुसरी

झाली खिंड मोकळी यवन गेले चालून ।

बैसले गडाला शीघ्र वेढा घालून ।

शिवाजीनें आप पर सैन्यबल तोडून ।

बेजार केले रिपु रात्रीं छापे घालून ।

पोर भ्यालें अफझुल्याचें गेलें वाळुन ॥

मोडते

गेला पळून फाझल पन्हाळ्याकडे भर दिवसां ।

शिद्दी जोहारासी म्हणे काका जरा आगे बैसा ।

बरसात जवळ आला नको युद्धाचा फांसा ।

लोक झाले बहुत तजावजा, कित्येकांस इजा,

म्हणती द्या रजा, लढाई नको सहसा ॥३॥

चौक ४

गेला सारा उन्हाळा परि पन्हाळा नाहीं आला हातीं ।

गेलें द्रव्य फुकट सैन्याची जाहली माती ।

बादशहाची जाहली इतराजी धरुन तृण दातीं ।

गेला पळुन विजापुराकडे, शिवाजीची पुढें,

पसरली इकडे, कीर्ती चौप्रांती ॥

पुन्हा आला बादशहा अष्ट उमराव साथी ।

प्रचंड सैन्यसागर घेऊन सांगातीं ।

किल्ल्यामागें किल्ले जिंकुनी दाखवी महती ।

इतक्यांत कर्नाटकी बंड, उठलें आभंड, कराया थंड, गेला त्या प्रांती ॥

मागें शिवाजीच्या मित्रास नसे मुळीं शांती ।

सांवताचा करुनिया मोड जिरविली भ्रांती ।

जंजिर्‍याचे शिद्दीचा घेऊन समाचार अंतीं ।

गडकिल्ले घेऊनी सकळ, करीत धुमाकुळ, मांडिलें खूळ विजापुर प्रांतीं ॥

चाल

बाजी पुत्राचें कल्याण, केलें शिवाजीनें द्रव्य दिलें भारी, केले अधिकारी ॥

झाली जगदंबा प्रसन्न, दिलें बहु धन, तलवार कहारी, यशस्वी प्यारी ॥

नांव घेतां आपोआप, होय थरकांप शत्रुच्या हारी, पळती माघारी ॥

चाल दुसरी

जर्जर करुनी बादशहाचा गर्व हारविला ।

कोंडमार करुनी मनाजोगा तह करविला ।

द्यावे सात लक्ष दर साल खंड ठरविला ।

स्वतंत्र कबुल करवुनी हट्ट पुरविला ।

भगवा झेंडा गुरुचा चौ मुलखी फिरविला ।

त्यापरी कवीने कवनीं रंग भरविला ॥

मोडते

पुढें प्रसंग शाहिस्तेखान येईल आपैसा ।

त्याची बोटें तोडितां तडफडेल जणूं मासा ।

कवि रामचंद्राचे कवन श्रवण करा बैसा ।

श्रीगुरु कृपेच्या बळें, अनुप्रास जुळे,

श्रोत्याच्या मुळें रंग चढे खासा ॥४॥

No comments:

Post a Comment